Mahaprasad Service Shegaon: तथाकथित इंधन संकटातही शेगावच्या गजानन महाराज संस्थानची महाप्रसाद सेवा अबाधित!

16 Mar 2026 16:55:03

मुंबई :
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन व गॅस पुरवठ्यावर काही ठिकाणी परिणाम होत असल्याचे निदर्शनास येऊ लागलेय. विशेषतः हॉटेल व्यवसाय, भोजनालये आणि मोठ्या प्रमाणावर अन्नप्रसाद किंवा महाप्रसादाची व्यवस्था करणाऱ्या मंदिर व्यवस्थापनासमोर गॅस पुरवठा आणि वाढत्या खर्चाचे आव्हान उभे राहू लागले आहे. अशा परिस्थितीत मात्र शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थान संचलित प्रसादलयातील महाप्रसाद व्यवस्थेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे संस्थानचे नियोजन आदर्श उदाहरण म्हणून समोर येत असल्याचे दिसतेय.

संस्थानच्या अत्याधुनिक आणि नियोजनबद्ध किचन व्यवस्थेमुळे लाखो भक्तांना महाप्रसाद अखंडपणे उपलब्ध होत आहे. संस्थानच्या वतीने भक्तांसाठी स्वतंत्र व प्रशस्त असे अत्याधुनिक किचन उभारण्यात आले आहे. या किचनमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीसह स्टीम बॉयलर पद्धतीने स्वयंपाक केला जातो. या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करताना गॅसवर अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळे गॅस पुरवठ्यातील चढउताराचा महाप्रसादाच्या व्यवस्थेवर कोणताही परिणाम होत नाही.

किचनमध्ये किरकोळ कामांसाठी, जसे की चहा तयार करणे किंवा लहान स्वरूपाच्या स्वयंपाकासाठी मर्यादित प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र मुख्य महाप्रसाद स्वयंपाक स्टीम बॉयलरद्वारे होत असल्याने गॅसची गरज अत्यल्प आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या तणावामुळे पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर काही ठिकाणी परिणाम होत आहे. अनेक उद्योग व व्यवसायांवर त्याचा परिणाम जाणवत असताना शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील महाप्रसाद व्यवस्था मात्र सुरळीत सुरू आहे.

दररोज हजारो भक्त मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच उत्सव काळात दोन ते तीन दिवसांत तीन ते साडेतीन लाखांहून अधिक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचे दिसून येते. संस्थानच्या सूक्ष्म आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे ही व्यवस्था अखंडपणे सुरू राहिलीय. या व्यवस्थापनामुळे संस्थानचा नावलौकिक देशभर वाढत असून सोशल मीडियावरही प्रसादालयाच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


Powered By Sangraha 9.0