Assembly Elections 2026: निवडणुकांचे बिगुल वाजले! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसह बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचीही घोषणा

    15-Mar-2026   
Total Views |
Assembly Elections 2026 
नवी दिल्ली: (Assembly Elections 2026) केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) आज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारीखांची घोषणा केली आहे. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे संध्याकाळी ४ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण मतदान वेळापत्रक जाहीर केले. या निवडणुकीचे निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होतील.
 
मतदानाचे टप्पे आणि तारीखा
  • पश्चिम बंगाल: दोन टप्प्यांत मतदान – २३ एप्रिल आणि २९ एप्रिल; राज्यात हिंसाचार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त.
  • तामिळनाडू: २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान.
  • आसाम: ९ एप्रिल रोजी सर्व १२५ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान.
  • केरळ: ९ एप्रिल रोजी सर्व १४० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान.
  • पुद्दुचेरी: ९ एप्रिल रोजी केंद्रशासित प्रदेशातील ३० जागांसाठी मतदान.
सर्व राज्यांमध्ये मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होईल.
 
मतदान प्रक्रिया आणि कर्मचारी 
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी एकूण २५ लाख कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यापैकी १५ लाख कर्मचारी मतदान प्रक्रिया सुलभ करण्यात योगदान देतील, तर ८,५०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. मतदान केंद्रांवर ४९,००० सूक्ष्म-निरीक्षक आणि १,४४४ निरीक्षक उपस्थित राहतील. मतमोजणीसाठी ४०,००० मतमोजणी अधिकारी, २१,००० क्षेत्रीय अधिकारी आणि १५,००० सूक्ष्म-निरीक्षक कार्यरत राहतील.
 
मतदारसंख्या आणि निवडणूक यंत्रणा
या पाच राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार असून ८२४ विधानसभा जागा आहेत. गेल्या १२ महिन्यांत निवडणूक आयोगाने ‘SIR’ उपक्रमासह अनेक उपाय राबवले आहेत, ज्यामुळे मतदार यादीतील अपात्र व्यक्ती दूर राहतील. मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल फोन जमा करणे अनिवार्य असून, मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदार आपले फोन परत घेऊ शकतील.
 
आचारसंहिता लागू
या घोषणेसह पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू झाली आहे, ज्यामुळे निवडणूक पारदर्शक आणि सुरक्षित पार पडेल. २०२१ मध्ये या राज्यांमध्ये मतदान विविध टप्प्यांत पार पडले होते; पश्चिम बंगालमध्ये आठ टप्पे, आसाममध्ये तीन टप्पे तर तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते.


महाराष्ट्रातील पोटनिवडणुका
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले, तर भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांचे २०२५ मध्ये निधन झाले. यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांवर मतदान २३ एप्रिल रोजी होईल. बारामती आणि राहुरी या जागांवर सहानुभूतीची लाट असल्याने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे, मात्र राजकीय पक्षांची भूमिका निर्णायक ठरेल.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.