
मंत्र्यांचे जीवन हे जसे सामान्य जनतेच्या चर्चेचा विषय असते, तसाच रस मंत्र्यांच्या कुटुंबाविषयही जनतेला असतो. आदर्शत्वाच्या भूमिकेतून हे आकर्षण निर्माण होत असावे बहुदा. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या राजकीय प्रवासाची माहिती देणारे पुस्तक त्यांच्या पत्नी डॉ. प्राची जावडेकर यांनी लिहिले असून, यामध्ये त्यांनी कुटुंबांच्या प्रवासाचेदेखील चित्र रेखाटले आहे. त्यांच्या या ‘पुणे दिल्ली पुणे’ या पुस्तकाचा विविध अंगाने घेतलेला आढावा...
राजकारण हे लिंगसमानतेचे असल्याचा कितीही दावा करण्यात आला, तरीही भारतात तरी ते अद्याप पुरुषप्रधानच आहे. अशा वेळी राजकीय नेत्याची पत्नी म्हणूनच, अनेक जणींची ओळख मर्यादित राहते. डॉ. प्राची जावडेकर या मात्र त्यास अपवाद. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पत्नी, एवढीच त्यांची ओळख नाही. जावडेकर हे भाजपचे पूर्णवेळ काम करीत असताना, डॉ. प्राची यांनी घर सांभाळत एक प्राध्यापक व नंतर उद्योजिका म्हणूनही स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, आपण एका मंत्र्याची पत्नी आहोत, याचे भानही त्यांनी ठेवल.जेव्हा जावडेकर मंत्री झाले व त्यामुळे आपल्या व्यावसायिक हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होण्याची शंका आली, तेव्हा आपला व्यवसाय त्यांनी सहजपणे बंद केला. अशा अनेक आठवणी डॉ. प्राची जावडेकर यांनी ‘पुणे दिल्ली पुणे’ या पुस्तकात उलगडून दाखविल्या आहेत. हे पुस्तक सहजीवन, सार्वजनिक जीवन, सामाजिक बांधिलकी आणि स्त्रीच्या आत्मशोधाचा संवेदनशील दस्तऐवज आहे. पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक वातावरणातून दिल्लीच्या राजकीय केंद्रापर्यंत आणि तेथून पुन्हा पुण्याकडे परतण्याचा हा प्रवास, एका स्त्रीच्या अंतर्मनातील जाणिवांचा आलेख रेखाटतो.
पुस्तकाच्या सुरुवातीस लेखिकेने आपला प्रकाश यांच्याशी परिचय कसा झाला, या आठवणींचा पट उलगडून दाखविला आहे. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’तील कार्यकर्ते म्हणून झालेला परिचय; आणीबाणीच्या काळात सत्याग्रहात घेतलेला सहभाग; त्यामुळे झालेला तुरुंगवास; त्याचवेळी नियमित आरोग्य तपासणीच्या वेळी प्रकाश जावडेकर यांच्या हृदयाला छिद्र असल्याचे झालेले निदान; झालेली शस्त्रक्रिया; तरीही प्रकाश यांच्याशीच विवाह करण्याची लेखिकेची तयारी या घडामोडींतून, या दाम्पत्याच्या सहजीवनाचा पाया हा समान मूल्ये हाच होता, हे स्पष्ट होते. याच ओघात लेखिका आपले आजोबा (आईचे वडील) धुळ्याचे संघचालक असताना, त्यांनी गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत कशी झळ सोसली होती, हे नमूद करते आणि तरीही, ऐन आणीबाणीत सत्याग्रहातील स्वत:चा सहभागही सांगते. ही वैचारिक बांधिलकी या पती-पत्नीत समान असल्याची प्रचिती त्यातूनच येते.
लग्नानंतरचे सुरुवातीचे संघर्षमय दिवस, घरगुती जबाबदाऱ्या, आर्थिक काटकसर, सार्वजनिक कार्यात गुंतलेले पती, या सगळ्यांचा समतोल राखताना झालेल्या कसरतीचे वर्णन लेखिका करते. मात्र, त्यात तक्रारीचा सूर नाही; आहे ते केवळ प्रांजळ वर्णन. बँकेचा राजीनामा देऊन प्रकाश जावडेकर यांनी भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करण्याचा घेतलेला निर्णय, हे या दाम्पत्याचा सहजीवनातील निर्णायक वळण ठरले. भारतीय राजकारणात त्यावेळी भाजपचे असणारे स्थान लक्षात घेता, तो निर्णय किती धाडसी होता याची प्रचिती यातून येते. ओघात लेखिका भाजपमधील त्यावेळी असणाऱ्या वातावरणाचा परिचय करून देते. पुण्यातील आपल्या घरी अटल बिहारी वाजपेयी आल्याची किंवा लालकृष्ण अडवाणी आल्याची आठवण करून, या मोठ्या नेत्यांच्या साधेपणाकडेही लेखिका लक्ष वेधते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, धरमचंद चोरडिया या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रात भाजपच्या विस्तारासाठी घेतलेली मेहनत; प्रकाश जावडेकर यांची दोनदा पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून झालेली निवड; 2002 मध्ये निवडणुकीत झालेला पराभव; त्यानंतर तत्कालीन पक्षाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी जावडेकर यांना दिल्लीत येण्याची केलेली सूचना; तेथे पक्षाचे प्रवक्ते म्हणून जावडेकर यांचा सुरू झालेला प्रवास, यावर झोत टाकतानाच लेखिका स्वतःच्या वाटचालीचेही वर्णन करते.
स्वतः लेखिकेने पुण्यातील वाडिया महाविद्यालयात अध्यापक म्हणून कारकिर्दीस केलेली सुरुवात, 1995 मध्ये प्राप्त केलेली डॉक्टरेटची पदवी, सन 2000 पासून ‘इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये संचालकपदी झालेली नेमणूक, त्या संस्थेच्या विकासासाठी केलेले अथक प्रयत्न, यांचा पटही लेखिकेने उलगडून दाखविला आहे. संस्थेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्नांचा पुस्तकात उल्लेख आला आहे. एका अर्थाने कुटुंबाच्या चरितार्थाची पूर्ण जबाबदारीच त्या पेलत होत्या. तथापि, स्वतःच्या अनुभवांचे वर्णन करताना लेखिका आत्मप्रौढी टाळते. सहजीवनातील समर्पण, संयम आणि परस्पर विश्वास या मूल्यांची जाणीव त्यातून ठळकपणे जाणवते. खासदार निधीतून जावडेकर यांनी 40 अभ्यासिका सुरू केल्या, अशी आगळीच माहिती लेखिका देते. खासदार म्हणून मिळालेला निधी आपल्या हितसंबंधांसाठी वापरण्याची पद्धत रूढ असताना, जावडेकर यांचे हे निराळेपण प्रकर्षाने जाणवते.
पुढे 2014 मध्ये जावडेकर यांना प्रथम ‘पर्यावरण खात्या’चे व कालांतराने ‘मानव संसाधन’ खात्याचे मंत्रिपद मिळाले, तो सर्व धामधुमीचा काळ लेखिकेने रेखाटला आहे, पण, मंत्र्यांच्या भेटीसाठी लागणारी रीघ; त्यांच्या चहा-पाण्यासाठी होणारा खर्चाचा उल्लेख करून, लेखिकेने तेथील कर्मचाऱ्यांकडून होणारी उधळपट्टी आपण कशी रोखली, याचा कथन केलेला अनुभवही उल्लेखनीय. लेखिका स्वतः भाजपमध्ये कार्यरत नसल्या, तरी पक्षातील पुरुष खासदारांच्या पत्नींना एकत्रित करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘कमल सखी मंच’ या उपक्रमाचे, लेखिकेने विस्ताराने वर्णन केले आहे. त्या उपक्रमास सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजप नेत्यांचे प्रोत्साहन कसे लाभले, हेही कृतज्ञतेने लिहिले आहे. प्रतिपादनाच्या ओघात लेखिकेने नजमा हेपतुल्ला, दिया कुमारी अशा वरिष्ठ व नवोदित भाजप महिला नेत्यांबद्दलचे अनुभव कथन केले आहेत. पुण्याच्या तुलनेत दिल्लीचा पसारा प्रचंड. राष्ट्रपतीभवनापासून नव्या संसदभवनापर्यंत अनेक वर्णने पुस्तकात येतातच; पण दिल्लीच्या बाजारपेठांचे लेखिकेने अगदी बारीकसारीक तपशील देऊन केलेले वर्णन आणि आपल्याला दिल्ली पूर्णपणे समजली नसल्याची दिलेली कबुली, हे दोन्ही त्यांचा प्रांजळपणा दर्शविते.
मंत्र्याची पत्नी म्हणून आपण अपरिहार्य तेथे सोडून अन्यवेळी कधीही सरकारी वाहनाचा वापर केला नाही, हे त्या आवर्जून नमूद करतात. अमित शाह यांच्या पत्नीला दिल्लीतील बाजारपेठेच्या घडवलेल्या सफरीचा अनुभव बहारदार. मंत्र्याच्या मानमरातबाचे वर्णन करताना, ल्युटेन्स दिल्लीच्या वास्तुनिगडित भव्यतेचे कौतुक करताना, लेखिका एका मंत्र्याला किती काम असते याची कल्पना बाहेरून पाहणाऱ्याला येत नाही, हेही नमूद करते. जावडेकर 50 वर्षे राजकारणात असूनही त्यांनी कधी फलकबाजी केली नाही; रुबाब, दरारा निर्माण केला नाही, अशा निवेदनातून लेखिकेने राजकारणाच्या बदलत्या पोतावर बोट ठेवले आहे. जावडेकर हे दिल्लीतून पुण्यात येत, तेव्हा सामान्य नागरिक त्यांच्याशी संवाद साधायला; आपल्या तक्रारी सांगायला येत. अशांमधीलच एका सासरेबुवांची आठवण लेखिकेने दिली आहे. आपल्या सूनबाई कशा आहेत हे ते जावडेकर यांना तक्रारींचा पाढा वाचत सांगत होते; ते सर्व ऐकून घेऊन जावडेकर यांनी त्यांना, ‘एक तरी चांगली गोष्ट असेल बघा त्यांची,’ असा उपरोधिक सल्ला दिला, तेव्हा ते सासरे शांत झाले. आणीबाणीत तुरुंगवास घडला असताना तेथे बंदिवासात असणाऱ्या समाजवादी नेत्या प्रमिला दंडवते, डाव्या नेत्या अहिल्याबाई रांगणेकर यांचा लेखिकेने आदराने उल्लेख केला आहे. त्याचा सांधा बहुधा, त्या सासरेबुवांना दिलेल्या सल्ल्याशी जुळतो. राजकारण विखारी होत असताना प्रतिस्पर्धी पक्षांनी तो सबुरीचा सल्ला मान्य केला; तर राजकारणातील अभिनिवेश कमी होण्यास कदाचित मदतच होईल.
आपली व्यावसायिक कारकीर्द व प्रकाश जावडेकर यांची राजकीय कारकीर्द यांच्या अनुभवांचे व आठवणींचे ‘कोलाज’ म्हणजेच प्रस्तुत पुस्तक होय. हा वाचकांशी मुक्तसंवाद असल्याचे त्यातून जाणवते; पण तरीही पुस्तकातील सुरुवातीच्या काही प्रकरणांवर संपादकीय हात फिरला असता, तर त्यात अधिक एकसंधता येऊ शकली असती. सत्तेच्या परिघात राहूनही कोणताही बडेजाव न मिरविणारा नेता व साधेपणाने वावरणारे, आपापल्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी राजकीय जवळिकीचा वापर न करणारे कुटुंबीय, याअर्थाने ‘मध्यमवर्गीय वृत्तीचे’ लोभस दर्शन पुस्तकातून घडते. पुस्तकाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांच्या आत्मीयतेने लिहिलेल्या प्रस्तावना लाभल्या आहेत. अन्वर राजन यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक असेच.
पुस्तक : पुणे दिल्ली पुणे
लेखक : डॉ. प्राची जावडेकर
प्रकाशक : उन्मेष प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : 208
मूल्य : रुपये 300
- राहूल गोखले