सीरियातला नवा उद्योग - ‘डार्क’ पर्यटन

14 Mar 2026 11:08:20
Dark Tourism
 
पर्यटन म्हटले की, डोळ्यासमोर आपसुकच चित्र उभे राहते ते निळेशार अथांग समुद्रकिनारे, उंच पर्वतशिखरे, घनदाट वृक्षराजी, पुरातन मंदिरे वगैरे. कारण, पर्यटन म्हणजे हवापालट आणि एकंदरच सुखावणारा अनुभव. पण, जगात असेही काही पर्यटक आहेत, जे मृत्यू, शोकांतिका, विनाश, युद्ध किंवा ऐतिहासिक आपत्तींशी संबंधित स्थळांना भेट देणे पसंत करतात. यालाच ‘डार्क’ अथवा ‘ब्लॅक टुरिझम’ म्हणून ओळखले जाते. अशाच सीरियामधील ‘डार्क’ पर्यटनाच्या एका नवोद्योगाविषयी...
 
सीरिया हा देश इस्रायलच्या शेजारीच आहे. २०११ मध्ये इजिप्त आणि लिबिया या अरबी देशांमध्ये क्रांती होऊन अनुक्रमे मुबारक आणि गद्दाफी यांच्या राजवटी उलथून टाकण्यात आल्या. या क्रांतीला ‘अरबी वसंतऋतू’ ‘अरब स्प्रिंग’ असे म्हटले गेले. सीरियातही त्याच वेळी उठाव झाला होता. पण, सीरियन हुकूमशहा बशर असद हा मुबारक आणि गद्दाफी यांच्याप्रमाणे सत्ता भोगून-भोगून सुस्तावलेला नव्हता. त्याने सीरियन बंडखोरांना सरळ ठार मारायला सुरुवात केली. तो बंडखोरांना किंवा अन्य विरोधकांना गोळ्याबिळ्या घालून मारत नसे. तो बंडखोरांच्या वस्त्यांवर बुलडोझर घालून त्यांना बायकापोरांसह सरळ चिरडूनच टाकत असे. हो, उगीच एकेकाला गोळ्या घालून मारत बसणे म्हणजे वेळ आणि दारुगोळ्याचा अपव्ययच नव्हे का? त्यापेक्षा चिरडून टाकणे सोपे! २०११ पासून २०२४च्या डिसेंबरपर्यंत सीरियात अनेक ठिकाणी असे चिरडण्याचे प्रकार किती घडले असतील, याची गणतीच नाही.
 
बंडखोरांना असे चिरडून टाकण्याच्या असदच्या या प्रयत्नांना रशिया आणि इराण यांचा सक्रिय पाठिंबा होता. म्हणजे, त्या दोघांनी आपल्या निवडक सैनिकी तुकड्या असदच्या साहाय्यार्थ पाठवल्या होत्या. असे अनेकदा घडले आहे की, परदेशी वार्ताहर एखाद्या सीरियन शहरात फिरत असायचे. त्यांच्यासोबत तेे विशिष्ट शहर ज्यांच्या ताब्यात असेल, त्या पक्षाचे सैनिक असायचे. म्हणजे सत्तारूढ आसदचे अधिकृत सीरियन सैनिक किंवा बंडखोर गनीम. एखाद्या वार्ताहराला आधीच्या भेटीतल्या एखाद्या विशिष्ट भागाची आठवण व्हायची. तो त्या सैनिकांना तिथे चलायला सांगायचा. तिथे पोहोचल्यावर दिसायचे की, संपूर्ण वस्ती गायब झालेली असून, तिथे एक सपाट मैदान फक्त आहे. तो वार्ताहर आश्चर्य व्यक्त करायचा. त्यावर ते सैनिक त्याला मैदानाजवळ जाऊन नीट बघायला सांगायचे. मग दिसायचे की, ती संपूर्ण वस्ती, तिथल्या वास्तू, इमारती, टपर्‍या, माणसे यांच्यासकट बुलडोझरखाली तुडवून, चेपून ते मैदान बनले आहे.
 
हे सगळे बंडखोर मुसलमानच होते. फरक असलाच, तर तो फक्त पंथाचा होता. तरीही, इतया भीषण क्रूरपणे त्यांना ठार करण्यात आले. २०१५ मध्ये या संघर्षात ‘इसिस’ ही संघटना पण उतरली. सीरियाच्या वाळवंटात पालमायरा नामक प्राचीन शहर आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात त्या परिसरात ‘मेसोपोटेमियन’ या नावाची सभ्यता नांदत होती. त्या काळात त्या लोकांनी त्यांच्या ‘बेल’ नामक देवाचे देऊळ बांधले होते. किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे ते ‘टेम्पल ऑफ बेल’ अजून बर्‍या अवस्थेत होते. ते बघायला लांबून-लांबून पर्यटक यायचे. सीरियन अरब हे मुसलमान झाल्यावरही, कसे कोण जाणे; पण अजूनही ते मंदिर शाबूत होते. पण, ‘इसिस’वाल्यांनी विचार केला की, ‘तालिबान’वाल्यांनी बामियाँमधल्या विशाल बुद्धमूर्ती उद्ध्वस्त करून केवढे महान कृत्य केले. मग आम्ही का मागे रहावे? मग २०१५ साली त्यांनी पालमायराचे ‘टेम्पल ऑफ बेल’ सुरुंग लावून उडवून दिले.
 
अखेर २०२४च्या डिसेंबरमध्ये बशर असदची घटका भरली. हयात ‘तहरीर अल् शाम’ किंवा ‘एचटीएस’ या बंडखोर गटाने असदच्या लष्कराचा पराभव करून सत्ता हडपली. सध्यातरी ‘एचटीएस’चा प्रमुख अहमद अल् शारा हा सीरियाचा सर्वेसर्वा आहे. बशर असद सहकुटुंब मॉस्कोला पळाला. तो नेत्रविशारद डॉक्टर आहे. त्यामुळे रशियाचा राजकीय आश्रित म्हणून तो मॉस्कोत मजेत राहात असून, उच्च राजकीय वर्तुळातल्या लोकांचे डोळे तपासण्याचे काम छंद म्हणून करतो, असे सांगतात. परवा दि. २८ फेब्रुवारी २०२६ला सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धात सीरिया अद्याप बाजूलाच आहे.
 
साधारण जगात सर्वत्र नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला बरे दिवस असतात. कारण, युरोपीय आणि विशेषतः अमेरिकन पर्यटक या काळात फिरायला निघतात. त्यांच्या खिशात भरपूर माल असतो. तो हलका करण्याचे सुखद कार्य जगभरच्या पर्यटनसेवा देणार्‍या कंपन्या करत असतात, तर यंदाच्या या मोसमात सीरियात भरपूर पर्यटक आले. तसा सीरिया हा पर्यटकांचा आवडता देश. दमास्कस, अलेप्पो इत्यादी प्राचीन शहरे, तिथले ऐतिहासिक किल्ले वगैरे बघायला लोकांना आवडते. ‘दमास्कस स्टील’ म्हणजे दमास्कसमध्ये विशिष्ट रीतीने बनवले जाणारे पोलाद हे एकेकाळी जगभर प्रसिद्घ होते. ‘दमास्कस स्टील’पासून बनवल्या जाणार्‍या तलवारी, भाले, बाणांचे फाळ हे फारच मौल्यवान मानले जात असत. दमास्कसच्या संग्रहालयात हे सगळे बघायला मिळते. पोलाद बनवण्याची ती विशिष्ट प्रक्रियासुद्घा आजच्या शास्त्रीय परिभाषेत समजावून दिली जाते. अलेप्पो या प्राचीन शहरातला १२व्या शतकातला किल्ला आणि उमायद मशीद; तसेच तिथले अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ यासाठी पर्यटक जीव टाकतात.
 
परंतु, या मोसमात पर्यटन कंपन्यांच्या चालकांना किंवा अन्य वैयक्तिक व्यावसायिकांना जरा वेगळाच अनुभव आला. रीटा बादरन ही खरे म्हणजे दंतवैद्यक महाविद्यालयात शिकणारी एक विद्यार्थिनी आहे. तिने आपल्या ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवरून दमास्कस आणि अन्य सीरियन शहरांमधल्या विविध पर्यटन स्थळांची स्वत: काढलेली भरपूर चित्रे आणि अन्य माहिती दिली. तिला भरपूर ‘फॉलोअर्स’ मिळाले आणि त्यांनी तिला असा आग्रह केला की, तू आम्हाला प्रत्यक्ष अशा ठिकाणी घेऊन चल की, जिथे नुकत्याच संपलेल्या यादवी युद्घात भयंकर घटना घडल्या आहेत. पर्यटकांना कशात स्वारस्य आहे, हे लक्षात आल्याबरोबर रीटा बादरन आणि तिच्यासारख्या अनेकांनी धडाधड तशा सहली आयोजित केल्या.
 
पालमायरा शहरातले उद्ध्वस्त ‘टेम्पल ऑफ बेल’ बघायला भरपूर पर्यटक आले. पूर्वीही यायचेच. पण, पूर्वी येणारे पर्यटक हे ते विशाल मंदिर, ते विशाल स्तंभ, त्यांची अप्रतिम रचना हे सगळे अनुभवायला, ते पाहून थक्क व्हायला यायचे. आताचे पर्यटक ते मंदिर उद्ध्वस्त कसे केले आहे, हे बघायला आले, येत आहेत. सैदनाया नावाचे शहर दमास्कसच्या उत्तरेला २७ किमी अंतरावर डोंगरात आहे. इथल्या तुरुंगात असदच्या सैनिकांनी अगणित नागरिकांना, ते बंडखोर असल्याच्या नुसत्या शंकेवरून कोंडून ठेवले आणि अक्षरश: शेळ्यामेंढ्यांची कत्तल उडवावी, तसे त्यांना ठार मारले. वार्ताहरांनी सैदनायाच्या या तुरुंगाला ‘मानवी खाटिकखाना’ असेच नाव दिले होते. नव्या पर्यटकांना हा तुरुंग बघण्यात भलतेच स्वारस्य आहे, असे रीटा बादरनला आढळले. मग तिने मस्त धंद्याची लाईन पकडली.
 
हा तुरुंग अजून चालू स्थितीत आहे. दुसर्‍या महायुद्धात नाझींनी ऑशवित्झ, स्पान्डाऊ इत्यादी तुरुंगांमध्ये लक्षावधी ज्यू लोकांना विषारी वायूचा प्रयोग करून ठार मारले होते. आज ही ठिकाणे त्या ज्यूंची स्मारके म्हणून जतन करण्यात आलेली आहेत. शेकडो इस्रायली आणि अन्यही पर्यटक तिथे मुद्दाम जातात. ते तुरुंग, तिथले गॅस चेंबर्स पाहतात. त्या निरपराध बळींना श्रद्धांजली अर्पण करतात. सैदनाया तुरुंग अजून चालू स्थितीत असल्यामुळे तिथे आत जायला परवानगी नाही. पण, रीटा बादरन आणि अन्य चतुर पर्यटन व्यावसायिकांनी तिथल्या रक्षकांना पटवले. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तुरुंगाच्या आत यायला त्यांनी परवानगी दिली. लगेच या लोकांनी जाहिरात झळकवली - ‘सैदनायाचा मानवी खाटिकखाना बघायला चला. शुल्क अमुक डॉलर्स आणि फक्त १०० डॉलर्स आणखी दिलेत, तर तो तुरुंग आतूनसुद्धा बघायला मिळेल’. याला म्हणतात धंद्याची लाईन!
 
मात्र, ऑशवित्झची ‘नाझी छळछावणी’ आणि सैदनायाचा ‘मानवी खाटिकखाना’ बघायला जाणार्‍या लोकांच्या मनोवृत्तीत खूप फरक आहे, असे या सगळ्या व्यावसायिकांच्या लक्षात आले. ऑशवित्झला जाणारे लोक मानवी क्रौर्याची परिसीमा बघायला जातात. ती पाहून, अनुभवून हळहळतात, गंभीर होतात. सैदनायाचा तुरुंग बघणारे पर्यटक मस्त मजेत, हसतखेळत असतात. सेल्फी तर सगळेच काढत असतात. पण, याठिकाणी आपल्यासारखीच माणसे नाहक मेली, त्यांचा काहीही अपराध नसताना त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले, याबद्दल त्यांना काहीही अनुकंपा वाटलेली दिसत नाही, हे चांगले लक्षण नव्हे. रोमन साम्राज्य वैभवाच्या अत्युच्च शिखरावर असताना राजधानी रोमच्या ‘कलोसियम’ नामक प्रेक्षागृहात वाघ-सिंहांसारखे क्रूर पशू विरुद्ध हत्यारे घेतलेले ‘ग्लॅडिएटर्स’ यांचे सामने व्हायचे. कोणाच्याही आघाताने कोणीही ठार झाले, तरी रक्ताची कारंजी उसळायचीच. ती पाहून ते रोमन प्रेक्षक मिटक्या मारत जल्लोष करायचे. केव्हातरी ‘रूचिपालट’ म्हणून युद्धात पकडलेल्या कैद्यांना, गुन्हा केलेल्या गुलामांना मैदानात निःशस्त्र सोडून त्यांच्या अंगावर भुकेले वाघ-सिंह सोडले जात. ते क्रूर पशू त्या असाहय्य माणसांच्या अंगाचे लचके तोडून खाताना पाहून रोमन प्रेक्षक भलतेच खूश होत असत. याला ‘आंबटशौक’ म्हणतात. ही मनोविकृती आहे. सीरियातला विध्वंस बघायला डॉलर्सच्या थप्प्या घेऊन जाणारे पर्यटक असेच आंबटशौकीन असावेत.
 
व्हाईटअवे लेडलॉ
 
मुंबईच्या फोर्ट भागात जुन्या हॉर्नबी रोडवर म्हणजे आताच्या दादाभाई नौरोजी मार्गावर खादी ग्रामोद्योग मंडळाची एक भलीमोठी शोरूम आहे. ही इमारत फोर्ट भागातल्या संरक्षित ऐतिहासिक वारसा वास्तूंपैकी एक आहे. पूर्वी इथे ‘व्हाईटअवे लेडलॉ’ नावाचे भव्य डिपार्टमेंटल स्टोअर होते. फोर्टमधली ‘आर्मी अ‍ॅण्ड नेव्ही स्टोअर्स’, ‘इव्हान्स फे्रझर’ इत्यादी दुकाने इंग्रज आणि श्रीमंत स्थानिक लोकांमध्ये फार प्रसिद्ध होती. त्यातलेच ‘व्हाईटअवे लेडलॉ’ हे एक. त्याची प्रसिद्धी उत्कृष्ट कपड्यांसाठी जास्त होती. खुद्द लंडन शहरात ‘सेलफ्रिजेस’ नावाचे असेच एक डिपार्टमेंटल स्टोअर्स फार प्रसिद्ध होते, आजही आहे. ‘व्हाईटअवे लेडलॉ’ला मुंबईकर साहेबलोक ‘पूर्वेकडचे सेलफ्रिजेस’ म्हणत असत.
 
तर, हा ‘व्हाईटअवे लेडलॉ’वाला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका सुप्रभाती एकाएकी पळून गेला. तो असा का पळाला, याबद्दल तत्कालीन मुंबई सरकारच्या सचिवालयात एक किस्सा फार चवीने सांगितला जात असे. इंग्रजांच्या काळापासून मुंबई इलाख्याचा इंग्रज गव्हर्नर आणि मग मुंबई प्रांताचा राज्यपाल हे वाळकेश्वरच्या ‘गव्हर्नर हाऊस’ किंवा राजभवनात रहात असतात. आता या राजभवनाचे लोकभवन झाले असून, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल तिथे राहतात.
 
तर, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक सत्ताधारी बगळा म्हणजे सफेद धोतर, सफेद कुडता, सफेद टोपीवाला धंदेवाईक राजकारणी फोर्टमध्ये फिरत असताना ‘व्हाईटअवे लेडलॉ’मध्ये शिरला. त्याने उत्तमपैकी थ्री-पीस सूट शिवण्याची मागणी नोंदवली. मग स्टोअरच्या शिंप्याने रीतीप्रमाणे मापे घेण्यास सुरुवात केली. शर्ट, जाकिट, कोट यांची मापे घेऊन झाली. पँटचीही मापे जवळजवळ घेऊन झालीच. तेवढ्यात मापे घेणार्‍याच्या काहीतरी लक्षात आले आणि त्याने प्रश्न केला, "गव्हर्नर वुईच साईड, सर?” बगळ्याला काहीच कळले नाही. तो गप्प राहिला. शिंप्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. बगळा बावचळला. पण, प्रसंगावधान राखून त्याने पटकन उत्तर देऊन टाकले - "गव्हर्नर? वाळकेश्वर!” ‘व्हाईटअवे लेडलॉ’वाला रातोरात इंग्लंडला पळून गेला. हा विनोदी किस्सा अगदी १९८०च्या दशकापर्यंत सचिवालय-मंत्रालय परिसरात खूप चवीने चघळला जात असे. नोकरशहा राजकारण्यांची टिंगल अशा रीतीने करून घेत.
 
- मल्हार कृष्ण गोखले
 
 
 
Powered By Sangraha 9.0