
आयुष्यात लाभलेले तन, मन आणि धनही आपल्या ध्येयासाठी कसे अर्पण करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोहनराव आळवणी होय! मोहनराव यांचे नुकतेच वयाच्या ९२व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
सार्वजनिक थोरामोठ्यांच्या यादीत आणि प्रसारमाध्यमांच्या झगमगाटात कोठेच न दिसणाऱ्या मोहनरावांच्या, संघासाठी केलेल्या कामाला समजून घेण्यासाठी मोजपट्टी कशी आणि कोणती लावायची, हाच प्रश्न आहे. अभियंता पदवीनंतर अल्प काळ नोकरी आणि छोटासा व्यवसाय संपवून, ते वानप्रस्थ व सन्यस्थ झाले; हे त्यांनी कधीही कोणाला कळूही दिले नाही. त्यात प्रथम 17 वर्षांच्या प्रयत्नांनंतर ‘ज्ञानदा प्रतिष्ठान’ ही संस्था स्वतःच्या पायावर उभी राहणारी होताच, त्या संस्थेतून ते बाहेर पडले आणि परिवारातील ज्या छोट्या-मोठ्या संस्था काही समस्यांत आहेत, त्यांच्या मदतीला लागले. चांगल्या संस्थांना मदत मिळवून देणे, हा एक चांगलाच उपक्रम असतो. पण मोहनराव आळवणी यांचे वैशिष्ट्य असे की, प्रथम एक-दोन लाखांची स्वतःची मदत द्यायची व नंतर योग्य व्यक्तींकडूनही देणग्या गोळा करून, त्यांना स्वावलंबी करायचे. अशा अनेक संस्थांचे ते कालपर्यंत आधार होते. असे आर्थिक मदतीचे विविध प्रयोग ते सतत करत राहिले. अधिकाधिक स्वयंसेवकांच्या मनात राष्ट्रभावना आणि सुसंस्कार कायम बिंबत राहावा, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न स्पृहणीय असेच. संस्थांना मोठे करण्यापासून श्रीरामजन्मभूमीची कारसेवा, इ.स. 2005ची त्सुनामी आपत्ती, ‘कोविड’ कालखंडातील जनसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभाग हे तर त्यांचे वैशिष्ट्य आहेच, पण घराभोवतीच्या जागेत बाग कशी विकसित करावी, यापासून शिबिरातील स्वयंपाक, घरचा उत्कृष्ट स्वयंपाक यातही त्यांची निपुणता वाखाणण्यासारखी होती.
नव्या सहस्रकाचा आरंभ होणारे इ.स. 2000 हे साल, हे अनेक अर्थांनी लक्षणीय होते. पण मोहनरावांनी एक पैलू उचलला आणि एक विक्रम केला. इ.स. 2000 हे साल ‘वन्दे मातरम्’ला 125 वर्षे पूर्ण होणारे होते. त्यावर्षी 65 शाळांना एकत्र करून, त्यांतील 11 हजार मुलांचे एकत्र ‘वन्दे मातरम्’ गायन घडवून आणले. असे मोठमोठे प्रयोग करताना, आपल्या भोवतालच्या सेवावस्तीतील मुलांच्या अभ्यासास काही अडचण आहे का? यावर त्यांची बारिक नजर असे. वसतिगृहेही न परवडणाऱ्यांना काही सोय करून देणे, कोणाला महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून देणे. परगावहून आलेल्या मुलांच्या त्यांच्या काही व्यवस्था असतातच, पण तरीही सायकल नादुरुस्त झाली, तर दुरुस्तीला पैसे नसतात. अनेक मुलांचे भोजनाच्या व्यवस्थेतून पोट भरत नाही. रविवारी सकाळी सर्वत्र ‘फीस्ट’ असल्याने, संध्याकाळच्या अनेकांची पंचाईत असते. तेथे मोहनराव काहीतरी शिदोरी घेऊन हजर असत. कोणाचे कपडे, चपला फाटले आहेत यावरही त्यांची नजर असे. अभ्यासासाठी नवी-जुनी पुस्तके उपलब्ध करून देणे, वह्या, प्रयोगशाळा-उपकरणे हेही ते काळजीने बघत.
मोहनराव यांच्या कामाची संपूर्ण माहिती जरी घेतली, तरी सामान्य माणसालाही त्यातून प्रेरणा मिळेल. पण श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘टेक केअर ऑफ एव्हरी स्वयंसेवक ॲण्ड परं वैभवं विल टेक केअर ऑफ इट्स ओन’ याची प्रचितीही मोहनराव यांच्या कामातून होते. मोहनराव तसे मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आले होते. मूळ धारवाडहून ते अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी पुण्यात आले. संघाशी त्यांच्या केव्हा व कसा संबंध आला, याची फारशी माहिती उपलब्ध नाही. बहुदा तो धारवाडपासूनच असावा. त्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय हे करताना संघाच्या उपक्रमात सहभाग घेणे, हा त्यांचा पुण्यात आल्यापासूनचाच परिचय होता. शिक्षण पूर्ण करणे, नंतर दहा वर्षे नोकरी करणे आणि नंतर काही वर्षे व्यवसाय करून ते आयुष्याची बेगमी करून, सारे उद्योग सोडून संघाच्या कामालाच लागले. संघाने पश्चिम उपनगरात ‘ज्ञानदा प्रतिष्ठान’ नावाची शिक्षण संस्था उभी करून, त्याची जबाबदारी मोहनराव यांच्यावर सोपवली होती. आज ‘ज्ञानदा’ एक नामवंत शिक्षणसंस्था आहे. या संस्थेची चार मजली इमारत तर उभी राहिलीच, पण त्या भागातील प्रत्येक घराशी संबंध आला. प्रत्येकाला संघपरिवाराशी जोडण्याचे कार्य त्यातून घडले. त्या भागात अनेक शाखादेखील सुरू झाल्या. या साऱ्यापेक्षा मोहनराव यांचे वैशिष्ट्य निराळेच होते. प्रत्येक शिक्षण संस्थेला प्रथम शासकीय अनुदान मिळत नाही, ते मिळवण्यात त्यांना यश मिळाले. संस्थेत प्रत्येक विषयांच्या प्रयोगशाळा झाल्या. या शाळांना संगणकापासून देशविदेशांतील सर्व संधींचा मार्ग मिळवण्याचे मार्ग उपलब्ध करण्याचे कार्य तर त्यांनी केलेच, पण जेव्हा त्या संस्थेला स्वयंपूर्णतेचा आत्मविश्वास आला, तेव्हा त्या संस्थेतून बाहेरही पडले.
‘ज्ञानदा प्रतिष्ठान’ ही एक संस्था स्वयंपूर्णपणे उभी केल्यावर, आता नवी संस्था उभी करण्यापेक्षा ज्या चांगल्या संस्था अडचणीत आहेत, त्यांना मदत करण्यासही त्यांनी आरंभ केला. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक संस्थांना मदत तर मिळत असेच, पण संघ त्यांच्या अंतःकरणात किती खोलवर मुरला आहे, याची प्रचितीही येत असे. स्वतःची व्यावसायिक गरज संपल्यावर त्यांनी स्वतःच चारचाकी मोटार विकली व एक सुबकशी सायकल खरेदी केली. वयाची 80 वर्षे ओलांडल्यावर अनेकांनी त्यांना वाहन व चालक देण्याचीही तयारी दर्शविली होती. वाढत्या वयामुळे ते सायकल घेऊन बाहेर पडल्यावर घरी यायला उशीर झाला की, घरच्यांची काळजी वाढत असे. मात्र, असे असूनही सायकल चालवावी लागते, म्हणून त्यांनी कामामध्ये हयगय केली नाही. इंजिनिअरिंगमधील कामगाराची शिफ्ट ही आठ तासाची असते. म्हणून ते निधी संकलनाची ‘सायकलपिट’ आठ-आठ तास करीत. पुढे श्रीराम मंदिर उभारणीत त्यांचा सहभाग, श्रीरामशिळा संकलनापासून अयोध्येत कारसेवेत प्रत्यक्ष सहभाग घेण्यापर्यंत सर्वत्र होता. सार्वजनिक जीवनात जेथे जेथे लग्न, मुंज किंवा आयुष्यातील महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तेथे जाऊन त्या विधीचे जीवनातील महत्त्व सांगण्यासाठी छोटे भाषणही ते देत असत. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांची व्यक्तिगत जीवनातील शिस्त, रसिकता आणि संन्यस्तवृत्ती हे स्वभावही तेवढेच महत्त्वाचे होते. एकाच व्यक्तिमत्त्वात या तीनही गुणांचा संगम असणे ही बाब दुर्मीळ अशीच.
ते बागकामातीलही जाणकार होते. निरनिराळी फुलझाडे कशी लावावी, त्या फुलांचा आस्वाद कसा घ्यावा, हे ते जाणत. वर्षभर पुरतील अशी फुले तयार करत असत. मोठ्या वहिनींचे केस गुडघ्यापर्यंत असल्याने, त्यांच्यासाठीचा गजरा करणे, हे त्यांनीच करो जाणे! सुताचा धागा बोटात कसा आडकवायचा, प्रत्यक्ष गजऱ्यात कोठेही तो धागा दिसणार नाही अशी झुपकेदार वीण कशी करायची, हे सारेच बघण्यासारखे होते. ते पक्वान्नेही चांगली करत आणि त्यांनी हाताने केलेला मोदक तर बघत राहावा, असाच.
राजकीय जीवनात त्यांना रस नसे, पण जाण मात्र व्यवस्थित असे. पुण्यात आणीबाणीच्या काळापासून एक ‘जागृती’ नावाचे मंडळ आहे. त्याकाळी सर्वच वरिष्ठ स्वयंसेवकांवर पोलिसांची नजर असे. त्यामुळे आठवड्यातून एकदा भरणाऱ्या त्या बैठकीत प्रथम काही निरोप व काही घटना हे सांगण्याला फारच महत्त्व असे. नंतर ते मंडळ एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा यासाठी आजही सुरू आहे. दर शनिवारी ’श्रेयस’मध्ये भरणाऱ्या या जागृती मंडळात, मला बापूराव भिशिकर यांनी इ.स. 2004 पासून सामावून घेतले होते. त्या वेळेला त्या मंडळात 50-50 वर्षे संघाचे प्रचारक असलेले अनेकजण येत. त्यावेळी मीही साठी गाठलेली असून, त्या मंडळात मी तसा ज्युनियरच होतो. तरीही साऱ्यांनी मला मोठेपणा देऊन “दर आठवड्याला आम्हाला एक विषय समजावून सांगायचा,” असा आग्रह केला.
या बैठकीनिमित्ताने मोहनराव यांचे माझ्यावर जे उपकार झाले, ते न विसरता येणारे आहेत. त्या बैठकीतील सारी मंडळी कमी-अधिक प्रमाणात ‘मोहनराव’च होती. पण एक दिवस मला मोहनराव यांनी ‘द ब्रेकिंग इंडिया’ हे जागतिक विचारवंत डॉ. राजीव मल्होत्रा यांचे पुस्तक दिले आणि हे पुस्तक आम्हाला समजावून सांग, असा आदेशही दिला. 600 पानांचे ते पुस्तक वाचायला मला सहा महिने लागले. त्यासाठी अनेक अन्य पुस्तके शोधावी लागली आणि वाचावीदेखील लागली. त्या पुस्तकाची व्याप्ती एवढी मोठी होती. जागृती मंडळात मी माझ्या क्षमतेनुसार 15-20 आठवडे त्या पुस्तकावर बोलू शकलो. तो विषय एवढा प्रभावी होता की, त्यावर माझी पुण्यात आणि पुण्याबाहेर भाषणे ठरू लागली. नंतर याच मंडळींकडून मी त्यावर लेख लिहिण्याचीही परवानगी घेतली. ‘आर्य युरोपातून जगात व भारतात गेले’ हा सिद्धांत, युरोपानेच कसा फेटाळला आहे, हा त्याचा गाभा होता आणि भारतात सध्या जिहादी, कम्युनिस्ट चर्चवाले आणि स्थानिक दहशतवादी यांचे कसे एकत्र ‘ट्रेनिंग कॅम्प्स’ सुरू आहेत, याची फारच सखोल माहिती त्यात होती. मी इ.स. 2013-14 मध्ये दै. ‘तरुण भारत’मध्ये त्यावर 15-16 लेख लिहिले. ते वाचून त्यावेळचे रा. स्व. संघाचे केंद्रीय माध्यमे विभागप्रमुख मा. मनमोहनजी वैद्य यांनी सांगितले की, यावर हिंदी साप्ताहिक ‘पांचजन्य’मध्ये लेख लिहावेत. मी तसे लिहायला घेतल्यावर, देशभरातून मोठा प्रतिसाद आला. त्याची लेखसंख्या वाढत वाढत 100 वर गेली. त्यावर मराठीत, हिंदीत व अन्य काही दक्षिणी भाषातूनही पुस्तक, पुस्तिका निघाल्या. माझे लेख आणि पुस्तिका देशभरातील अनेक भाषांत झाल्या. अर्थातच, हा अनुभव मला सुखावणारा होता.
मोहनराव यांच्या जीवनावर भाष्य करायला मी 80 वयाचा असूनही, त्या योग्यतेचा नाही. संघाला असे सर्वस्व अर्पण करणाऱ्यांची संख्या आज काही लाख आहे. येथे कोणावर कसलीही सक्ती नसतानाही, आयुष्य देण्यासह सर्वस्व देण्याची चढाओढ लागते. त्याची तुलना भारतीय अध्यात्म क्षेत्रातील ‘शक्तिसंक्रमण’ किंवा ‘शक्तिपात’ वा ‘कुंडलिनी जागृती’शीच करावी लागेल. सुषुमा नाडीतून सहस्रार चक्रापर्यंत पोहोचवणारी ही विद्या, आदिनाथ-शंकरापासून सुरू झाली. पुढे नवनाथ परंपरेतून निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ यांच्यापर्यंत आली आणि नंतर पुढे अनेक परंपरांतून आज लक्षावधी साधकांनी ती जपली आहे. त्याचप्रमाणे भारताला विश्वगुरू करण्याची ही परंपरा आदिनाथ-डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी यांच्यापासून बाळासाहेब, रज्जुभैय्या, दत्तोपंत, मोरोपंत अशा अनेक नवनाथ मंडळींकडून, प्रत्येक शाखेवर अवतरली आहे. त्यातून आता प्रत्येक घर ही एक शाखा अशा प्रवासाच्या दिशेने निघाली आहे. अनेक देशांनाही ती आता आपली वाटू लागली आहे. याचा मोहनराव यांच्यासंदर्भात ही परंपरा पाहिली, तर असेच अनेक आदर्श पुढील अनेक पिढ्या, शतके, सहस्रके यांना मार्गदर्शक ठरेल.
- मोरेश्वर जोशी