संघर्षातून उजळली कलेची वाट

16 Mar 2026 12:44:20

‌‘कलाई सरल नॅशनल युवा महोत्सव, चेन्नई‌’ या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बाजी मारणाऱ्या मनोज चव्हाण यांच्याविषयी...

काही व्यक्तींच्या आयुष्यात कला ही केवळ छंद नसते, तर ती त्यांच्या अस्तित्वाचाच अविभाज्य भाग होते. अशाच एका जिद्दी आणि प्रतिभावान युवकाची म्हणजेच मनोज नारायण चव्हाण यांची ही कथा. सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाने, आपल्यातील कलेच्या बळावरच केवळ स्पर्धाच जिंकल्या नाहीत, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनोज यांचे बालपण अत्यंत साध्या वातावरणात गेले. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण तमनाथ येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यांचे वडील संतोष स्टोन कंपनीमध्ये मजूर म्हणून काम करतात. जीवनातील संघर्ष आणि मेहनतीचे महत्त्व मनोज यांना लहानपणीच जाणवले.

मेहनतीबरोबरच मनोज यांच्या आयुष्यात कलेचे बीजही लहानपणीच रोवले गेले. मनोज यांची मोठी बहीण सीमाताई यांना चित्रकलेची विशेष आवड होती. त्यामुळे त्या नेहमीच विविध चित्रे रेखाटत असत. ते पाहून, मनोज यांना एक वेगळीच उत्सुकता वाटे. बहिणीच्या चित्रकलेतील त्या रंग आणि रेषांची भूरळ मनोज यांच्या मनावर पडली. हळूहळू मनोज यांनी स्वतः चित्र काढण्यास सुरुवातही केली. त्यावेळी कदाचित त्यांना कल्पना नसावी की, ही आवडच पुढे त्यांचे आयुष्य घडवणार आहे.

इयत्ता आठवीत मनोज यांनी प्रथमच एका रांगोळी स्पर्धेत भाग घेतला. ही त्यांची पहिलीच मोठी स्पर्धा होती. त्या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या कलाविश्वातील प्रवासासाठी, हाच क्षण कारणीभूत ठरला. त्यानंतर मनोज यांनी अनेक जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. प्रत्येक स्पर्धेतून त्यांनी अनुभव आणि पारितोषिके मिळवत, आपली कला अधिकाधिक परिपक्व केली. कलेसोबतच त्यांनी अभ्यासालाही तितकेच महत्त्व दिले. यामुळेच दहावीच्या परीक्षेत त्यांनी 84 टक्के गुण मिळवले.

मात्र, याच टप्प्यावर त्यांच्या आई-वडिलांनी पुढील शिक्षणासाठी वेगळी दिशा निवडण्याबाबत सुचवले. यामुळे मनोज यांच्यासाठी जणू कलेचा दरवाजाच बंद झाला होता. मनोज यांनी मुंबईतील ‌‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌’मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न बघितले होते. परंतु, केवळ दोन गुणांच्या फरकामुळे हे स्वप्न अपूर्णच राहिले.

या अपयशाने ते निराश झाले, पण त्यांनी हार मानली नाही. पुढे त्यांनी ‌‘बीएस्सी‌’मध्ये प्रवेश घेतला. याच काळात त्यांना स्वप्नाली पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी मनोज यांच्या कलेची दखल घेत, त्यांच्या मनात रांगोळी कलेबद्दल आत्मविश्वास निर्माण केला. याच काळात त्यांना ‌‘युवा महोत्सव‌’ हे मोठे व्यासपीठही मिळाले.

रायगड झोनमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपली कला सिद्ध केली. विद्यापीठाच्या अंतिम फेरीत तिसऱ्या वष त्यांनी, पोस्टर मेकिंग आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे मनोज यांची निवड विभागीय आणि राष्ट्रीय निवड फेरीसाठी झाली. मुंबईचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी त्यांची पुढे निवड केली.

स्टेट आणि पश्चिम विभागीय स्तरावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली. त्याचबरोबर रांगोळी आणि कोलाजमध्ये त्यांनी, मुंबई विद्यापीठाचेही प्रतिनिधित्व केले. मात्र, त्या स्पर्धेत त्यांच्या कलेला अपेक्षित न्याय मिळाला नाही. हा क्षण त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता, पण जिद्द हीच त्यांची खरी ताकद होती. रांगोळीच्या निकालावर आक्षेप नोंदवण्यात आला आणि ‌‘एआययू‌’च्या ममता अग्रवाल यांच्या माध्यमातून, त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोन्यात रूपांतर केले. वर्ष 2025 मध्ये अमिटी येथे आयोजित ‌‘नॅशनल युथ फेस्टिवल‌’मध्ये विलास रहाटे आणि केशर चोपडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मनोज यांनी रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. हे त्यांच्या कलाप्रवासातील अत्यंत महत्त्वाचे यश.

यानंतर 2026 मध्ये पश्चिम विभागीय स्पर्धेत त्यांनी कोलाजमध्ये प्रथम क्रमांक आणि रांगोळीत तृतीय क्रमांक मिळवला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळाली आणि यावेळी त्यांनी इतिहास घडवला. नुकत्याच चेन्नई येथे संपन्न झालेल्या ‌’कलाई सरल नॅशनल युवा महोत्सवात‌’ मनोज यांनी, रांगोळी आणि कोलाज या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. इतकेच नव्हे, तर फाईन आर्ट्समधील ओव्हरऑल ट्रॉफीही त्यांनी जिंकली. तसेच ‌‘कल्चरल प्रोसेशन‌’ अर्थात सांस्कृतिक रॅलीमध्येही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

आज मनोज चव्हाण ‌‘एमएस्सी‌’ (ऑरगॅनिक केमिस्ट्री)चे शिक्षण घेत असून, विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच कलेची आवडही ते जोपासत आहेत. पुढे शिक्षक होण्याचे स्वप्न मनोज यांनी उराशी जपले आहे. त्यांच्या मते, कला ही केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता, ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

मनोज यांच्या प्रवासातून आपल्याला एक संदेश मिळतो की, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर नवी वाट नक्की सापडते. त्यांच्या हातातील रंग, रेषा आणि कल्पनाशक्ती प्रेरणेची एक नवी कहाणी लिहित आहेत. भविष्यात त्यांच्या कलेतून उभ्या राहणाऱ्या असंख्य रांगोळ्या, अनेक तरुणांच्या आयुष्यातही स्वप्नांचे रंग भरणाऱ्या ठरतील. मनोज यांना त्यांच्या पुढील यशासाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून अनेकानेक शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0