जागतिक अर्थव्यवस्थेत सागरी वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो आणि या क्षेत्राचा पाया म्हणजे, जहाजबांधणी उद्योग. जगभरातील व्यापार, ऊर्जा वाहतूक, संरक्षण आणि ‘ऑफशोअर’ उद्योग यांच्या वाढत्या गरजांमुळे जागतिक जहाजबांधणी बाजार झपाट्याने विस्तारत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक जहाजांची वाढती मागणी आणि संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे हा उद्योग नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
जागतिक जहाजबांधणी बाजाराचे मूल्य २०२४ मध्ये सुमारे १४५.६५ अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. आगामी काळात या उद्योगाची वाढ कायम राहण्याची अपेक्षा असून, २०३२ पर्यंत हा बाजार सुमारे २१२.७५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २०२५ ते २०३२ या कालावधीत या क्षेत्राचा वार्षिक सरासरी वाढीचा दर सुमारे ४.८५ टक्के राहण्याची शक्यता आहे. जागतिक व्यापारातील सातत्यपूर्ण वाढ, ऊर्जा वाहतुकीची वाढती गरज आणि नवीन पिढीतील जहाजांची मागणी ही वाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. जागतिक जहाजबांधणी बाजारात आशिया-पॅसिफिक प्रदेशाचा सर्वाधिक प्रभाव आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि जपान हे देश जहाजबांधणी क्षेत्रातील प्रमुख नेते मानले जातात. या देशांकडे अत्याधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा, प्रशिक्षित कामगारवर्ग आणि सरकारचे मजबूत समर्थन आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या देशांनी जागतिक बाजारपेठेत आघाडी घेतली आहे.
जागतिक व्यापारातील सुमारे ८० टक्के मालवाहतूक समुद्रमार्गे केली जाते. त्यामुळे कंटेनर जहाजे, बल्क कॅरिअर आणि टँकर जहाजांची मागणी सातत्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात माल वाहून नेणारी आणि इंधन कार्यक्षम जहाजे तयार करण्यावर शिपिंग कंपन्यांचा भर वाढला आहे. जागतिक शिपिंग कंपन्या नवीन तंत्रज्ञानयुक्त जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. उदाहरणार्थ, काही आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी ‘स्मार्ट लॉजिस्टिस’ तंत्रज्ञानासह नवीन पिढीतील कंटेनर जहाजांची ऑर्डर दिली आहे. यामुळे मालाची हाताळणी अधिक कार्यक्षम होते आणि इंधनाचा वापर कमी होतो. पर्यावरण-संरक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सागरी उद्योगावर जागतिक स्तरावर दबाव वाढत आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने लागू केलेल्या पर्यावरणीय नियमांमुळे जहाजबांधणी उद्योगात मोठे बदल होत आहेत. ‘एलएनजी’वर चालणारी जहाजे, ‘हायब्रिड प्रोपल्शन’ प्रणाली, हायड्रोजन किंवा मिथेनॉलवर चालणारी जहाजे यांचा वापर वाढत आहे. आधुनिक जहाजांमध्ये ऊर्जा कार्यक्षम हुल डिझाईन, वारा साहाय्यीत प्रोपल्शन आणि कमी उत्सर्जन करणारी इंजिन प्रणाली वापरली जाते. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होते आणि सागरी वाहतूक अधिक टिकाऊ बनते.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे जहाजबांधणी उद्योगात मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आणि ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर करून ‘स्मार्ट जहाजे’ विकसित केली जात आहेत. या तंत्रज्ञानामुळे जहाजांची कार्यक्षमता वाढते आणि संचालन अधिक सुरक्षित होते. स्मार्ट जहाजांमध्ये ‘रिअल-टाईम मॉनिटरिंग’ प्रणाली, स्वयंचलित नेव्हिगेशन, पूर्वानुमानाधारित देखभाल आणि इंधन कार्यक्षम व्यवस्थापन प्रणाली असतात. यामुळे ‘ऑपरेशन’चा खर्च कमी होतो आणि मानवी त्रुटींची शक्यता घटते. जागतिक स्तरावर वाढत असलेल्या भू-राजकीय तणावामुळे अनेक देश आपल्या नौदल क्षमतेत वाढ करत आहेत. तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि वाढता जागतिक व्यापार या तिन्ही घटकांमुळे जहाजबांधणी उद्योगाचे भविष्य उज्ज्वल मानले जात आहे. हरित जहाजे, स्मार्ट सागरी प्रणाली आणि आधुनिक संरक्षण जहाजांची वाढती मागणी या उद्योगाला पुढील दशकात अधिक गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. जागतिक सागरी व्यापार अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी जहाजबांधणी उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत राहील. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या साहाय्याने हा उद्योग जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून पुढेही विकसित होत राहणार आहे.