कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील ऐहोळे हे छोटेसे गाव, भारतीय मंदिर स्थापत्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. चालुक्यकालीन मंदिर स्थापत्य विकासाची जणू प्रयोगशाळाच येथे आहे. पाचव्या ते आठव्या शतकादरम्यान चालुक्य या महत्त्वाच्या राजवंशाने, येथे मंदिर स्थापत्याच्या विविध रूपांवर प्रयोग केले. त्या प्रयोगांमधून पुढे दक्षिण आणि उत्तर भारतातील अनेक मंदिरशैली विकसित झाल्या.
ऐहोळेमध्ये आजही सुमारे १००हून अधिक मंदिरे दिसतात. यांपैकी काही मंदिरसमूह प्राचीन तटबंदीच्या आत, तर काही बाहेर आहेत. या मंदिरांमध्ये लाडखान मंदिर, हुच्चिमल्लिगुडी, मेगुती जैन मंदिर, रावणफडी गुहा आणि विशेषतः दुर्गा मंदिर हे स्थापत्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असेच. यांमध्ये दुर्गा मंदिर हे त्याच्या अद्वितीय आराखड्यामुळे आणि शिल्पवैभवामुळे विशेष प्रसिद्ध आहे. इतिहासकारांच्या मते, ऐहोळे हे प्रारंभी ‘आर्यपुरा’ किंवा ‘आर्यपूर’ म्हणून ओळखले जात असे. सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान येथे चालुक्य राजांनी, मोठ्या प्रमाणावर मंदिरांची उभारणी केली. याच काळात उत्तर भारतातील ‘नागरशैली’ आणि दक्षिण भारतातील ‘द्राविडशैली’ यांचे विविध प्रयोगही येथे पाहायला मिळतात.
ऐहोळेमध्ये बांधण्यात आलेली अनेक मंदिरे ‘पॅव्हिलियन’ प्रकारातील असून, त्यांना थोडा उतार असलेली छपरे दिसतात. पुढील काळात या मंदिरांच्या रचनांमध्ये अधिक गुंतागुंतीची शिखरे, मंडप आणि अलंकरण विकसित झाले. त्यामुळे ऐहोळेला भारतीय मंदिर स्थापत्याची प्रयोगशाळा किंवा ‘क्रॅडल ऑफ इंडियन टेंपल आर्किटेक्चर’ असेही म्हटले जाते. येथील मेगुती मंदिरातील शिलालेखात, प्रसिद्ध कवी कालिदासाचा उल्लेख आढळतो. या शिलालेखातून सातव्या शतकातील सांस्कृतिक वातावरण आणि चालुक्य राजसत्तेचे वैभवही स्पष्ट होते.
ऐहोळेमधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे दुर्गा मंदिर. प्रत्यक्षात हे मंदिर दुर्गेला समर्पित नाही. दुर्गा हे नाव या मंदिराजवळ असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीमुळे पडले असावे. संस्कृतमधील दुर्ग म्हणजे किल्ला आणि त्या किल्ल्याजवळ असल्यामुळे मंदिराला ‘दुर्ग मंदिर’ आणि कालांतराने ‘दुर्गा मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. शिलालेखांनुसार, हे मंदिर सुरुवातीला आदित्य आणि विष्णू यांच्या एकत्रित रूपाला म्हणजेच सूर्यनारायणाला समर्पित असावे, असे मानले जाते. सहाव्या-सातव्या शतकादरम्यान या मंदिराची उभारणी झाली असावी.
दुर्गा मंदिराचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे, त्याचा अर्धवर्तुळाकार आराखडा. या मंदिराच्या मागील भागाचा आकार हत्तीच्या पाठीसारखा दिसतो. याला मंदिर स्थापत्याच्या भाषेत ‘गजपृष्ठ’ म्हणतात. हा आराखडा भारतातील प्राचीन बौद्ध चैत्यगृहांच्या स्थापत्याशी साधर्म्य दर्शवतो. महाराष्ट्रात वेरूळमध्ये विश्वकर्मा लेणे, भाजे लेणे इथे असणारे ‘चैत्य’ या आकाराचे आहे. मंदिर एका उंच चौथऱ्यावर उभारलेले असून, त्याभोवती स्तंभयुक्त प्रदक्षिणा मार्ग आहे. हा स्तंभमंडप मंदिराभोवती वर्तुळाकार पद्धतीने फिरत असल्यामुळे, संपूर्ण रचना अत्यंत लयबद्ध दिसते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी दक्षिण आणि उत्तर दिशांना पायऱ्या आहेत. मंदिराच्या आराखड्यात गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप असे भाग स्पष्ट दिसतात. गर्भगृहाच्या पुढे अर्धवर्तुळाकार मंडप असून, त्याभोवती स्तंभांची रांग आहे. यावर उत्कृष्ट शिल्पांकनही केले आहे.
दुर्गा मंदिराचे बाह्यभाग आणि स्तंभ विविध शिल्पांनी सजलेले आहेत. मंदिराच्या भिंतींवर शिव, विष्णू आणि विविध देवतांचे अनेक रूपांमध्ये दर्शन घडते. विशेषतः विष्णूचे ‘वराह’, ‘नरसिंह’ आणि गरुडावर आरूढ असलेले रूप अत्यंत सुंदर रीतीने कोरलेले आहे. याशिवाय, महिषासुरमर्दिनीचे प्रभावी शिल्प, शिव-पार्वती, अर्धनारीश्वर आणि सूर्यदेव यांच्या प्रतिमाही येथे दिसतात. काही शिल्पांमध्ये प्रेमीयुगुलांची कोरीव आकृतीदेखील असून, यामुळे त्या काळातील समाजजीवन आणि कलात्मक अभिरुचीची झलक मिळते. यातल्या एका शिल्पाचा परिचय आपण इथे करून घेऊयात.
वृषावाहन शिव- या शिल्पात शिव हा नंदीवर रेलून उभा राहिला आहे. साक्षात शिव ज्याच्याबरोबर आपल्या सगळ्या चिंता सोडून राहतो, असा हा नंदी. नंदीच्या पाठीवर शिवाने हात ठेवलेला असून, आपल्या दोन्ही हातांनी नंदीच्या कानांबरोबर तो खेळतो आहे. दगडाला बोलके करणारे अतिशय जिवंत असे हे शिल्पांकन, शिव आणि नंदी यांचे केलेले आहे.
याबरोबरच या मंदिरात महिषासुरमर्दिनी, हरिहर, गरुडारूढ विष्णू, केवल नरसिंह यांच्यादेखील सुंदर प्रतिमा कोरलेल्या आहेत. दुर्गा मंदिर हे चालुक्य स्थापत्यातील संक्रमणाचा एक महत्त्वाचा टप्पा दर्शवते. या मंदिरात बौद्ध चैत्यगृहांच्या आराखड्याची प्रेरणा, नागरशैलीचे वक्र शिखर आणि दक्षिणेकडील स्थापत्य घटक यांचा एक सुंदर संगम दिसतो. म्हणूनच, दुर्गा मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, भारतीय स्थापत्यकलेच्या उत्क्रांतीचे जिवंत उदाहरण आहे. या मंदिराच्या रचनेतून पुढील काळातील अनेक मंदिर स्थापत्यांना दिशा मिळाली, असे मानले जाते. आज ऐहोळे हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखालील एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. येथील मंदिरसमूहामुळे इतिहास, स्थापत्य आणि कला यांच्या अभ्यासकांसाठीही हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे ठरते. पट्टडकल आणि बदामी या चालुक्यकालीन केंद्रांबरोबरच, ऐहोळे हे दक्षिण भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक प्रमुख अध्याय आहे.
ऐहोळेचे दुर्गा मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेच्या इतिहासातील एक अद्वितीय अध्याय आहे. त्याच्या अर्धवर्तुळाकार आराखड्यात, शिल्पांच्या सूक्ष्म नक्षीकामात आणि स्तंभांच्या लयबद्ध रचनेत त्या काळातील कलाकारांची कल्पकता आणि कौशल्य दिसून येते. आजही या मंदिरासमोर उभे राहिले की, सातव्या-आठव्या शतकातील त्या महान स्थापत्य प्रयोगांची साक्ष आपल्याला अनुभवता येते. ऐहोळेच्या शांत परिसरात असलेले दुर्गा मंदिर, भारतीय कला आणि संस्कृतीच्या अमर परंपरेची साक्ष देत, मागची १४००-१५०० वर्षे अभिमानाने उभे आहे. इथूनच काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बदामीच्या बनशंकरी देवीच्या दर्शनासाठी, हजारोंच्या संख्येने भाविक जातात. त्या देवीबरोबर आता ऐहोळेची भेट विसरू नका.
- इंद्रनील बंकापुरे