मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जापुरवठ्यावर ताण निर्माण झाला, हे वास्तव. तेल, नैसर्गिक वायू आणि इतर इंधनांच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जगभर चर्चिली जात आहे. मात्र, भारतातील परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले की, देशात पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू आणि ‘एलपीजी’चा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. तरीही, समाजमाध्यमांवर आणि काही अफवांच्या माध्यमातून देशात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा अपप्रचार सुरू आहे. या अफवांचा सर्वात मोठा परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. आज अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडर घेण्यासाठी लोकांच्या लांबलचक रांगा दिसताहेत. उन्हात तासन्तास उभे राहून नागरिक सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करताहेत. काही ठिकाणी ‘एलपीजी’ सिलिंडर जास्त किमतीत विकले जात असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. सपा नेते अब्दुल रेहान यांच्या घरी ५५ सिलिंडर्सचा साठा आढळला; ज्याचा प्रतिसिलिंडर दोन हजार दराने काळाबाजार केल्याचा आरोप होतोय. त्याचबरोबर तामिळनाडू आणि चंद्रपुरातूनही अशी प्रकरणे समोर आली आहेत.
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘कोविड’ महामारीच्या काळातही अशीच परिस्थिती निदर्शनास आली होती. तेव्हा ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला होता. आज ‘एलपीजी’ सिलिंडरबाबत ज्या तक्रारी येत आहेत, त्या त्या काळातील परिस्थितीचीच आठवण करून देणार्या. संकट किंवा भीती निर्माण झाली की, काही लोक त्यातून नफा मिळवण्याचा मार्ग शोधतात, ही समाजातील कटू वास्तवता आहे. जेव्हा लोकांना वाटू लागते की, एखादी वस्तू उद्या मिळणार नाही, तेव्हा ते आजच जास्त प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. यालाच ‘पॅनिक बायिंग’ म्हणतात. परिणामी, प्रत्यक्षात तुटवडा नसतानाही बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण होतो. ही परिस्थिती काळाबाजार करणार्यांसाठी पोषक ठरते. त्यामुळे अफवा पसरवणार्यांवर कठोर कारवाई करणे आणि पुरवठा व्यवस्थेची स्पष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शेवटी प्रश्न फक्त सिलिंडरचा नाही; तो समाजातील विश्वासाचा आहे. अफवांवर विश्वास ठेवून आपण स्वतःच संकट निर्माण करतो का, की माहितीची पडताळणी करून जबाबदार नागरिक म्हणून वागतो, यावर समाजाचे भविष्य ठरते.
तिरंग्याचा अपमान!
आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप’ जिंकून भारतीय संघाने पुन्हा एकदा जगासमोर आपल्या क्रिकेट सामर्थ्याची छाप उमटवली. हा विजय केवळ क्रीडा क्षेत्रातील यश नव्हे, तर तो प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाचा क्षण होता. मात्र, याप्रसंगी घडलेल्या एका घटनेने अनेक देशप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या. विजयाच्या उत्साहात हार्दिक पांड्या याने ज्यापद्धतीने ‘तिरंगा’ हाताळला आणि एकूणच मैदानावर प्रेमप्रदर्शन केले, ते अनेकांना खेदजनक आणि अपमानास्पद वाटले. विजयाच्या क्षणी भावना उचंबळून येणे स्वाभाविक आहे. मैदानावर खेळाडू आनंदाने धावताना, सहकार्यांना मिठ्या मारताना किंवा चाहत्यांना अभिवादन करताना दिसतात. पण, जेव्हा त्या आनंदात राष्ट्रीय ध्वजाचा समावेश होतो, तेव्हा त्या क्षणाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. ‘तिरंगा’ हा केवळ उत्सवाचा भाग नसतो, तो राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असतो. भारतीय तिरंगा हा लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे हा ध्वज केवळ कापडाचा तुकडा नसून, तो भारताच्या इतिहासाचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा जिवंत साक्षीदार आहे. म्हणूनच, त्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारीच.
क्रीडापटू, कलाकार किंवा सार्वजनिक जीवनातील व्यक्ती या समाजातील लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान असतात. त्यांची प्रत्येक कृती अनेकांच्या नजरेत असते. मैदानावरील त्यांचे वर्तन, त्यांची तो क्षण साजरा करण्याची पद्धत आणि त्यांच्या प्रतिक्रिया समाजावर प्रभाव टाकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी राष्ट्रीय प्रतीकांबाबत अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक असते. या घटनेकडे केवळ एखाद्या खेळाडूच्या कृतीच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा, ती एक सामाजिक शिकवण म्हणून पाहण्याची गरज आहे. आपण आपल्या क्षेत्रात कितीही मोठे झालो, कितीही प्रसिद्ध झालो, तरी राष्ट्रीय ध्वजापेक्षा कोणीही मोठा नाही. ‘तिरंगा’ हा प्रत्येक भारतीयासाठी सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक आहे. त्यामुळे तो हातात धरताना अभिमानासोबतच नम्रता आणि आदरही तितकाच आवश्यक आहे. त्याचा सन्मान राखणे ही केवळ औपचारिकता नसून, प्रत्येक भारतीयाच्या मनातील राष्ट्रप्रेमाची खरी कसोटी आहे.