मुंबई : (Hafiz Saeed) पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने ‘जिहाद’च्या नावाखाली नवी मोहीम सुरू केल्याचे निदर्शनास आलेय. ‘मुकाबला-ए-वफा’ या नावाने राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेद्वारे संघटनेचा प्रमुख हाफिज सईद दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करत असल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या स्मरणार्थ ही मोहीम राबवली जात आहे. या निधीतून लष्करकडून ‘अल-मोमिनात’ नावाचा महिला विंग स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जाते. निधी गोळा करण्यासाठी हाफिज सईद लोकांना आवाहन करत म्हणतो, “अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याच्या मोहिमेचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून, त्याला मुकाबला-ए-वफा असे नाव देण्यात आले आहे.”
हेही वाचा : Malaysia Trade : मलेशियाकडून अमेरिकेबरोबरचा व्यापारी करार रद्द!
लष्करकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात जिहादच्या नावाखाली एकजूट होण्याचे आणि मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रात २६ आणि २७व्या रमजानच्या दिवशी या मोहिमेसाठी पूर्ण ताकद लावण्याचे आवाहन करण्यात आले असून, ७ मे रोजी ठार झालेल्या दहशतवाद्यांना ही मोहीम समर्पित करण्याचेही म्हटले आहे.