विश्वासार्हतेचा ‘माने’ पॅटर्न

14 Mar 2026 11:40:26
Kishor Mane
 
‘ब्रॅण्ड नाशिक’चे स्वप्न उराशी बाळगत गांजलेल्यांना मायेचा हात देत, त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवणार्‍या आणि ३० वर्षांपासून सचोटीने व्यवसाय करणार्‍या किशोर गणपतराव माने यांच्याविषयी...
 
३० वर्षांची पारदर्शक कारकीर्द आणि जनमानसांतील ‘हक्काचा माणूस’ असलेले ‘व्यावसायिक पारदर्शकता, सामाजिक बांधिलकी आणि लोकसंग्रह‘ या त्रिसूत्रीवर आधारित आपले जीवन व्यतित करणारे किशोर गणपतराव माने आज नाशिकच्या सामाजिक आणि व्यावसायिक पटलावर एक आदराचे नाव. गेल्या तीन दशकांपासून ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रात कार्यरत असूनही, त्यांच्यावर आजपर्यंत ‘एकही फसवणुकीची गुन्हा नाही’ ही त्यांची ओळख त्यांच्या व्यावसायिक नैतिकतेची साक्ष देते. व्यावसायिक विश्वासार्हतेचे ३० वर्षांचे अखंड व्रत हाती घेतलेल्या किशोर माने यांनी विद्या विकास सर्कल येथील ‘माने-कसबे असोसिएशन’ या फर्मच्या माध्यमातून जमीन आणि फ्लॅट खरेदी-विक्रीच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असूनही, प्रत्येक व्यवहार पारदर्शकतेने पूर्ण करणे, हेच त्यांचे ब्रीदवाक्य. व्यवसायात कमावलेली विश्वासाहर्ता हीच त्यांच्या यशाचा मुख्य आधार बनलेली आहे. किशोर माने यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच येतो की, त्यांनी केवळ एक हाक दिली, तरी १००पेक्षा जास्त ‘सायकलिस्ट’ क्षणाचाही विलंब न लावता ‘रॅली’साठी एकत्र येतात. अगदी आठ वर्षांच्या बालकापासून ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना ते ‘आपले’ वाटतात. समाजात राहणार्‍या प्रत्येक भगिनीला ते ‘हक्काचा भाऊ’ वाटतात, हे त्यांच्या प्रेमळ आणि नि:स्वार्थी स्वभावाचे फळ आहे.
 
कपाळावर गंध आणि देवपूजा केल्याशिवाय घराबाहेर न पडणारे किशोर माने खर्‍या अर्थाने अध्यात्म जगतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘प्रत्येकाने जीवनात सकारात्मक राहून आपले पुढचे मार्गक्रमण करायला हवे,’ असा त्यांचा नेहमीच प्रेमळ हट्ट असतो. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक उद्योजकाला ते व्यवसायात प्रगती करण्यासाठी मनापासून मार्गदर्शन करतात. व्यवसायासोबतच गाण्याची उत्तम आवड जोपासणारे किशोर माने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचे खर्‍या अर्थाने पाईक आहेत. महापुरुषांच्या विचारांवर पाऊल ठेवून वृद्धाश्रमात जाऊन गाणी गाऊन ज्येष्ठांना आनंद देणे हा त्यांचा विरंगुळा असून, असे केल्याने त्यांना आत्मिक समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. केवळ व्यवसाय एके व्यवसाय न करता, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून किशोर माने सातत्याने कार्यरत असतात.
 
गरीब मुलांना वह्या, पुस्तके, दप्तर, रेनकोट आणि कपड्यांचे वाटप नेहमी करत असतात. तसेच जखमी भटक्या कुत्र्यांना स्वतः दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार आणि सलाईनची सोय करण्याबरोबरच ‘वृक्षवल्ली टीम’च्या माध्यमातून दोन हजार, ५०० झाडे माने यांनी दत्तक घेतली आहेत. दरवर्षी ५००हून अधिक देशी झाडे (वड, पिंपळ, उंबर) ते दान करतात. गेल्या पाच वर्षांपासून नाशिक ते पंढरपूर अशी ‘सायकल वारी’ करून त्यांनी आरोग्य आणि भक्तीचा संदेश दिला आहे. ‘ब्रॅण्ड नाशिक’चे स्वप्न नाशिकमधील सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी एक व्यासपीठ तयार करावा आणि तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा रोजगारनिर्मितीवर भर द्यावा, असे आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना पत्नी शीतल माने आणि व्यावसायिक भागीदार शाम कसबे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. कुठेही, कुठलाही कार्यक्रम असेल; तर मदत करण्याची त्यांची मानसिक तयारी प्रत्येक कार्यक्रमात असते. कोणाविषयीही वाईट बोलायचे नाही आणि कोणाविषयीही वाईट विचार करायचा नाही. दररोज ब्रह्मांडाला धन्यवाद द्यायचा आणि निदान दहा मिनिटे स्वतःसाठी वेळ काढून ध्यानधारणा करायची. दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी आपलेपणाची भावना मनात ठेवून सतत मदत करण्यासाठी त्यांचा कायमच पुढाकार राहिला आहे.
 
सर्वप्रकारचे व्यवसाय करणारे उद्योगपती एकत्र येऊन एकत्रितपणे काम करत, नाशिकचे नाव अधिक उंचीवर कसे नेता येईल, यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. सर्व उद्योगपतींनी एकत्र येऊन जास्तीत-जास्त उद्योग नाशिकमध्ये कसे राहतील आणि वाढतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांचे मत आहे. यासोबतच मुलांनी केवळ नोकरी करण्यापेक्षा वेगळ्या आणि नवनवीन संकल्पना राबवून स्वतः नवीन रोजगार निर्माण करावा, असे स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे किशोर माने. विकासाची सुरुवात ही सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या घरापासून, नंतर समाजापासून, शहरापासून आणि पुढे संपूर्ण देशापर्यंत पोहोचते, असे ठाम मत असलेल्या किशोर माने यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत‘कडून हार्दिक शुभेच्छा!
 
- विराम गांगुर्डे
 
 
 
Powered By Sangraha 9.0