गोरखा, गंडकी प्रांत, नेपाळ : (Nepal Bus Accident) नेपाळमधून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनकामना मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भारतीय प्रवाशांची बस गोरखा जिल्ह्यातील डोंगराळ रस्त्यावरून जाताना अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी घडला असून, ७ भारतीय नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आणि ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
जखमींवर उपचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांना घेऊन जाणारी ही मायक्रोबस मनाकामना मंदिरातून परत येत असताना रस्त्यावरून घसरून 200 फूट खोल दरीत कोसळली. ‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार, या भीषण अपघातातून ७ प्रवासी सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. जखमींवर प्राथमिक उपचार आंबूखैरेनी येथील स्थानिक रुग्णालयात करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी काठमांडूतील प्रमुख रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात बसचा चालक वाचला असून, त्याचा सहाय्यक गंभीर जखमी झाला आहे.
मृतांचा तपशील
गोरखा जिल्ह्याच्या ट्रॅफिक पोलीस कार्यालयाचे प्रमुख सूरज आर्यल यांनी सांगितले की, मृतांमध्ये ५ पुरुष आणि २ महिला आहेत. मृतांची नावे अशी आहेत: मुथु कुमार (५८), अनामलिक (५८), मीनाक्षी (५९), शिवगामी (५३), विजयल (५७), मीना (५८) आणि तमिलारसी (६०). भारतीय दूतावासाकडून मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघाताची कारणे
प्राथमिक तपासानुसार, हा अपघात तांत्रिक बिघाड किंवा वळणावरील वेगामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोरखा जिल्ह्याचे रस्ते डोंगराळ आणि अरुंद असल्याने अपघात होण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. पोलीस अद्याप अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत.
रस्त्यांच्या सुरक्षेवर प्रश्न
नेपाळमधील डोंगराळ रस्त्यांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अरुंद वळणे, खडबडीत मार्ग आणि अपुरे सुरक्षेचे उपाय अनेकदा जीवघेणी ठरतात. या घटनेमुळे नेपाळमधील पर्यटन आणि तीर्थयात्रिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
ही दुर्घटना भारतीय तीर्थयात्रिकांसाठी मनकामना दर्शनाचा आनंद दुःखात बदलणारी ठरली असून, मृत आणि जखमी प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी घटना ठरली आहे.