उरी (जम्मू-काश्मीर) : (Pakistani Terrorist Killed) जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईदरम्यान एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार करण्यात आले. नियंत्रण रेषेजवळ (LoC) संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन DIGGI-2’ अंतर्गत ही मोहीम सुरू केली. सध्या संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे १४ आणि १५ मार्चच्या मध्यरात्री उरी सेक्टरमधील बुछार परिसरात संयुक्त मोहीम राबवण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना जवानांना झुडुपांमध्ये एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. त्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराला वेढा घालत त्या व्यक्तीला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.
दहशतवाद्याकडून गोळीबार, चकमकीत खात्मा
मात्र आत्मसमर्पण करण्याऐवजी त्या दहशतवाद्याने जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर भारतीय जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत कारवाई केली. काही काळ चकमक सुरू राहिल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्याचा खात्मा केला. चकमकीनंतर परिसरात अधिक तपासणी आणि शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
शस्त्रसाठा जप्त
कारवाईनंतर घटनास्थळाची तपासणी करताना सुरक्षा दलांना ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK रायफल, एक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे उरी सेक्टरमध्ये संभाव्य मोठी घुसखोरी रोखण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का याची खात्री करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
पूंछमध्ये ऑपरेशन शेरीकलांदरम्यान जवान शहीद
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन शेरीकलां’ दरम्यान एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) शहीद झाले. शहीद जवानाचे नाव सुभेदार संदीप कुमार ढाका असे आहे. ते सुरणकोट परिसरात तैनात होते.
कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू
व्हाईट नाईट कोअरने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे २.३० वाजता ऑपरेशनदरम्यान उंचसखल आणि खडबडीत भागात गस्त घालत असताना सुभेदार संदीप कुमार ढाका यांचा तोल गेला आणि ते घसरून पडले. त्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सहकारी जवानांनी त्यांना तात्काळ पोथा येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.