मुंबई: (Asiatic Society) 'एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई'च्या निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी दिलेली स्थगिती उच्च न्यायालयानेही कायम ठेवली आहे. सोसायटीच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत आणि १४ मार्चच्या निवडणुकीसाठीचा कोणताही निवडणूक कार्यक्रम न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही, असे निरीक्षण नोंदवून धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. (Asiatic Society)
एकदा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर, न्यायालयांनी साधारणपणे त्यात हस्तक्षेप न करण्याचे प्रस्थापित कायदेशीर तत्त्व आहे. तथापि, सध्याच्या प्रकरणात १४ मार्चच्या निवडणुकीसाठीचे कोणतेही वेळापत्रक सादर करण्यात आले नव्हते, असे न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने धर्मादाय आयुक्तांचा आदेश योग्य ठरवताना स्पष्ट केले. धर्मादाय आयुक्तांचा कार्यकारी आदेश शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता कळवण्यात आला होता आणि त्याद्वारे दुसऱ्या दिवशी नियोजित असलेल्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यांना १४ मार्चच्या निवडणुकीचा कार्यक्रम सादर करण्यास सांगितले असता, त्यांनी ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या सूचनेची प्रत न्यायालयात सादर केली. परंतु, ही सूचना १४ मार्च २०२६ नाही, तर ८ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित असलेल्या निवडणुकीशी संबंधित होती. तसेच, पूर्वीचा निवडणूक कार्यक्रम सध्याच्या निवडणुकीला लागू होईल, हे दर्शवणारा कोणताही दस्तऐवज सादर करण्यात आलेला नाही, असे निरीक्षण देखील एकलपीठाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारताना नोंदवले. (Asiatic Society)
मागची अनेक महिने रखडलेल्या एशियाटिक सोसायटीची निवडणूक १४ मार्च रोजी संपन्न होणार होती. मात्र अशातच, मतदार यादीतील गोंधळामुळे पुन्हा एकदा ही निवडणूक स्थगित करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयानंतर सोसायटीचे सदस्य दीपक तानाजी पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, धर्मादाय आयुक्तांनी निवडणुकीला स्थगिती देण्याच्या आणि वैध व पात्र मतदारांची यादी तयार करण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्याच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. (Asiatic Society)
तथापि, न्यायमूर्ती फरहान दुबाष यांचे नियमित एकलपीठ उपलब्ध नसल्याने न्यायमूर्ती जैन यांच्या एकलपीठापुढे ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सादर करण्यात आली. त्यावेळी, याचिकेवर सविस्तर सुनावणी घेण्यात आली धर्मादाय आयुक्तांनी एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती का दिली असा प्रश्न एकलपीठाने उपस्थित केला तसेच, हा आदेश कोणत्या परिस्थितीत देण्यात आला हे समजून घेण्यासाठी न्यायालयाने धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्याशी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे (व्हीसी) संवाद साधला. त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या निरीक्षकांच्या मदतीने व्यवस्थापन मंडळातील पाच सदस्यांची उप समिती या पुढे संस्थेचा दैनंदिन कारभार पाहणार आहे. या समितीची बैठक आज दुपारी पार पडणार असून, त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाणार आहे. (Asiatic Society)