आता ध्येय लॉस एंजेलिसचे...

16 Mar 2026 12:40:42

गेल्या दोन वर्षांत विश्वस्तरीय स्पर्धांमध्ये भारताच्या प्रत्येक प्रकारातील क्रीडापटूंनी जे धवल यश मिळवले, त्याचीच अखंड परंपरा भारतीय क्रिकेटपटूंनी टी-20 विश्वचषक जिंकून कायम ठेवली. आता ‌‘आयपीएल‌’चा हंगाम असून, भारतीय क्रिकेटपटूंना स्वप्न पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकण्याचे पडू लागले आहे. विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाविषयीचा हा आढावा...

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन, नुकतेच दोन ते सात वयोगटातील मुलांसाठीच्या ‌‘रेडी स्टेडी गो किड्स‌’ या 13 वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांसाठी आखलेल्या कार्यक्रमाचे सहसंस्थापक म्हणून भारतात आले होते. ‌‘स्पोर्टस्टार‌’ या प्रसिद्ध क्रीडा मासिकाशी मारलेल्या गप्पांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वचषक स्पर्धेतून इतक्या लवकर बाहेर पडणे, ही ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याची जाणीव त्यांनी करुन दिली. त्याचवेळी वेळेवर जागे होण्याची आता वेळ आल्याचेही त्यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी भारतीय क्रिकेटचे मात्र आवर्जून तोंडभरून कौतुक केले. भारताच्या टी-20 विश्वचषक विजयाबद्दल त्यांनी म्हटले की, “भारतीय क्रिकेटबद्दल माझे एकंदर मत असे आहे की, ते त्यांना अपेक्षित असलेल्या दिशेने जात आहेत. ते जागतिक क्रिकेटचे एक पॉवरहाऊस झाले आहे. या देशातील तरुणांमध्ये विपूल प्रतिभा असून, राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची स्पर्धाही मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही, गुणवत्तेनुसारच खेळाडू त्या पातळीवर निवडले जातात. आणि असेच खेळाडू विश्वचषकाच्या विजयात वाटा उचलताना तुम्हाला दिसू लागले आहेत.”

ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाप्रमाणेच पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यानेही एका मुलाखतीत म्हटले की, “जो संघ उपांत्य आणि अंतिम फेरीत 250 पेक्षा जास्त धावा करू शकतो, तोच संघ चॅम्पियन होण्यास पात्र आहे. भारताचा देशांतर्गत क्रिकेटचा पाया अतिशय मजबूत आहे. त्यांनी क्रिकेटची जी मजबूत संरचना उभारली आहे, त्याचेच हे फळ आहे. भारताकडे सध्या आक्रमक फलंदाज, दर्जेदार फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांची कमतरता नाही.”

या विदेशी क्रिकेट जाणकरांच्या मतांबरोबरच असंख्य भारतीयांनीपण प्रतिक्रिया दिल्या होत्या. पंतप्रधान मोदींची जशी प्रतिक्रिया होती, तशीच सुनील गावस्करची यांचीही होती. त्यात गावसकर म्हणतात, “आयसीसी ट्रॉफी‌’ जिंकणे सोपे नसते. हे यश नशिबाने नाही, तर कौशल्यानेच मिळते. खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो; कारण मैदानात उतरताना ते 100 कोटींहून अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करतात. हा भारतीय क्रिकेटचा आजवरया इतिहासातील सर्वोत्तम काळ आहे.”

दि. 8 मार्च रोजीच्या रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर, भारताने न्यूझीलंडचा पराभव करत टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकला. सारे विश्वच दूरचित्रवाणीवर या स्पर्धेचा आनंद लुटत होते. दूरचित्रवाणीवर या स्पर्धा दाखवण्यात, एका बिस्किट कंपनीचाही प्रायोजकांमध्ये सहभाग होता. अशा मोठ्या स्पर्धांचे प्रायोजकत्व घेणाऱ्यांच्या जाहिरातीमध्ये, अनेकदा आकर्षक वाक्य दाखवण्यात येतात. या वेळेसही असेच वाक्य लोकांच्या पसंतीस उतरलं. ‌‘इतिहास बदलणार आणि इतिहास रचणार,‌’ हे वाक्य रोहित शर्माच्या तोंडी दाखवण्यात आले होते. भारतीय क्रिकेटपटूंनी हे वाक्य, विश्वचषक स्पर्धेत प्रत्यक्षात उतरवले. रोहितची 2026 टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी, ‌‘ब्रॅण्ड ॲम्बेसेडर‌’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त होणारा तो पहिलाच सक्रिय क्रिकेटपटू होता.

भाजपचा माजी खासदार आणि भारतीय संघाचा माजी सलामी फलांदाज असलेला गौतम गंभीर पुरुषांच्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असून, त्याच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय संघाने विश्वचषक मिळवला आहे. सांघिक खेळात कुणीही एकच एक मोठा नसतो. वैयक्तिक विक्रमांच्या दगडांवर नाव कोरण्यापेक्षा, राष्ट्रासाठी चषक पटकावणे आणि विश्वविजयी होणंच जास्त गरजेचं असल्याचं सूत्र घेऊन गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्रे हातात घेतली. गौतम गंभीरने त्याच्या खेळाडूंना एकच मंत्र दिला होता ‌‘बाद झालात तरी चालेल, घाबरून टुकू-टुकू खेळायचं नाही! वैयक्तिक विक्रमासाठी तर बिलकुलच खेळायचं नाही.” अनेकदा भोपळाही फोडू न शकणारा अभिषेक शर्मा संघाबाहेर गेला नाही, की कर्णधार सूर्यकुमार यादव वैयक्तिक फॉर्म नाही म्हणून घाबरलाही नाही. संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, रिंकू सिंग या सगळ्यांच्याच पाठीशी, संघव्यवस्थापन कणखरपणे उभे राहिल्याचे जगाने पाहिले. भारतीय संघाने जगाला निक्षून सांगितलं की, “भारतीय क्रिकेट ही गरीब, कमनशिबी, झगडत जिंकणाऱ्या देशाची गोष्ट राहिली नसून, आता भारत क्रिकेतवर निर्विवाद सत्ता गाजवत आहे. आणि ही सत्ता भारताला मिळाली ती मेहनत, गुणवत्ता, प्रयोग आणि संघभावनेतून!” या विश्वचषकाचं सार एकच आहे, ते म्हणजे संघापेक्षा मोठे कोणीच नाही, अन्‌‍ त्याने जिंकून मिळालेल्या समाधानापेक्षा अन्य काहीच मोठे नाही.

गौतम गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाला की, “मी हा चषक राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण व अजित आगरकर यांना समर्पित करतो. राहुल द्रविडला, कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्याप्रकारे संघ घडवला आहे. लक्ष्मण यांना, कारण त्यांनी पडद्यामागून भारतीय क्रिकेटसाठी जे निरपेक्ष कष्ट घेतले आहेत. ‌‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स‌’ हे टीम इंडियासाठी पाईपलाईन राहिली आहे आणि अजित आगरकर, कारण ज्या प्रामाणिकपणे त्यांनी आपलं काम केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जय शाह. जय शाह हे एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी माझ्या कार्यकाळातील पडत्या वेळेत मला कॉल करून माझ्याशी संपर्क साधला होता.”

गेल्या 23 महिन्यांत आपण महिला विश्वचषक, दृष्टिबाधित महिलांचा विश्वचषक, 19 वर्षांखालील मुलं व मुली अशा दोघांनीही पटकावलेले विश्वचषक, दोन वेळेस टी-20चा विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स करंडक असं सगळं ‌‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा‌’च्या काचेच्या कपाटात मांडलं आहे. हे लक्षण आहे, भारताच्या क्रिकेटमधील ताकदीचे. ही कहाणी एवढेच सांगते की, पिढी बदलली, तरी भारतात गुणवान क्रिकेटपटूंची वानवा कधीही नव्हती आणि असणारही नाही.

टी-20च्या क्रिकेटमध्ये भारतीयांचे वर्चस्व निर्माण होण्याचे श्रेय, इंडियन प्रीमियर लीगलाही द्यावे लागेल. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये शास्त्रशुद्ध खेळाला आता दुय्यम स्थान असते. दोन दशकांपूव भारतात ‌‘आयपीएल‌’चे आगमन झाले, तेव्हा त्याबाबत अनेकांनी नाकं मुरडण्यास पुढाकार घेतला होता. पण, महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय क्रिकेटने टी-20चा विश्वचषक जिंकला. त्यापाठोपाठ ‌‘आयपीएल‌’ने क्रिकेटची प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची मजा आणण्याची, त्यांना पुन्हा त्या क्रिकेटकडे खेचून आणण्याची क्षमता वाढवली. भारतीय क्रिकेटची आर्थिक घडी मजबूत केली. हळूहळू या क्रिकेटमध्ये असणारी चौकार-षटकारांची आतषबाजी आणि या क्रिकेटच्या नव्या रुपाची गतिमाता लोकांच्या पसंतीस उतरायला लागली. टी-20चा विश्वचषक पटकवल्यावर, क्रिकेटप्रेमी आता ‌‘आयपीएल‌’च्या चर्चेत गुंगले आहेत. यावषच्या ‌‘आयपीएल‌’चे हे 19वे पर्व दि. 28 मार्च ते दि. 12 एप्रिल या कालावधीत पार पडत आहे. ‌‘आयपीएल‌’चे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले असून तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल यांच्या निवडणुकांच्या तारखा ठरल्यानंतर, पुढील वेळापत्रक समजेल. एका सकाळी वृत्तपत्रीय लेखात वाचलेले शब्द मला आवडले, जुन्याजाणत्यांच्या अनुपस्थितीत नुकत्याच हाताबुडी आलेल्या पिढीने घराणे, शेतीवाडी आणि वाड्याहुड्यांची निगुतीने जपणूक करावी; नव्हे, त्यावर सोन्याची कौले चढवावीत, हे बघितले की वाडवडिलांना मोठे सौख्य मिळते! हेच कृतकृत्यतेचे सौख्य भारतीय क्रिकेटप्रेमींना, गेल्या 23 महिन्यांत पुरेपूर मिळाले आहे. ‌‘आयपीएल‌’ हा तर टी-20 क्रिकेटचा वैश्विक उत्सवच! अभिजात क्रिकेटची उठाठेव करायला इथे वेळ आहे कोणाला?

आखाती युद्धाचे काय परिणाम क्रिकेटवर होत आहेत, ते लक्षात येऊ लागतीलच. ‌‘आयपीएल‌’वर त्याचे परिणाम होवो वा न होवो; पण क्रिकेटपटू आता 2027 एकदिवसीय विश्वचषक, 2028 ऑलिम्पिक, 2028 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी या सगळ्यावर लक्ष केंद्रित करून, आता भारतीय क्रिकेटचा जागतिक स्तरावर मोठा डंका वाजवण्यासाठी सज्ज होत आहेत. ते तिकडे डंका पिटतील आणि भारतीय क्रिकेटप्रेमी ढोल-ताशे वाजवत आनंद व्यक्त करत राहतील. हा आनंद असाच निरंतर साजरा करत राहायला मिळो, ही आपल्या सगळ्यांची इच्छा क्रिकेटदेव सकळ संपन्न करो.

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
942203170

Powered By Sangraha 9.0