मुंबई : (Divyang Empowerment Department) राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभागाच्या नावात बदल केला असून तो आता 'दिव्यांग सक्षमीकरण विभाग' या नावाने ओळखला जाणार आहे. तसेच विभागाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता आणण्यासाठी विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ या कायद्याने दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कल्याणकेंद्री न राहता हक्कआधारित सक्षमीकरण असा स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे सक्षमीकरण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. दिव्यांग क्षेत्रातील बदलती आव्हाने, नव्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा प्रभाव लक्षात घेऊन विभागाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या क्षेत्रात कार्यरत संस्था, तज्ज्ञ आणि विविध घटकांचा सहभाग विचारात घेऊन ही रचना अधिक सर्वसमावेशक करण्यात आली आहे.
आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांचे पदनाम बदलून आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे असे करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे याचे नामांतर दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे असे करण्यात आले आहे. आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण हे विभाग प्रमुख म्हणून कार्य करतील आणि त्यांच्या नियंत्रणाखाली राज्यातील जिल्हास्तरीय यंत्रणा कार्यरत राहील. जिल्हास्तरावरील कार्यालयांचे नाव 'दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय (संबंधित जिल्हा)' असे राहील. मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयांवर संबंधित जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण आणि पर्यवेक्षण राहील. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये या कार्यालयांचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहील.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....