भारताच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांना जागतिक मागणी!

17 Mar 2026 11:09:05
BrahMos Missile
 
काही वर्षांपूर्वी शस्त्रास्त्रांची केवळ आयात करणारा भारत आता शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतही अग्रेसर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचेच हे अभूतपूर्व यश. याच मोहिमेअंतर्गत निर्मित ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे इंडोनेशियाच्या लष्करात दाखल होणार आहेत. त्यानिमित्ताने ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांच्या जागतिक मागणीचा आढावा घेणारा हा लेख...
 
भारत हा काही काळापूर्वी विविध प्रकारची संरक्षणसामग्री आयात करीत होता. पण, आता भारताने सर्वच क्षेत्रांमध्ये ‘आत्मनिर्भर’ होण्याचे धोरण अंगीकारले असल्याने त्यास संरक्षण क्षेत्र अपवाद कसे असेल. भारत आणि इंडोनेशिया या देशांच्या दरम्यान ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा करार झाला. हा करार झाल्यानंतर ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांसाठी जागतिक पातळीवर मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
 
भारत-इंडोनेशिया यांच्यात ‘ब्राह्मोस’ खरेदी करण्याचा करार झाल्यानंतर जागतिक शस्त्रास्त्र बाजारात भारताने निर्माण केलेल्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित अशा या क्षेपणास्त्रास मागणी वाढत आहे. ‘ब्राह्मोस एअरोस्पेस’ हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. भारताकडून ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासंदर्भात इंडोनेशियासमवेत २०२३ पासून चर्चा सुरू होती. २०० दशलक्ष डॉलर ते ३०० दशलक्ष डॉलरदरम्यानच्या करारावर उभय देशांमध्ये चर्चा सुरू होती. ही बोलणी यशस्वी झाल्याने आता अत्यंत प्रगत अशी ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे इंडोनेशियाच्या लष्करात दाखल होणार आहेत. गती, अचूक भेद घेण्याची क्षमता यासाठी ‘ब्राह्मोस’ प्रसिद्ध आहे. ‘फायर अ‍ॅण्ड फरगेट’ या तत्त्वावर आधारित असे हे क्षेपणास्त्र आहे. याचा अर्थ, हे क्षेपणास्त्र एकदा डागले की, ते आपोआप आपल्या लक्ष्याचा भेद करते. या क्षेपणास्त्रास कोणत्याही बाह्य मार्गदर्शकाची आवश्यकता नसते. सर्वसाधारणपणे ‘ब्राह्मोस’चा पल्ला २९० किलोमीटरचा आहे. असे असले, तरी ४५० ते ८०० किलोमीटर परिसरातील लक्ष्यांचा भेद करण्याइतकी त्याची क्षमता वाढविता येते. ‘ब्राह्मोस’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे क्षेपणास्त्र समुद्र सपाटीपासून अवघ्या तीन ते १० मीटर उंचीवरून उडू शकते. त्यामुळे ‘रडार’च्या कक्षेत ते येऊ शकत नाही. तसेच ते १५ किलोमीटर एवढ्या उंचीवर जाऊ शकते आणि तेथून सूर मारत अत्यंत वेगाने आपल्या लक्ष्याचा भेद करू शकते.
 
‘ब्राह्मोस’ची ही विविध वैशिष्ट्ये लक्षात घेऊन अन्य देशही ‘ब्राह्मोस’ खरेदी करण्याचा विचार करू लागली आहेत. नायजेरिया या देशाकडे सध्या ‘जे एफ-१७’ प्रकारची लढाऊ विमाने आहेत. ही विमाने चीन आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे विकसित केली आहेत. आपल्या हवाई दलासाठी नायजेरियाने ही लढाऊ विमाने खरेदी केली होती. पण, उपलब्ध माहितीनुसार त्यातील एकच विमान सध्या कार्यरत आहे. अन्य दोन लढाऊ विमाने विविध तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरच आहेत. नायजेरियाच्या या लढाऊ विमानांची अवस्था लक्षात घेता, त्या देशाकडून ‘ब्राह्मोस’ खरेदी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. तसेच अशीच ‘जे एफ-१७’ प्रकारची लढाऊ विमाने म्यानमार आणि अझरबैजान या देशांकडून वापरली जातात. त्या विमानांची मर्यादा लक्षात घेता, असे देशही ‘ब्राह्मोस’कडे वळू शकतात. ‘ब्राह्मोस’ने शस्त्रास्त्र बाजारात आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले असल्याने अन्य देशांकडूनही भविष्यात ‘ब्राह्मोस’ला मागणी वाढली, तर आश्चर्य वाटायला नको.
 
ओडिशात ११ जहाल माओवादी शरण!
 
केंद्र सरकार आणि माओवाद्यांचा प्रभाव असलेली राज्ये यामध्ये माओवाद्यांच्या विरुद्ध हाती घेण्यात आलेल्या मोहिमा यशस्वी होताना दिसत असून, या विविध राज्यांमध्ये माओवादी मोठ्या प्रमाणात शरण येत असल्याचे दिसून येत आहे. शरण येणार्‍यांमध्ये प्रमुख माओवाद्यांचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देशातून माओवाद्यांचे उच्चाटन करण्यात येईल, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानुसार, या मोहिमांना सर्वत्र यश येत असल्याचे दिसून येत आहे. ओडिशा राज्यातील कालहांडी जिल्ह्यामध्ये अलीकडेच म्हणजे, दि. १५ मार्च रोजी ११ जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली. ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांच्यासमोर भवानीपटना येथील रिझर्व्ह पोलीस लाईन्समध्ये या माओवाद्यांनी शरणागती पत्करली. शरण आलेल्या माओवाद्यांमध्ये विभागीय समितीच्या एका सदस्याचा, तसेच पाच एरिया कमिटीच्या सदस्यांचा समावेश आहे. यामधील नकुल नावाच्या माओवाद्यास पकडण्यासाठी २२ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हे माओवादी कालहंडी, रायगडा आणि कंधमाल या जिल्ह्यांमध्ये सक्रिय होते.
 
शरण आलेल्या माओवाद्यांनी ओडिशा राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या समोर आपली शस्त्रे ठेवली. यावेळी अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे ११ माओवादी शरण आले, त्या सर्वांवर मिळून ६३.२५ लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. माओवाद्यांचा शरण आलेला गट बंसधारा-घुम्सुर-नागवली विभागात कार्यरत होता. यातील नकुल नावाचा माओवादी हा महाराष्ट्रातील आहे, तर उर्वरित दहा माओवादी शेजारच्या छत्तीसगढ राज्यातील आहेत. माओवाद्यांनी जी शरणागती पत्करली, त्यावरून या परिसरातून माओवाद्यांचा प्रभाव कमी होत असल्याचेच दिसून येत आहे. विविध सुरक्षा दलांनी संयुक्तपणे हाती घेतलेली मोहीम आणि त्याच्या जोडीलाच शासनाने हाती घेतलेले विकासाचे विविध कार्यक्रम, यामुळे प्रभाव ओसरत असल्याचे दिसून येत आहे, असे पोलीस महासंचालक खुरानिया यांनी सांगितले. शरण आलेल्या सर्व माओवाद्यांना सरकारने घोषित केलेले सर्व लाभ मिळतील, तसेच त्यांचे पुनर्वसनही सरकारी धोरणानुसार केले जाईल.
 
यामध्ये आर्थिक मदत, धंद्याचे शिक्षण आणि पुन्हा समाजामध्ये एकरूप होण्यासाठी लागणारी सर्व ती मदत यांचा अंतर्भाव असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेला वरिष्ठ माओवादी नेता गणेश उईके हा डिसेंबर २०२५ मध्ये कंधमाल जिल्ह्यामध्ये झालेल्या एका चकमकीत मारला गेल्याने माओवाद्यांचे मनोधैर्य मोठ्या प्रमाणात खचले. शरण आलेल्या माओवाद्यांनी त्यांच्याकडील ‘एके ४७’ रायफल, चार ‘एसएलआर’ रायफली यांसह अन्य बंदुका पोलिसांच्या हाती दिल्या. तसेच मोठ्या प्रमाणात दारुगोळाही जप्त करण्यात आला. ओडिशा राज्यात सशस्त्र माओवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. आता तर राज्यामध्ये अवघे १५ माओवादी उरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘येत्या ३१ मार्चपर्यंत आम्ही ओडिशा राज्यामधून माओवाद्यांचे पूर्णपणे उच्चाटन करू,’ असा विश्वास ओडिशा पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओडिशाप्रमाणेच छत्तीसगढ, तेलंगण या राज्यांमधूनही माओवादी मोठ्या प्रमाणात शरण येत आहेत. विविध राज्यांमधील अनेक माओवादी शरण आले आहेत. त्यामध्ये काही प्रमुख माओवाद्यांचा समावेश आहे. जंगलात राहून कार्यरत असलेल्या या माओवाद्यांचा बीमोड होत आला आहे. त्याचप्रमाणे जे ‘अर्बन माओवादी’ आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कारण माओवाद्यांच्या या ‘स्लीपिंग सेल’ सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान आहे.
 
भारत-जपान संयुक्त लष्करी सराव
 
भारत आणि जपानी लष्करादरम्यान ‘धर्म गार्डियन-२०२६’ याअंतर्गत सातवा संयुक्त लष्करी सराव नुकताच पार पडला. सुरक्षाविषयक सहकार्य, दहशतवादविरोधी मोहिमा, अन्य लष्करी आव्हाने यांचा विचार करून ही संयुक्त सराव मोहीम हाती घेण्यात आली होती. २०१८ सालापासून भारत आणि जपान यांच्यात हा संयुक्त सराव आलटून-पालटून केला जात आहे. या संयुक्त लष्करी सराव मोहिमेची सांगता गेल्या दि. ८ मार्च रोजी झाली. क्षेत्रीय शांतता, स्थैर्य याबरोबरच लष्करी सहकार्य हे मुद्दे लक्षात घेऊन हा संयुक्त सराव करण्यात आला. भारत आणि जपानच्या लष्कराने या सरावादरम्यान एकत्रित अभ्यास केला. उत्तराखंड राज्यातील चौबत्तिया येथे दोन्ही देशांच्या सैन्याने सराव केला. या सरावादरम्यान अतिरेयांविरुद्ध मोहीम कशी राबवायची, माहिती कशी प्राप्त करायची, शोधमोहिमा कशा हाती घ्यायच्या, ओलिसांची सुटका कशी करायची, याचा अभ्यास करण्यात आला. उभय लष्करामध्ये अधिकाधिक लष्करी सुसंवाद साधला जाण्याच्या दृष्टीने हा सातवा संयुक्त सराव उपयुक्त ठरला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0