चंद्रपूर : (Devendra Fadnavis) काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांना गॅसकरिता रांगा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशात घबराट निर्माण करण्याची काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
गॅस तुटवड्याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काही पक्ष आणि विशेषत: काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी गॅससाठी रांगा लावाव्या असा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार, गॅस कंपन्या आणि सचिवांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घरगुती गॅसचे संकट नाही. महिन्याला जेवढा गॅस लागतो तेवढा पुरवठा आपण केलेला आहे. त्यामुळे कुणीही चिंता करण्याचे आणि विनाकारण रांगा लावण्याचे कारण नाही. ऑनलाईन बुकिंग होत आहे. लोकांना वेळेत मिळण्यासाठी गॅस उपलब्ध आहे. पण आपल्या देशात घबराट निर्माण करण्याची काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक आहे."
"एकूणच आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता या गोष्टींवर केंद्र सरकारच्या अधिकृत लोकांनीच मत व्यक्त केले पाहिजे. परंतू, जे लोक मोदीजींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करतात, त्या सर्वांना मोदीजी कृतीतून उत्तर देतात. आज जगात वेगवेगळ्या देशात समेट घडवून आणण्याची ताकद नरेंद्र मोदी यांची आहे, असे अमेरिकेतील मोठ्या राजनयिकाने सांगितले आहे. त्यामुळे आपल्या देशातील बडबड आणि फरफड करणाऱ्या नेत्यांनी हे समजून घेत देशाची बदनामी बंद केली पाहिजे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
दोन्ही प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते न्यू एरा क्लीनटेकच्या इंटिग्रेटेड कोल गॅसिफिकेशन (कोल-टू-केमिकल्स) आणि कार्बन कॅप्चर प्रोजेक्टचे भूमिपूजन कोनशिला अनावरण पार पडले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "हे दोन्ही प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहेत. आतापर्यंत आपण कोळसा जाळून प्रदुषण करत होतो. अनेक वर्षांपासून आपल्या देशात कोळसा वायूकरण (Coal gasification) ची चर्चा सुरु होती, ज्यामुळे प्रदुषण होत नाही. आज देशात एकूण ७ प्रकल्प मंजूर केले असून त्यातील चार प्रकल्प विदर्भात मंजूर झाले आहेत. यातील दोन प्रकल्पांचे भूमिपूजन आज केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये प्रदुषण न करणाऱ्या प्रक्रियेतून तयार झालेले स्टील विकत घेतात, त्याला ग्रीन स्टील म्हणतात. अशा प्रकारच्या स्टीलमध्ये भारताला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्णय आहे. त्यातील पहिला प्लांट भद्रावतीमध्ये होतो आहे. या दोन प्रकल्पांमुळे जवळपास २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या माध्यमातून देशाच्या ऊर्जा सुरक्षेत विदर्भ मोठा वाटा देणार आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.