ताडोबा भेटीचा क्षण

16 Mar 2026 13:11:47

ताडोबाभेटीला जाताना नेहमी डोळे उघडून जाण्याकडे कल असावा. हा कल आपल्याला नेहमीच्या अनुभवसंपन्नतेकडे घेऊन जातो. अशाच एका ताडोबाभेटीचा अनुभवसंपन्न करणारा मात्र तितकाच भेदक अनुभव विशद करणारा लेख...

जंगल आणि वन्यजीव प्रेमींसाठी महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे एक स्वर्गच आहे. लहानपणापासूनच ताडोबाच्या दाट झाडीत जाऊन वाघाचे मनसोक्त फोटोशूट करण्याचे माझे स्वप्न होते.

ताडोबाचे हे सौंदर्य अनुभवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रवेशद्वारांची म्हणजेच गेट्सची निवड केली होती. एकूण चार वेगवेगळ्या सफारी गेट्समधून आम्ही जंगलात प्रवेश केला. प्रत्येक गेटचा अनुभव वेगळा होता. कुठे बांबूची दाट झाडी, तर कुठे विस्तीर्ण गवताळ प्रदेश. जिप्सीतून जाताना मातीचा तो गंध आणि वाघाच्या आवाजाची प्रतीक्षा करणे, यात एक वेगळीच गूढता होती.

नशीब बलवत्तर होते, म्हणून आम्हाला ताडोबाचा राजा वाघ अगदी जवळून पाहता आला. त्याचा डौलदार चालणे आणि ती जरब कॅमेऱ्यात टिपणे, ही माझ्यासाठी स्वप्नपूतच होती. वाघासोबतच ताडोबाच्या जंगलात आम्हाला इतरही अनेक प्राणी पाहायला मिळाले :

बिबट्या : झाडाच्या आडून जाणारी त्याची एक झलक थरारक होती.

अस्वल : स्वतःच्याच धुंदीत चालणारे अस्वल पाहून मजा आली.

रानकुत्रे (Dholes) : कळपाने शिकार शोधणारे रानकुत्रे पाहायला मिळाले.

गवा (Indian Bison) :
त्यांचे अजस्र शरीर पाहून जंगलाच्या ताकदीची जाणीव झाली.

त्यासोबतच चितळ, सांबर आणि भेकर यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांचा वावर सगळीकडे दिसत होता.

सकाळी आणि संध्याकाळच्या दोन सफारींच्या मधे जो वेळ मिळायचा, तेव्हा आम्ही हॉटेलवर थोडा आराम करायचो. पण छायाचित्रणाची आवड स्वस्थ बसू देईना, म्हणून मी हॉटेलच्या आसपासच्या परिसरातच पक्षी निरीक्षण करायचे ठरवले. जंगलाच्या कुशीत असलेल्या आमच्या हॉटेलच्या परिसरातच अनेक रंगीबेरंगी पक्ष्यांची लगबग पाहायला मिळाली.

सफारीचा दिवस मावळतीला आला होता. दिवसभर शोध घेऊनही जंगलाचा राजा काही दर्शन देत नव्हता; त्यामुळे थोडी निराशा मनात घर करू लागली होती. पण ‌‘ताडोबा कधी कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही,‌’ म्हणतात ना, त्याची प्रचिती आम्हाला आली. अचानक आमच्या गाईडला दुसऱ्या बाजूने निरोप आला, वाघ दिसला आहे! ती माहिती मिळताच चालकाने जिप्सीचा गिअर टाकला आणि आमची गाडी वाऱ्याच्या वेगाने त्या दिशेने धावू लागली. धुळीचे लोट उडवत जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा समोरचे दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला. समोर एक भलामोठा, पिवळा धमक आणि पिळदार शरीराचा वाघ राजासारखा उभा होता. त्याचे ते भव्य रूप आणि रुबाबदार चाल पाहून काही क्षण काय करावे, हेच सूचेना. त्याला पाहताच जिप्सीमध्ये बसलेल्या आम्हा सर्व फोटोग्राफर्समध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली. मघाशी थकलेले हात आता कॅमेऱ्याच्या लेन्स सावरण्यात व्यस्त झाले. चारी बाजूंनी कॅमेऱ्याच्या ‌‘क्लिक-क्लिक‌’ असा आवाजांचा पाऊस सुरू झाला. तो वाघ मात्र अगदी निर्धास्तपणे, आमच्याकडे दुर्लक्ष करत आपल्याच धुंदीत चालत होता. तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताना जे समाधान मिळाले, ते शब्दांत सांगणे अशक्य आहे. माझ्या फोटोग्राफीच्या आवडीसाठी हा आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण ठरला.

काही वेळाने तो देखणा वाघ हळूहळू जंगलाच्या बाहेर आला आणि अगदी बिनधास्तपणे डांबरी रस्त्यावर येऊन थांबला. एखाद्या चित्रपटातील नायकाची ‌‘एन्ट्री‌’ असावी, तसाच तो क्षण होता! आजूबाजूला पर्यटकांच्या जिप्सींची गद झालेली, प्रत्येकजण आपला श्वास रोखून त्याला पाहात होता. पण त्या राजाला कशाचीही पर्वा नव्हती. काय तो त्याचा वचक आणि काय तो आत्मविश्वास! रस्त्यावर उभ्या असलेल्या एकालाही न बघता, जणू काही हे सर्व माझेच साम्राज्य आहे, अशा आविर्भावात तो तिथे उभा राहिला. त्याचे ते पिवळे-धमक शरीर आणि त्यावरचे काळे पट्टे सूर्याच्या मावळत्या किरणांत अधिकच खुलून दिसत होते. काही वेळ तिथेच रेंगाळून, सर्वांना आपल्या दर्शनाने तृप्त केल्यावर, तो तितक्याच डौलात समोरच्या दाट जंगलात निघून गेला. तो रस्ता ओलांडतानाचा त्याचा राजेशाही ‌‘वॉक‌’ माझ्या कॅमेऱ्यात आणि कायमचा माझ्या मनात कैद झाला आहे.

वाघाचे ते सौंदर्य टिपत असतानाच, तिथल्या स्थानिकांशी बोलताना मला एक वेगळीच आणि भीषण बाजू समजली. पर्यटकांच्या नजरेतून जो वाघ दिसला की आनंदाची लाट येते, तोच वाघ तिथल्या गावकऱ्यांसाठी दररोजच्या दहशतीचे कारण असतो.

तिथल्या गावकऱ्यांनी सांगितले की, हे वाघ अगदी बिनधास्तपणे गावात शिरतात आणि पाळीव जनावरांना आपले लक्ष्य करतात. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आजवर अनेक मानवी जीवही या वनराजाच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. तिथली माणसे दररोज आपला जीव मुठीत घेऊन जगतात. घराबाहेर पडताना त्यांना मृत्यूची भीती सतत सोबतीला असते. या संवादातून मला एका थक्क करणाऱ्या परंपरेबद्दल कळले. जर एखाद्या वाघाने गावातील एखाद्या व्यक्तीचा बळी घेतला, तर त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना गावाबाहेर त्या वाघाचे एक छोटे मंदिर किंवा ‌‘वाघोबाचे स्मारक‌’ उभारावे लागते. पिढ्यान्‌‍पिढ्या ही परंपरा तिथे चालत आली आहे. ही श्रद्धा म्हणावी की भीती, पण निसर्गाच्या या रौद्र रूपाशी जुळवून घेण्याची ती एक अजब रीत आहे.

ताडोबाची ही सफर मला केवळ वाघ दाखवून गेली नाही, तर निसर्गाचा समतोल आणि मानवी जीवनाची अनिश्चितता यांची जाणीव करून देऊन गेली. एका बाजूला वाघाचे ते विलोभनीय सौंदर्य आणि दुसरीकडे गावकऱ्यांच्या संघर्षाची ही कथा. ताडोबा माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

ताडोबाच्या या सफारीने

मला केवळ निसर्गाचे सौंदर्यच दाखवले नाही, तर एक महत्त्वाचा धडाही दिला. जेव्हा मी वाघाला अगदी सहजपणे रस्ता ओलांडताना पाहिले, तेव्हा प्रकर्षाने जाणवले की, चूक त्या प्राण्यांची नाही, तर आपली आहे. खरं तर, आपणच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात, त्यांच्या घरात शिरकाव केला आहे. जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांमुळे त्यांचे जग विस्कळीत झाले आहे. अनेकदा रस्ता ओलांडताना वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे वन्यप्राणी अपघाताचे बळी ठरतात, हे पाहून मन विषण्ण होते. यासाठी खालील उपाययोजना नक्कीच करता येऊ शकतीलः

सुरक्षित कुंपण (Fencing) :
जंगलाच्या ज्या भागातून मुख्य रस्ते जातात, तिथे रस्त्याच्या कडेला मजबूत कुंपण घालावे, जेणेकरून प्राणी अचानक रस्त्यावर येणार नाहीत.

प्राण्यांसाठी स्वतंत्र मार्ग (Wildlife Corridors/Underpass) : प्राण्यांना एका जंगलातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी रस्त्यावरून जावे लागू नये, यासाठी स्वतंत्र ‌‘अंडरपास‌’ किंवा ‌‘ओव्हरपास‌’ (Eco-bridges) बांधले जावेत. यामुळे अपघातांचे प्रमाण शून्यावर येईल.

गतिरोधक आणि सीसीटीव्ही : जंगलातील रस्त्यांवर गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी कडक नियम आणि देखरेख असावी.

प्राण्यांना आपला त्रास होऊ नये आणि माणसांवरील हल्लेही कमी व्हावेत, यासाठी हे उपाय प्रभावी ठरू शकतात. जेव्हा जंगल सुरक्षित असेल, तेव्हाच आपण आणि आपला निसर्ग सुरक्षित राहील.

ताडोबाची ही सफर माझ्यासाठी एक डोळे उघडणारा अनुभव ठरली. निसर्गाचा आनंद घेतानाच त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही आपलीच आहे, ही जाणीव घेऊन मी परतलो. सहअस्तित्व हेच निसर्गाचे सूत्र असून यातूनच वाघही जगले आणि माणूसही सुरक्षित राहील.

वाघाचा तो ‌‘रॉयल वॉक‌’ आणि गावकऱ्यांच्या संघर्षाची ती गाथा मनात साठवून, एका चांगल्या उद्याच्या आशेने मी ताडोबाचा निरोप घेतला.

सफारीदरम्यान आणि हॉटेलच्या परिसरात मला दिसलेले प्रमुख पक्षी

इंडियन रोलर : याचे निळे पंख उडताना अतिशय सुंदर दिसतात.

ओरिएंटल हनी बझार्ड (मधुबाज) : जो उंच झाडावर शांत बसलेला दिसला.

मलबार पाईड हॉर्नबिल (मलबारी कवड्या धनेश) : त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे तो पटकन लक्ष वेधून घेतो.

पॅराडाईज फ्लायकॅचर (स्वगय नर्तक) : याची पांढरी लांब शेपटी हवेत तरंगताना पाहणे, हा एक सुखद अनुभव होता.

हुदहुद (Hoopoe):
आपल्या तुऱ्याने हा पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

खंड्या (Kingfisher), सुतार पक्षी (Woodpecker) आणि मोर यांचीही साथ लाभली.

- विवेक आंबेरकर
(लेखक वन्यजीव छायाचित्रकार आहेत.)



Powered By Sangraha 9.0