Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सत्तांतर! साहित्य संवर्धन आघाडीचा विजय : योगेश सोमण अध्यक्षपदी

16 Mar 2026 15:25:49
 
Maharashtra Sahitya Parishad
 
मुंबई: (Maharashtra Sahitya Parishad) पुण्यामध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीला बहुमत मिळाले असून, जवळपास दशकभराने महाराष्ट्रात साहित्य परिषदेत सत्तांतर घडले आहे. अध्यक्षपदी योगेश सोमण ४५ मतांनी, प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक १२९ मतांनी आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर ३६८ मतांनी निवडून आले आहेत. परिवर्तन उत्कर्ष पॅनेलच्या मुख्य कार्यवाह पदाच्या उमेदवार सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला आहे. परिवर्तन उत्कर्ष पॅनेलचे आशुतोष जावडेकर आणि अंजली कुलकर्णी, माधव राजगुरु हे उमेदवार निवडून आले आहेत. (Maharashtra Sahitya Parishad)
 
साहित्य संवर्धन आणि परिवर्तन उत्कर्ष अशा दोन आघाड्यांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत साहित्य संवर्धन आधाडीने प्रमुख पदांवर विजय मिळवला महाराष्ट्र साहित्यः परिषदेची मागील निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये कोरोनाचे कारण पुढे करत सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी विद्यमान कार्यकारिणीला ५ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे तब्बल दहा वर्षानंतर होणाऱ्या या निवडणूकीकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले होते. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील १८ जागांवर 'परिवर्तन उत्कर्ष' आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. पुणे जिल्हा वगळता सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच कोकणातील सर्व जिल्ह्यांत या आघाडीचे प्रतिनिधी बिनविरोध निवडले गेले होते. (Maharashtra Sahitya Parishad)
 
रविवार दि. १५ मार्च रोजी साहित्य परिषदेच्या आवारात सकाळी ११.३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधी पदासाठीची मतमोजणी करण्यात आली. जिल्हा व शहर कार्यवाहपदासाठी जवळपास १५०० मतदारांनी मतदान केले. दरम्यान, पहिल्या मजल्यावरील कोहिनूर सभागृहात अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या प्रमुख पदांसाठी मतमोजणी सुरू होती. राज्यातील १६ हजार ६०७ मतदारांपैकी १० हजार ९०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच साहित्य संवर्धन आघाडीचे वर्चस्व दिसून आले. आठ फेऱ्यापर्यंत या आघाडीला सुमारे १३०० ते १४०० मतांची आघाडी होती. (Maharashtra Sahitya Parishad)
 
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारीही होणार आहेत. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जबाबदारी आता साहित्य संवर्धन आघाडीवर आली आहे. यापूर्वी ९९ व्या साहित्य संमेलनाची जबाबदारी परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या कार्यकारिणीकडे होती. आता नव्या कार्यकारिणीसमोर हे ऐतिहासिक संमेलन यशस्वीपणे पार पाडण्याचे आव्हान असणार आहे. (Maharashtra Sahitya Parishad)
 
परिषदेचा कारभार पारदर्शक करण्यावर भर! 
 
“जय-पराजय हा निवडणुकांचा भाग असतोच. मात्र, आता निवडूण आल्यावर आता एक वेगळी जबाबदारी आहे. सर्व प्रथम परिषदेचा कारभार पारदर्शक करण्याकडे आमचा कल असेल, त्याचबरोबर मतदार याद्यांचे शुद्धीकरण आम्ही करणार आहोत. त्या डिजिटलाईज कशा करता येतील याकडे लक्ष्य देणार आहोत. जे सर्वांच्याच हिताचे आहे. येणाऱ्या काळात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्सवाचे तर होणार आहेच. मात्र, त्याचबरोबर माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग यामध्ये असावा.” (Maharashtra Sahitya Parishad)
 
- योगेश सोमण, नवनिर्वाचित अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
 
 
Powered By Sangraha 9.0