मुंबई : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 98व्या अकॅडमी अवॉर्ड्सचा भव्य सोहळा पार पडला. मध्य आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. जगभरातील चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार रेड कार्पेटवर झळकले. भारतीय चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरली ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिने यंदा प्रेझेंटर म्हणून सहभाग घेतला होता.
या वर्षी 'वन बॅटल अफ्टर अनादर' (One Battle After Another) या चित्रपटाने सर्वाधिक 6 पुरस्कार पटकावत सोहळ्यात बाजी मारली. या चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन (Paul Thomas Anderson) यांना बेस्ट डायरेक्टर तसेच बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर मिळाला, तर चित्रपटालाच बेस्ट पिक्चरचा मान मिळाला. दुसरीकडे सिन्नर्स (Sinners) या चित्रपटाला सर्वाधिक 16 नामांकने मिळाली होती. या चित्रपटासाठी Michael B. Jordan यांना बेस्ट अॅक्टरचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. तसेच बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफीसह या चित्रपटाने एकूण चार पुरस्कार जिंकले.
बेस्ट अॅक्ट्रेसचा ऑस्कर Jessie Buckley यांना हॅम्नेट (Hamnet) या चित्रपटातील अभिनयासाठी मिळाला. तर बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा पुरस्कार Sean Penn यांना ‘वन बॅटल आफ्टर अनादर’साठी मिळाला. बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसचा ऑस्कर Amy Madigan यांनी वेपन्स (Weapons) या चित्रपटासाठी पटकावला.
दरम्यान, 'अवतार: फायर एंड ऐश' (Avatar: Fire and Ash) या चित्रपटाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार मिळाला. तर बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा ऑस्कर Sentimental Value या चित्रपटाने जिंकला.
यंदाच्या ऑस्करमध्ये भारताला मोठे यश मिळाले नाही. दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या 'होमबाऊंड' (Homebound) या चित्रपटाला अंतिम नामांकनात स्थान मिळू शकले नाही. तसेच भारतीय-अमेरिकी निर्माती गीता गांधबीर यांच्या दोन्ही डॉक्युमेंटरी चित्रपटांना पुरस्कार मिळू शकला नाही.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉमेडियन Conan O'Brien यांनी केले. भव्य वातावरण, तगडी स्पर्धा आणि अनेक मोठ्या घोषणांमुळे यंदाचा ऑस्कर सोहळा विशेष ठरला.