PM Narendra Modi: ममता दीदींचं सरकार जाण्याचा काउंटडाऊन सुरू; पंतप्रधान मोदींनी टीएमसीविरुद्ध फुंकले रणशिंग

    14-Mar-2026   
Total Views |
PM Narendra Modi  
 
कोलकाता : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात जनतेला संबोधित केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यात विकासकामांचा आढावा घेतला आणि टीएमसीवर थेट हल्लाबोल करत राज्यातील सध्याच्या सरकारवर टीका केली.
 
१८ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत तब्बल १८ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन केले. ते म्हणाले, "राज्यात होणारे प्रकल्प केवळ व्यापार आणि उद्योगांना बळ देणार नाहीत, तर रोजगाराच्या संधी देखील निर्माण करतील. केंद्र सरकार रेल्वेचे विस्तारीकरण वेगाने करत आहे, पश्चिम बंगालमध्ये देखील हे सुरू आहे. या प्रकल्पांमुळे नागरिकांचे जीवन अधिक सोपे होईल आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल." पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, राज्यातील विकासकामे दीर्घकालीन दृष्टीकोनातून नियोजित केली जात आहेत, ज्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना रोजगार व आर्थिक स्थैर्य मिळेल.
 
टीएमसीवर थेट हल्लाबोल
सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीएमसीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "सध्याचे राज्य सरकार महाजंगलराज चालवत आहे. आमच्या गर्दीला रोखण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले गेले, ब्रिज बंद केले, गाड्या अडवल्या, ट्रॅफिक जाम केले, भाजपचे झेंडे आणि पोस्टर फाडले. मात्र जनतेला हे रोखता आले नाही. लवकरच पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य येईल आणि अत्याचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसीवर आरोप करत म्हटले की, "ममता सरकारने केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ राज्यातील लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही. त्यांनी माफियांना संरक्षण दिले आणि भ्रष्ट नेत्यांना वाचवले आहे. बंगालमधून टीएमसी सरकारची पाठवणी होणार आहे, आणि ममता दीदींच्या सरकार जाण्याचा काउंटडाऊन सुरू झाला आहे."
 
रोजगार आणि स्थलांतरावर भाष्य
पंतप्रधान मोदींनी राज्यातील रोजगार स्थितीवर भाष्य करत म्हटले, "ममता सरकारच्या काळात बंगालमधील रोजगाराच्या संधी संपल्या आहेत. चुकीच्या धोरणांमुळे उद्योग स्थगित झाले आहेत, स्थलांतर वाढले आहे, तरुणांना नोकरीसाठी इतर राज्यांकडे वळावे लागत आहे. आम्ही येणाऱ्या भाजपा सरकारमुळे राज्यातील विकासासाठी पूर्ण ताकद लावू, ज्यामुळे रोजगार संधी वाढतील आणि तरुणांना त्यांच्या राज्यातच काम करण्याची संधी मिळेल."
 
विकासासाठी जनतेची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकाता रॅलीत सांगितले की, जनतेला आपल्या निर्णयातून बदल घडवून आणण्याची संधी आहे. ते म्हणाले, "भाजप पश्चिम बंगालचे नवनिर्माण करेल, गरिबांना घरं देईल, उद्योग उभारेल आणि लोकांना त्यांच्या शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. टीएमसीने लोकांना भ्रमित केले, पण आता जनतेला सत्य समजले आहे. विकासासाठी जनता भाजपा सरकारला निवडून देईल."
 
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण
पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल दौऱ्यातील कार्यक्रमानंतर नोएडा आणि दिल्ली-NCR नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली. जेवर (गौतमबुद्ध नगर) येथे उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण येत्या २६ मार्च रोजी राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे भव्य विमानतळ NCR प्रदेशातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित करेल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढतील.
 
निवडणूक आणि भविष्यकालीन धोरण
मोदींनी पश्चिम बंगालच्या लोकांशी संवाद साधताना विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या धोरणांवर भर दिला. ते म्हणाले की, राज्यातील अनेक विकासकामांमुळे बेरोजगारी कमी होईल, उद्योग वाढतील आणि स्थलांतर रोखले जाईल. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.