US Iran War: अमेरिका भारतासमोर भीक मागतोय; रशियन तेलप्रश्नी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बोचरी टीका

14 Mar 2026 12:10:50
US Iran War
 
वॉशिंग्टन/तेहरान: (US Iran War) मध्यपूर्वेत सुरू असलेला अमेरिका-इराण संघर्ष सलग तिसऱ्या आठवड्यातही कायम आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या तणावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक तेलबाजारावर होत असून ऊर्जा पुरवठ्यावरही दबाव वाढत आहे.
 
अमेरिकेवर इराणची तीव्र टीका
या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
 
अराघची म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी अमेरिका भारतावर दबाव टाकत होता की त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करू नये. मात्र इराणसोबतचा संघर्ष सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आता अमेरिका भारतासह जगातील अनेक देशांना रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची विनंती करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
युरोपच्या अपेक्षा ठरल्या फोल
अराघची यांनी पुढे म्हटले की, युरोपमधील काही देशांना असे वाटत होते की इराणविरोधी भूमिकेला पाठिंबा दिल्यास रशियाविरुद्ध अमेरिकेचे समर्थन मिळेल. मात्र प्रत्यक्षात अमेरिका स्वतःच्या हितासाठी रशियन तेलावरील निर्बंध काही काळासाठी शिथिल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

भारताला ३० दिवसांची सवलत
दरम्यान, अमेरिकेने रशियन तेलासंबंधी काही निर्बंध तात्पुरते कमी केले आहेत. आधीच समुद्रात असलेल्या जहाजांवरील रशियन कच्च्या तेलासाठी ही सवलत लागू करण्यात आली आहे. जागतिक बाजारात स्थिरता राखणे आणि इंधनदर नियंत्रणात ठेवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
 
या निर्णयानुसार भारतासह काही देशांना सुमारे ३० दिवसांच्या कालावधीसाठी रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी देण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकेतही इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याची चर्चा आहे.
Powered By Sangraha 9.0