जयंतराव वृत्तपत्रातील आर्थिक पान वाचताना चिंतेत पडले होते. ‘आयटी’ क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठीच घसरण झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात होत्या. आदित्यने पाहिले की, आजोबा एका विशिष्ट बातमीवर गोल करत आहेत.
जयंतराव : आदित्य, हे काय चाललंय? ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’ आणि अगदी अमेरिकेतील ‘आयबीएम’चे शेअर्सही, गेल्या काही दिवसांत लक्षणीयरीत्या गडगडले आहेत. बातम्यांमध्ये ‘क्लाऊड कोड’ नावाच्या कुठल्यातरी नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख सतत येतोय. यामुळे भारतातील ‘आयटी’ कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात येणार, लाखो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे काहीजण म्हणत आहेत.
आदित्य : आजोबा, तुमची चिंता रास्तच आहे. सध्या जागतिक ‘आयटी’ बाजारपेठेत, एका मोठ्या मूलभूत आणि क्रांतिकारी बदलास सुरुवात झाली आहे. ‘अँथ्रोपिक’ या कंपनीने ‘क्लाऊड कोड’ नावाचे एक टर्मिनल-आधारित तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. हे केवळ साधे ‘कोडिंग’ किंवा ‘प्रोग्रॅमिंग’ करणारे टूल नाही, तर हा एक ‘प्रोग्रॅमिंग करणारा एजंट’ (एजंटिक एआय) आहे. यामुळे ‘आयटी’ क्षेत्रातील पारंपरिक कार्यपद्धतीलाच धक्का लागू शकतो.
‘क्लाऊड कोड’ आणि जागतिक शेअर बाजारातील भूकंप
जयंतराव : पण एका नवीन सॉफ्टवेअरमुळे ‘आयबीएम’सारखी अवाढव्य कंपनी कशी काय हादरू शकते?
आदित्य : आजोबा, शेअर बाजार हा भविष्यातील अंदाजावर चालतो. गेली 50-60 वर्षे ‘आयबीएम’ने त्यांचे मेनफ्रेम कॉम्प्युटर, मोठ्या उद्योगांना (बँक, इन्शुरन्स कंपन्या, हॉस्पिटल्स इत्यादी) विकले. या मेनफ्रेम कॉम्प्युटरमध्ये, ‘कोबोल’ नावाची एक ‘प्रोग्रॅमिंग लँग्वेज’ वापरली जाते. 50-60 वर्षे जुन्या ‘कोबोल प्रोग्रॅम’मध्ये काही बदल करणे हे मोठे किचकट आणि जिकिरीचे काम असते. त्यासाठी ‘कोबोल’ समजणारे तंत्रज्ञ वापरून कंपन्या हे काम करतात. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात नफाही मिळतो.
अलीकडेच ‘अँथ्रोपिक’ने दावा केला की, ‘क्लाऊड कोड’ जुन्या आणि गुंतागुंतीच्या ‘सिस्टम्स’ आणि ‘कोबोल प्रोग्रॅम्स’ मानवी हस्तक्षेपाशिवाय अपडेट करू शकतो. त्यामुळे ‘आयबीएम’च्या उत्पन्नाच्या मुख्य साधनावरच गदा येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे ‘आयबीएम’च्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. ‘आयबीएम’ आणि अनेक भारतीय ‘आयटी’ कंपन्यांचा मोठा नफा, हा जुन्या कॉम्प्युटर सिस्टम्सची (जसे ‘कोबोल’आधारित प्रोग्रॅम्स) देखभाल आणि त्यांचे आधुनिकीकरण करणे यामधूनच येतो.
जे काम करण्यासाठी या कंपन्यांना शेकडो इंजिनिअर्स लागायचे आणि जे पूर्ण व्हायला सहा ते 12 महिने लागायचे, ते काम ‘क्लाऊड कोड’सारखी टूल्स काही तासांत आणि अत्यंत कमी खर्चात करण्याची शक्यता निर्माण झाली. गुंतवणूकदारांना आता भीती वाटतेय की, जर अमेरिकेतील कंपन्यांनी स्वतःच ‘एआय’ वापरून हे काम करणे सुरू केले किंवा कमी खर्चात भारतीय कंपन्यांकडून करून मागितले, तर मग ते ‘आयटी’ सेवा पुरवठादारांना कोट्यवधी डॉलर्स का देतील? हीच धास्ती शेअर बाजारात, विशेषतः भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे.
‘एजंटिक कोडिंग’: साध्या ‘एआय’पेक्षा वेगळं काय?
जयंतराव : पण, ‘कोडिंग’ किंवा ‘प्रोग्रॅमिंग’ तर ‘चॅटजीपीटी’ किंवा ‘को-पायलट’ पण करत होतं ना? मग यात नवीन काय?
आदित्य : हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘चॅटजीपीटी’ तुम्हाला ‘कोड’ लिहून देतो; पण तो स्वतः कृती करत नाही. म्हणजे तुम्हाला ‘चॅटजीपीटी’ने दिलेला ‘कोड’ ‘कॉपी’ करून, स्वतःच्या ‘सिस्टम’मध्ये ‘पेस्ट’ करून, तो ‘रन’ करून पाहावा लागतो. जर चूक आली, तर पुन्हा ‘चॅटजीपीटी’ला प्रश्न विचारावा लागतो. पण, ‘क्लाऊड कोड’ हा ‘एजंटिक’ आहे. याचा अर्थ असा की, तो स्वायत्तपणे काम करतो.
स्वतःहून विचार करणे : त्याला फक्त सांगा की, ‘प्रोग्रॅममध्ये अमुक एक सुधारणा कर किंवा अमुक एक सुविधा समाविष्ट कर.’ तो स्वतःहून तुमच्या ‘प्रोजेक्ट’मधील हजारो ‘फाईल्स’ वाचेल, ‘प्रोग्रॅम’ कुठे बदलायचा आहे ते ठरवेल आणि बदलही करेल, पण...
चुकांचे निवारण : ‘प्रोग्रॅम’मधील चुकांची किंवा त्रुटींची दुरुस्ती करणे, हे ‘प्रोग्रॅमर’चे महत्त्वाचे काम. ‘क्लाऊड कोड’ स्वतःच ‘कोड’मध्ये कुठे चूक (Bug) आहे हे शोधतो, ती दुरुस्त करतो आणि पुन्हा तपासून पाहतो.
कमांड लाईन कंट्रोल : ‘क्लाऊड कोड’ थेट तुमच्या कॉम्प्युटरच्या टर्मिनलमध्ये काम करतो, फाईल्स ‘एडिट’ करतो आणि चालवूनही पाहू शकतो.
थोडक्यात सांगायचं तर, ‘चॅटजीपीटी’ म्हणजे एक ‘डिक्शनरी’ होती, तर ‘क्लाऊड कोड’ म्हणजे एक लेखक आहे, जो स्वतःच पुस्तक लिहून ते प्रकाशितही करू शकतो.
100 टक्के ‘कोडिंग’ ‘एआय’द्वारे? - एक धक्कादायक दावा
जयंतराव : मी एका चर्चेत ऐकलंय की, पुढच्या काही महिन्यांत 100 टक्के ‘कोडिंग’ ‘एआय’च करेल, हे खरं आहे का?
आदित्य : आजोबा, हे विधान थोडं अतिशयोक्ती वाटू शकतं; पण ते पूर्णपणे खोटं नाही. ‘अँथ्रोपिक’ आणि ‘डेविन’सारख्या ‘स्टार्टअप्स’चे दावे पाहिले, तर 2027 पर्यंत साध्या आणि मध्यम स्वरूपाच्या सॉफ्टवेअर विकासातील मानवी गरज जवळजवळ संपुष्टात येईल. ‘अँथ्रोपिक’चे ‘सीईओ’ डारियो अमोदेई यांनी तर संकेत दिले आहेत की, ‘कोडिंग’ ही आता एक अशी कला राहिली नाही, जी केवळ इंजिनिअर्सनाच जमेल. साध्या कामांसाठी इंजिनिअर्सची गरज 80 ते 90 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
भारतीय ‘आयटी आऊटसोर्सिंग’ आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम
जयंतराव : भारतासाठी हे तर खूप मोठं संकट आहे. ‘आयटी’ क्षेत्र हे तर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
आदित्य : हो आजोबा, हे भारतासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. भारताचे ‘आयटी मॉडेल’ हे कमी खर्चातील मनुष्यबळावर आधारित आहे. म्हणजे आपण परदेशी कंपन्यांना स्वस्त मानवी-श्रम पुरवतो.
कौशल्याचे संकट : जर ‘एआय’ एका इंजिनिअरचे काम 100 पट वेगाने करत असेल, तर कंपन्यांना कनिष्ठ डेव्हलपर्सची गरज उरणार नाही. नवीन पदवीधरांच्या नोकऱ्यांवर याचा थेट परिणाम होईल.
‘आऊटसोर्सिंग’चे भविष्य : परदेशी गिऱ्हाईक भविष्यात भारतीय कंपन्यांना ‘तासावर’ (Billing per hour) पैसे देणे बंद करू शकतात. ते म्हणतील की, आम्हाला ‘एआय’ने बनवलेलं प्रॉडक्ट हवंय, त्यासाठी आम्हाला तुमच्या एक हजार माणसांची गरज नाही.
भारतीय ‘जीडीपी’ : भारताच्या ‘जीडीपी’मध्ये ‘आयटी’ क्षेत्राचा वाटा सात-आठ टक्के आहे. जर या क्षेत्रात मोठी कपात झाली, तर त्याचा परिणाम सेवा क्षेत्र, रिअल इस्टेट आणि एकूण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. जर उत्तम पगार मिळणाऱ्या ‘आयटी’ क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी झाल्या; तर घरांच्या, गाड्यांच्या खरेदीवरही परिणाम होऊ शकतो.
कंपन्या स्वतःला कशा बदलत आहेत?
जयंतराव : मग या ‘टीसीएस’, ‘इन्फोसिस’सारख्या कंपन्या हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणार का?
आदित्य : नाही! त्या आता ‘एआय-सेंट्रिक मॉडेल’कडे वळत आहेत. यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश आहे :
1. कमर्चारी कपात की, कौशल्यवाढ? कंपन्यांनी आता केवळ ‘कोडिंग’ करणाऱ्यांपेक्षा, ‘एआय आर्किटेक्ट्स’ किंवा ‘एआय’मधील तज्ज्ञ नेमले पाहिजेत.
2. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट : सेवा देण्यापेक्षा, भारतीय कंपन्यांनी आता स्वतःची ‘एआय टूल्स’ विकसित करणे गरजेचे आहे.
3. बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन : आता भारतीय ‘आयटी’ कंपन्या क्लायंटला फक्त सॉफ्टवेअर बनवून न थांबता, ‘एआय’ वापरून क्लायंटचा व्यवसाय कसा वाढवता येईल, याचे सल्ले देऊ शकतात.
तज्ज्ञांचे मत : ‘द एंड ऑफ कोडिंग’ की नवीन सुरुवात?
आदित्य : ‘एनव्हिडिया’चे ‘सीईओ’ जेन्सन हुआंग म्हणतात की, आता मुलांनी ‘कोडिंग’ शिकण्याची गरज नाही; तर त्यांनी एखाद्या क्षेत्रातील उद्योगधंद्याचे ज्ञान (डोमेन नॉलेज उदा. शेती, आरोग्य, व्यापार) मिळवावे, कोडिंग ‘एआय’ करेल. दुसरीकडे काही तज्ज्ञांना वाटते की, ‘एआय’मुळे सॉफ्टवेअर इतके स्वस्त होईल की, प्रत्येक लहान दुकानासाठी सॉफ्टवेअर लागेल, ज्यामुळे सॉफ्टवेअरची एकूण मागणी प्रचंड वाढेल. ‘एक्सेल’ आल्यावर वाटलं होतं की, अकाऊंटंट्सची गरज संपेल; पण उलट ‘अकाऊंटिंग’चा व्यवसाय वाढला.
भारतीय तरुणांसाठी संधी : ‘एआय’द्वारे विकास
आदित्य : आजोबा, जरी जुन्या नोकऱ्या गेल्या, तरी भारताकडे जगातील सर्वात मोठा तरुणांचा ‘डेव्हलपर बेस’ आहे. जर आपण ‘एआय’ला ‘शत्रू’ न मानता ‘शस्त्र’ म्हणून स्वीकारलं, तर भारत जगाची ‘एआय फॅक्टरी’ बनू शकतो. ज्यांना ‘एआय टूल्स’ (जसे की, ‘क्लाऊड कोड’) वापरून 10 पट वेगाने सॉफ्टवेअर बनवता येईल, त्यांना भविष्यात सोन्याचे दिवस असतील.
जयंतरावांनी वृत्तपत्र खाली ठेवले आणि आदित्यने दिलेल्या माहितीवर विचार करू लागले.
जयंतराव : म्हणजे थोडक्यात काय आदित्य, तर ज्याला फक्त ‘कोड’ लिहिता येतो तो संपला; पण ज्याला ‘प्रॉब्लेम’ सोडवता येतो, तो टिकला.
आदित्य : अगदी बरोबर आजोबा! ‘क्लाऊड कोड’ हा ‘आयटी’ क्षेत्राचा ‘मृत्यू’ नाही, तर तो एका जुन्या पद्धतीचा अंत आणि एका नवीन ताकदीची सुरुवात आहे. आपण फक्त सेवा पुरवठादार न राहता, ‘कल्पक तंत्रज्ञ’ बनण्याची हीच ती वेळ आहे.
- डॉ. कुलदीप देशपांडे