
भारतीय राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकता आणि कणखर नेतृत्वाचे प्रतीक म्हणून कै. मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाहिले जाते. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला; मात्र या राजकीय ओळखीपलीकडे त्यांची एक वेगळी ओळख होती; ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार लाभलेला स्वयंसेवक. दि. 17 मार्च या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या दोन्ही पैलूंना उजाळा देत, संघ स्वयंसेवकापासून संरक्षणमंत्र्यांपर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्याचा हा प्रयत्न.
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कणखर नेतृत्व यांचा संगम असलेले नाव म्हणजे कै. मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर. दि. 13 डिसेंबर 1955 रोजी गोव्यातील म्हापसा शहरात त्यांचा जन्म झाला. गोव्याच्या राजकारणात बदल घडवून आणणारे आणि देशाचे संरक्षणमंत्री म्हणूनही ठसा उमटवणारे पर्रीकर, हे भारतीय राजकारणातील वेगळ्या धाटणीचे नेते म्हणून ओळखले जातात. राजकारण हे केवळ जातीपातीच्या आधारावर सत्ता मिळवण्याचे डावपेच नसून, ते विकास आणि लोकांना आधार देण्याचे माध्यम आहे, याचा प्रत्यय पहिल्या मंत्रिमंडळाच्या कालखंडात मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या कार्यातून जनतेला दिला. त्यामुळे गोव्यातील जनमानसावर त्यांची पकड निर्माण झाली आणि ती त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम राहिली.
देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी असताना आधुनिक तंत्रज्ञानाचे पुढच्या काळातील महत्त्व ओळखून, त्यांनी अनेक गोष्टींना चालना दिली. 2014-2017 दरम्यान पर्रीकरांनी स्वदेशी ‘तेजस’ विमान प्रकल्पाला प्रशासकीय आणि आर्थिक गतीही दिली. यापूर्वी अनेक वर्षे हा प्रकल्प तांत्रिक चाचण्या आणि मंजुरीच्या प्रक्रियेत अडकला होता. 2016 मध्ये भारतीय वायुदलासाठी 83 ‘तेजस एमके1ए’ विमानांच्या खरेदीला तत्त्वतः मंजुरी देण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला. या निर्णयामुळे प्रकल्पाला दीर्घकालीन स्थैर्य मिळाले. त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्येही आत्मनिर्भरता या धोरणावर भर दिला. या धोरणानुसार भारताने शक्य तितकी संरक्षणसामग्री देशात तयार करावी, अशीच त्यांची भूमिका होती. ‘तेजस’ हे त्याचे प्रमुख उदाहरण मानले गेले. पर्रीकर यांच्या मते ‘तेजस’ हे केवळ एक विमान नसून, भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. त्यामुळेच त्यांनी या प्रकल्पाला राजकीय आणि धोरणात्मक पाठबळही दिले. मनोहर पर्रीकर यांनी ‘तेजस’ प्रकल्प सुरू केला नाही, पण, या प्रकल्पाला निर्णायक टप्प्यावर नेण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे असेच. या योगदानामुळेच ‘तेजस’ आणि मनोहर पर्रीकर यांचे नाव अनेकदा एकत्र घेतले जाते.
मात्र, एक संघ स्वयंसेवक म्हणून पर्रीकर यांचा प्रवास अनेकांना ठावूक नसावा. साधारण 1967 साली त्यांचा संघाशी संबंध आला. तेव्हा स्व. दुर्गानंद नाडकण यांचा प्रचारक म्हणून समर्पित भावाचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला. गोव्यातील संघकार्याची तळमळ असो किंवा गोव्याच्या सामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय असो; दोन्हींसाठी समान निष्ठेने सर्वस्व अर्पण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच मनोहर पर्रीकर. मनोहर हे म्हापसा शाखेचे स्वयंसेवक. त्यावेळी फक्त सायं शाखा चालायच्या. शाखेचे नाव होते सातेरी सायं शाखा, म्हापसा. मनोहर यांचा स्वभाव लहानपणापासूनच तल्लख, हुशार, तीव्र स्मरणशक्ती व अतिशय देखणे रूप याचे एकत्रित प्रकटीकरण. त्यांच्या स्वभावाचे विशेष त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, व्यवहार अशा एकूणच सर्व व्यक्तिमत्त्वात दिसून येत असे. त्यांची संघसमज भावनेपेक्षा तात्त्विक जास्त होती.
संघ प्रचारकांबद्दल त्यांच्या मनात फार आदर असे. मुंबईहून जे प्रचारक म्हणून गोव्यात आले, ते तर त्यांचे जणू मित्रच व्हायचे; खास करून मिलिंद करमरकर, रवी साठे व दिलीप करंबेळकर. विशेषतः दिलीप करंबेळकर यांच्यासोबत पर्रीकर यांचे, वेगवेगळ्या विषयांवर बरेचदा परस्पर संवाद व्हायचे. पर्रीकर यांच्या सर्वोच्च राजकीय कालखंडात, स्व. जयंतराव सहस्रबुद्धे दहा वर्षे गोवा विभाग प्रचारक म्हणून नियुक्त झाले. जयंतराव विलक्षण बुद्धिमत्ता व परिपक्वता असलेले प्रचारक. त्यांचा प्रभाव मनोहर पर्रीकर यांच्यावर शेवटपर्यंत होता, अगदी भारताचे संरक्षणमंत्री असतानासुद्धा!
शाखेत मुख्य शिक्षक, कार्यवाह इत्यादी जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर, उच्च शिक्षणासाठी (आयआयटी) ते मुंबईला रवाना झाले. दहा वर्षे पर्रीकर गोव्याबाहेर होते, पण गोव्यासोबत नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. गोव्यात परत आगमन झाल्यावर, स्वतःचा व्यवसाय मोठा भाऊ अवधूत यांच्याबरोबर सुरू केला. नंतर म्हापसा शहर तालुका संघचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्या काळात महाराष्ट्र प्रांतात सर्वांत तरुण व पहिला ‘आयआयटी’शिक्षित संघचालक म्हणून त्यांची ख्याती होती. अर्थात मनोहररावांची एक अट होती की, त्याकाळी संघ बैठकीत किंवा कार्यक्रमात संघचालकांना बसण्यासाठी जमिनीवर गादी ठेवायची पद्धत होती. ’आपण संघचालक असलो तरी गादीवर बसणार नाही’, हीच ती अट! अर्थात ती मान्य झाली, कारण ‘प्रोडक्ट’ महत्त्वाचा होता, ’प्रोसेस’ नव्हे. रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान, पर्रीकरांनी उत्तर गोव्यामध्ये एक प्रमुख संघटक म्हणूनही कार्य केले. 1990 साली मनोहर पर्रीकर व श्रीपाद नाईक जे तीसवाडी तालुका संघचालक होते; त्या दोघांना राजकीय क्षेत्राचे काम गोव्यात सुरू करण्याची जबाबदारी दिली गेली. त्यांचा नवीन व अतिशय खडतर प्रवास सुरू झाला. त्या दोघांनी अक्षरशः जीवाचे रान करून, भारतीय जनता पक्ष गोव्यात रुजवला, वाढवला व सत्तेपर्यंत आणला.
पुण्यात महाराष्ट्र प्रांताचे भव्य तळजाई शिबीर झाले, ते वर्ष होते 1983! मनोहर पर्रीकर यांना नुकतेच तळजाई शिबिरात म्हापसा शहर व बारदेश तालुका संघचालक नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदाच संघचालक म्हणून एका शाखेवर बौद्धिक देण्याची वेळ आली होती. 25-30 बाल-तरुण स्वयंसेवकांच्या समोर त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे, सरनोबत प्रतापराव गुजर यांची ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही गोष्ट आणि दुसरी गोष्ट येसाजी कंक यांची. पर्रीकर गोष्ट सांगत असताना, सर्व स्वयंसेवक अगदी एकाग्रतेने ऐकत असत. अनेक वक्त्यांनी प्रतापराव गुजर आणि येसाजी कंक यांची गोष्ट अनेकदा शाखेवर सांगितली असेल; पण या दोन्ही गोष्टी एकत्र करून व्यक्तिनिर्माणाचे हे दोन पैलू एकत्र करून, छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिनिर्माणाच्या विद्यापीठाचे कुलगुरू कसे होते, हे मनोहर पर्रीकरांनीच आपल्या बौद्धिकातून समजावून सांगितले होते.
2016 सालची पार्ले महोत्सवाची एक आठवण म्हणजे, त्या कार्यक्रमात त्यांना आयत्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांसमोर भाषण द्यावे लागले होते. त्यांच्या प्रवासातील तो पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता; मात्र केवळ आपल्या संघातील कार्यकर्ते मित्रांच्या आग्रहाखातर मनोहर या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी भाषण केले खरे, पण ते जाता जाता आपल्या एका मित्राला म्हणाले की, ”रात्री एक वाजता झोपेतून उठवून तू एकवेळ मला संघाचे बौद्धिक द्यायला सांग, मी उत्तम बौद्धिक देईन. समोर बाल असोत की तरुण; नवीन स्वयंसेवक असोत की जुने-जाणते, मी मुद्देसूद विषय मांडेन, पण मला असे अचानक मंचावर बोलावून राजकीय भाषण करायला लावू नको. त्यासाठी मला तयारी करावी लागते. प्रसंग काय, समोर कोण सगळे नीट पाहावे लागते. संघ माझ्या डोक्यात एकदम ‘फिट’ बसलाय, संघाच्या बौद्धिकसाठी मी कुठेही आणि कधीही तयार आहे.” मनोहर पर्रीकर हे आधी गोव्याचे मुख्यमंत्री नंतर देशाचे संरक्षणमंत्री झाले, तरी हाडाचा स्वयंसेवक असणे काय असते; हे पार्ले महोत्सवानंतरच्या त्या चार वाक्यांतूनच स्पष्ट होते.
मनोहर पर्रीकर यांची पत्नी सौ. मेघा यांचे दि. 13 मे 2000 साली कर्करोगाने निधन झाले. पर्रीकर यांच्या व्यक्तिगत आयुष्यात, न भरून येणारी मोठीच पोकळी निर्माण झाली. कारण दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे व वडिलांचेही निधन 12 दिवसांच्या फरकाने झाले होते. मनोहर पर्रीकर यांच्यापश्चात त्यांना दोन मुलं उत्पल (मोठा) व अभिजात (धाकटा) आहेत. दोघांचे संसार व व्यवसाय उत्तम चालू आहेत. मनोहर पर्रीकर यांची उणीव गोवेकरांना पदोपदी आजही भासते; कारण त्यांनी गोव्याचे राजकारण एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातही त्यांची साधी राहणी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली. मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रीकर आपल्या वडिलोपार्जित साध्या घरातच राहात आले. दि. 17 मार्च 2019 रोजी मुलगा उत्पल यांच्या घरीच, मनोहर पर्रीकर यांचे वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने न केवळ गोव्याने, तर भारत देशाने एक दुर्मीळ तारा गमावला व कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.