अवकाश संशोधनातील पाश्चात्त्य महिलांचे योगदान

15 Mar 2026 16:21:22

मानवाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान वादातीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या महिलांनी, खगोलशास्त्रामध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. काळाच्या ओघात त्यांच्या योगदानाला उशिरा सन्मान मिळाला असला, तरीही त्यांच्या योगदानाचे महत्त्व हे कायमच विज्ञानाला दिशा देणारे ठरले. पाश्चात्य देशातील महिलांनी खगोलशास्त्रामध्ये दिलेल्या योगदानाचा घेतलेला आढावा...

मानवाने आकाशाकडे पाहत विश्व समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा खगोलशास्त्र ही केवळ विज्ञान शाखा नव्हती; तर तो अस्तित्वाविषयीचा मूलभूत शोध होता. हजारो वर्षे हा शोध पुरुषप्रधान इतिहासातून मांडला गेला; परंतु प्रत्यक्षात विश्वाच्या अभ्यासात महिलांचे योगदान अत्यंत खोल आणि निर्णायक राहिले आहे. प्राचीन निरीक्षण परंपरेपासून आधुनिक अवकाश दुर्बिणी आणि अंतराळ मोहिमांपर्यंत, जगभरातील महिलांनी खगोलशास्त्राच्या विकासाला दिशा दिली. त्यामुळे ‌‘महिला दिना‌’च्या निमित्ताने, या योगदानाचा प्राचीन ते आधुनिक असा व्यापक आढावा घेणे आवश्यक ठरते.

प्राचीन संस्कृतींमध्ये आकाशनिरीक्षण हे शेती, कालमापन आणि नौकानयनाशी जोडलेले होते. इजिप्त, ग्रीस आणि मेसोपोटेमिया संस्कृतींमध्ये महिलांचा विद्वत्तापूर्ण सहभाग दिसून येतो. चौथ्या-पाचव्या शतकातील अलेक्झांड्रिया येथे कार्य करणारी हायपेशिया, ही इतिहासातील पहिल्या नोंदलेल्या महिला गणितज्ञ आणि खगोल विचारकांपैकी एक मानली जाते. ग्रहांच्या गतीविषयीचे ‌‘गणिती मॉडेल‌’ समजावून सांगणे, खगोलनिरीक्षण उपकरणांची सुधारणा आणि वैज्ञानिक शिक्षणामध्ये तिचे योगदान उल्लेखनीय होते. वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार करताना, तिने तर्कबुद्धीला धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा प्राधान्य दिले आणि त्यामुळे ती वैज्ञानिक स्वातंत्र्याचे प्रतीक ठरली. परंतु, त्यावेळी अलेक्झांड्रियातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इ.स. 415 मध्ये ख्रिस्ती जमावाने तिची हत्या केली.

मध्ययुगीन युरोपमध्ये विज्ञानसंशोधन संस्थात्मक स्वरूपात विकसित होत असताना, महिलांना औपचारिक प्रवेश मर्यादित होता. तरीही, जर्मनीतील खगोल निरीक्षणे करणाऱ्या मारिया विंकेलमन यांनी धूमकेतूचा शोध लावला. परंतु, त्या काळातील सामाजिक संकेतांमुळे, शोधाचे श्रेय त्यांच्या पतीला देण्यात आले. हा प्रसंग विज्ञान इतिहासातील लिंगभेदाचे स्पष्ट उदाहरण मानला जातो. खगोल निरीक्षणातील अचूकता आणि सातत्यपूर्ण नोंदी ठेवण्यामध्ये महिलांचे योगदान असूनही, त्यांची ओळख अनेकदा पुसली गेली.

18व्या आणि 19व्या शतकात दुर्बिणींच्या विकासामुळे, निरीक्षणात्मक खगोलशास्त्रात क्रांती झाली आणि येथे महिलांची भूमिका अधिक स्पष्ट झाली. ब्रिटनमधील कॅरोलिन हर्शेल यांनी अनेक धूमकेतू शोधले, तसेच ताऱ्यांची सूची तयार करण्यात महत्त्वपूर्ण काम केले. त्या राजदरबारी वेतन घेणाऱ्या पहिल्या महिला खगोल-संशोधक ठरल्या. त्यांचे कार्य आधुनिक ताऱ्यांच्या वर्गीकरणाच्या पायाभूत टप्प्यांपैकी एक मानले जाते. याच काळात अमेरिकेत उदयास आलेल्या हार्वर्ड कम्प्युटर्स या महिला संशोधकांच्या समूहाने, आधुनिक खगोलशास्त्राची दिशा बदलली. विल्यमिना फ्लेमिंग, ॲलनी जंप कॅनन आणि हेन्रियेटा लेव्हिट यांनी, ताऱ्यांच्या वर्णपटांचा अभ्यास करून ‌‘तारकावर्गीकरण‌’ प्रणाली विकसित केली. विशेषतः लेव्हिट यांनी ‌‘सेफिड‌’ चलताऱ्यांच्या प्रकाशमानता आणि कालावधी यांतील संबंध शोधून काढला. या शोधामुळे आकाशगंगांमधील अंतर मोजण्याची पद्धत विकसित झाली आणि विश्वाच्या आकाराविषयीचे आकलन पूर्णपणे बदलले. पुढे एडविन हबल यांनी विश्व विस्तारत असल्याचा निष्कर्ष मांडण्यासाठी, याच कार्याचा आधार घेतला. 20व्या शतकाच्या प्रारंभी सेसिलिया पेन-गॅपॉश्किन यांनी, तारकांची रासायनिक रचना समजावून सांगणारा क्रांतिकारी सिद्धांत मांडला. ‌‘सूर्य आणि इतर तारे मुख्यतः हायड्रोजन आणि हीलियमपासून बनलेले आहेत‌’, हा आज स्वीकृत असलेला निष्कर्ष त्यांच्याच संशोधनातून समोर आला. सुरुवातीला त्यांच्या निष्कर्षांवर शंका घेतली गेली; परंतु पुढे तो आधुनिक खगोल-भौतिकीचा मूलभूत पाया ठरला.

आकाशगंगांच्या संरचनेचा अभ्यास करताना, व्हेरा रुबिन यांनी केलेले संशोधन आधुनिक ‌‘विश्वरचनाशास्त्रा‌’तील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक मानले जाते. आकाशगंगा अपेक्षित वेगाने फिरत नाहीत हे निरीक्षण करत, त्यांनी अदृश्य पदार्थ म्हणजेच ‌‘कृश द्रव्य‌’ अस्तित्वात असल्याचे ठोस पुरावे दिले. आज विश्वातील बहुतांश वस्तुमान अदृश्य स्वरूपात आहे, ही संकल्पना त्यांच्या संशोधनामुळे दृढ झाली. आपल्या संशोधनकार्याबद्दल आयुष्यभर सन्मानित झालेल्या व्हेरा रुबिन यांना ‌‘ब्रूस‌’ पदक, ‌‘रॉयल ॲसस्ट्रॉनॉमिकल सोसायटी‌’चे ‌‘सुवर्ण‌’ पदक आणि ‌‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स‌’ प्रदान करण्यात आले असून, चिलीतील व्हेरा सी. रुबिन वेधशाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.‌‘विश्वरचनाशास्त्रा‌’त त्यांनी कोपर्निकससारखा मूलभूत बदल घडवून आणला, असे मानले जाते. असे असूनही, ‌‘नोबेल‌’ पारितोषिकासाठी त्यांची उपेक्षा झाल्याची टीकाही करण्यात आली आहे. उच्च ऊर्जा खगोलशास्त्रात जोसलिन बेल बर्नेल यांनी, ‌‘पल्सार‌’ या विलक्षण आकाशीय वस्तूंचा शोध लावला. रेडिओ संकेतांमधील नियमित स्पंदनांचा अभ्यास करताना, त्यांनी ‌‘न्यूट्रॉन‌’ ताऱ्यांच्या अस्तित्वाचे निरीक्षण केले. या शोधामुळे तारकांच्या उत्क्रांतीविषयीचे ज्ञान आमूलाग्र बदलले. ‌‘नोबेल‌’ पारितोषिक त्यांच्या मार्गदर्शकांना मिळाले, त्यांना डावलले गेले; तरी वैज्ञानिक समुदायाने पुढे त्यांच्या योगदानाची व्यापक दखल घेतली.

‌‘अवकाश युग‌’ सुरू झाल्यानंतर महिलांनी पृथ्वीबाहेरील संशोधनातही ऐतिहासिक भूमिका बजावली. सोव्हिएत संघातील व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा या अवकाशात जाणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर सॅली राईडया अमेरिकेच्या पहिल्या महिला अंतराळवीर बनल्या. अवकाशातील सूक्ष्मगुरुत्व प्रयोग, पृथ्वी निरीक्षण आणि उपग्रह प्रणालींच्या चाचण्यांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला. पुढे एलीन कॉलिन्स या ‌‘स्पेस शटल‌’च्या पहिल्या महिला कमांडर ठरल्या, ज्यामुळे अवकाश मोहिमांमधील नेतृत्वस्तरावर महिलांचा प्रवेश दृढ झाला. आधुनिक काळात अवकाश दुर्बिणी आणि ग्रहसंशोधन मोहिमांमध्ये महिलांचे नेतृत्व विशेषत्वाने दिसते. नॅन्सी ग्रेस रोमन यांना ‌‘हबल‌’ अवकाश दुर्बिणीची जननी म्हणून ओळखले जाते. अवकाशाधारित दुर्बिणीची संकल्पना प्रत्यक्षात आणून त्यांनी, पृथ्वीच्या वातावरणाबाहेरून विश्व-निरीक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात केली. आज दूरस्थ आकाशगंगा, कृष्णविवरे आणि ग्रहजन्म प्रक्रियेचा अभ्यास शक्य होण्यामागे त्यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे.

मंगळ ग्रह संशोधनात डायना ट्रुजिलो यांसारख्या संशोधकांनी, ‌‘रोव्हर‌’ मोहिमांच्या संचालनात महत्त्वाची भूमिका निभावली. ग्रहांच्या पृष्ठभागावरील भूगर्भीय बदल समजून घेणे आणि भविष्यातील मानवी मोहिमांसाठी माहिती संकलित करणे, याप्रक्रियेत महिला संशोधक अग्रभागी आहेत. युरोपियन अवकाश संस्थेतील संशोधकांनी धूमकेतू आणि लघुग्रह मोहिमांमध्ये, वैज्ञानिक उपकरण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

आजचे खगोलशास्त्र हे बहुविषयक विज्ञान बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय अनुकरण, विशाल डेटा विलेषण आणि बिनतारी संकेत प्रक्रिया यांवर आधारित संशोधनामध्ये महिलांची उपस्थिती झपाट्याने वाढत आहे. गुरुत्वीय तरंग शोधप्रकल्प, एक्सोप्लॅनेट शोधमोहिमा आणि कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी विकिरण अभ्यासामध्ये महिला संशोधक प्रमुख भूमिका बजावत आहेत. विज्ञान-प्रसार क्षेत्रातही महिलांची व्याख्याने, विज्ञान लेखन, डिजिटल माध्यमे आणि शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे खगोलशास्त्र लोकाभिमुख झाले. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेतील कार्य नसून, सामाजिक जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया आहे, हे त्यांनी सिद्ध केले. ‌‘उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः|‌’ केवळ इच्छा करून नव्हे, तर प्रयत्नांमुळेच कार्य सिद्ध होते.

विश्व समजून घेण्याचा मानवी प्रयत्न हा सततच्या जिज्ञासेचा आणि चिकाटीचा परिणाम आहे. इतिहासातील अदृश्य योगदानापासून आधुनिक अवकाश मोहिमांतील नेतृत्वापर्यंत महिलांनी, विज्ञानाच्या या प्रवासाला नवी दिशा दिली आहे. आज जगभरातील महिला संशोधक आकाशगंगांची निर्मिती समजावतात, कृष्णविवरांचे गणित मांडतात, ग्रहांवर ‌‘रोव्हर‌’ चालवतात आणि विश्वाच्या उगमाविषयी नवे प्रश्न उपस्थित करतात. खगोलशास्त्राचा इतिहास आज पुन्हा लिहिला जात आहे आणि या नव्या इतिहासात महिलांचे योगदान परिघावर नव्हे; तर केंद्रस्थानी आहे. मानवाने विश्वाचा शोध घेताना स्वतःची मर्यादा ओलांडली आणि त्या शोधयात्रेत महिलांनी ज्ञानाला नवा विस्तार दिला. अनंत विश्वाचा अभ्यास अजून अपूर्ण आहे; परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, भविष्यातील विश्वशोधाच्या प्रत्येक मोठ्या टप्प्यावर महिलांची छाप अधिक ठळकपणे दिसणार आहे.


- सुजाता बाबर

Powered By Sangraha 9.0