प्राणीविश्वाची अद्भुत सफर : हॉप्पर्स (Film review)

14 Mar 2026 12:28:21
Hoppers
 
‘पिसार अ‍ॅनिमेशन’च्या चित्रपटांमध्ये अनेकदा भयानक समजले जाणारे प्राणीही प्रेक्षकांच्या मनात आपुलकीचं स्थान मिळवतात. शार्कसारखा भक्षक प्राणीही कधी विनोदी, कधी भावनिक आणि कधी अगदी जिवाभावाचा मित्र म्हणून पडद्यावर प्रेक्षकांची दाद मिळवून जातो. त्यामुळेच या नव्या चित्रपटातही प्राण्यांच्या जगाची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर येते. प्राण्यांच्या जगाकडे त्यांच्या नजरेतून पाहायला लावणारा आणि आपल्या विकासाच्या संकल्पनांवर थोडं थांबून विचार करायला भाग पाडणारा ‘हॉप्पर्स’ हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट नेमका कसा आहे, ते जाणून घेऊया...
 
मानव आणि प्राणिजगताचं नातं हे अगदी अश्मयुगापासूनच एकमेकांत गुंफलेलं. पृथ्वीवरील या विशाल जीवनसाखळीत प्रत्येक जीवाची एक भूमिका आहे, एक स्थान आहे. पण, जेव्हा माणूस आपल्या विकासाच्या नावाखाली त्या साखळीत हस्तक्षेप करतो, तेव्हा केवळ एक जंगल नाही, तर संपूर्ण नैसर्गिक समतोलच डळमळू लागतो. हे धडे आपण शाळेच्या पुस्तकांतून लहानपणी शिकतो, पण खर्‍या आयुष्यात त्यांची कितपत आठवण ठेवतो? निसर्गाचे संवर्धन आणि वाढत चाललेले काँक्रीटचे जंगल यांमध्ये खरा समतोल साधणे माणसाला खरंच जमतंय का? आपल्या सभोवताली घडणार्‍या घटना आपण पाहतो, ऐकतो, त्यावर चर्चा करतो. पण, प्राण्यांच्या जगात नेमकं काय चाललं असेल, याचा आपण कधी विचार करतो का? त्यांचं जंगल, त्यांची घरं, त्यांचा अधिवास जर एका दिवसात नाहीसा झाला, तर त्या जीवांचं पुढे काय होत असेल? ते कुठे जात असतील, कसं जगत असतील? याच प्रश्नांना स्पर्श करणारे एक वेगळे, कल्पनारम्य पण विचार करायला लावणारे विश्व उभं करतो, ‘हॉप्पर्स’ हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट.
कथा सुरू होते, मॅबेलपासून (आवाज : पायपर कुर्दा.) एक शाळकरी मुलगी, एकटी पडलेली, थोडी वेगळी वाटणारी आणि कमालीची प्राणीप्रेमी. तिच्या आयुष्यात समजून घेणारी एकच व्यक्ती असते, तिची आजी. तिच्यासोबत जंगलातील एका सुंदर माळरानावर घालवलेले क्षण मॅबेलच्या मनात कायमचे घर करतात. काळ पुढे सरकतो. आता मॅबेल १९ वर्षांची आहे, आजीचे निधन झाले आहे आणि ती ज्या शहरात राहते, बीव्हर्टन, तिथे जंगलातून जाणारा बेल्टवे (रिंग रोड) बांधण्याची योजना तयार होते. शहराचे महापौर जेरी (आवाज : जॉन हॅम) या विकासप्रकल्पाचे नेतृत्व करत असतात.
 
मॅबेल या प्रकल्पाला विरोध करते. पण, जेरी तिला एक वास्तव दाखवून देतो, त्या जंगलात आता प्राणी उरलेलेच नाहीत. हे ऐकून मॅबेलला धक्का बसतो. कारण, तिला जाणवते की, जेरी खरे बोलत आहे. चित्रपटात आपण मॅबेलला प्रथम लहान मुलगी म्हणून पाहतो. प्राण्यांना मुक्त करण्याच्या तिच्या हट्टामुळे ती शाळेत अडचणीत येते आणि एका शिक्षकाला चावा घेतल्यामुळे तिला घरी पाठवले जाते. मॅबेल आता प्राण्यांसाठी काम करण्याचा निर्णय घेते. हीच जंगलातील जागा मॅबेलसाठी खास बनते. रिंग रोड पूल ही योजना थांबवण्यासाठी मॅबेल नागरिकांकडून स्वाक्षर्‍या गोळा करण्याचा प्रयत्न करते; पण लोक तिच्या उत्साहाकडे पुरते दुर्लक्ष करतात.
 
निराश झालेली मॅबेल एके दिवशी तिच्या विद्यापीठाच्या बायोलॉजी लॅबमध्ये जात असलेल्या एका बीव्हरला (उत्तर अमेरिकेतील सर्वांत मोठा जलचर उंदीर) पाहते. सुरुवातीला तिला भीती वाटते की, तिची प्राध्यापिका डॉ. सॅम (कॅथी नजिमी) प्राण्यांवर भयानक प्रयोग करत असतील. मात्र, तिला समजते की, सॅम, तिची सहकारी निशा (अपर्णा नाचेर्ला) आणि संशोधक कॉनर यांनी विकसित केलेल्या गुप्त प्रयोगाच्या मदतीने, मानवी मेंदूची चेतना (मानवाची चेतना) रोबोटिक प्राण्यांमध्ये स्थानांतरित करण्याचे एक अतिमहत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि याच गुप्त प्रोजेक्टला त्यांनी नाव दिले आहे ‘हॉप्पर्स.’ मॅबल सॅमच्या नकळत स्वतःची चेतना एका रोबोट बीव्हरमध्ये अपलोड करते आणि महापौरांची योजना हाणून पाडण्यासाठी निघते. प्राण्यांच्या दृष्टिकोनातून जग पाहताना तिला निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल एक वेगळीच जाणीव होते.
 
सॅम तिला सांगतात की, बीव्हर ही ‘कीस्टोन स्पिसीज’ आहे, जर एखादा बीव्हर त्या भागात परत आला आणि धरण बांधून तलाव तयार झाला, तर इतर प्राणीही आपोआप परत येतील. मात्र, जंगलात गेल्यावर मॅबेलच्या योजनेच्या अपेक्षेप्रमाणे चालत नाहीत. कथेत अनेक नवीन पात्रे येतात, आळशी बीव्हर, मॅमल्स म्हणजेच सस्तन प्राण्यांचा राजा असलेला बीव्हर, तसेच माशांचे, पक्ष्यांचे, सापांचे, बेडकांचे आणि कीटकांचे स्वतंत्र राजे. कीटकांची राणी जी थोड्याच वेळासाठी दिसते, पण प्रभावी ठरते. कथानक पुढे सरकत असताना मॅबेलला जाणवते की, प्राण्यांच्या जगात हस्तक्षेप करणे माणसांना वाटते तितके सोपे नाही. मॅबेल पुढे नेमकं काय करते; माणसांच्या या काँक्रीटच्या जंगलात हे प्राणी परत येणार का? ‘सहअस्तित्व’ ही संकल्पना माणूस प्राण्यांच्या, पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून स्वीकारणार का? त्यासाठी प्राण्यांचे आगळे-वेगळे थ्रीडी अ‍ॅनिमेशनचे जग हे सगळं तुम्हाला चित्रपटातच पाहावे लागेल.
 
चित्रपटाचे दिग्दर्शन डॅनियल चोंग यांनी केले आहे, तर निर्मिती ‘पिसार अ‍ॅनिमेशन’ची आहे, ज्यांनी यापूर्वी अनेक अ‍ॅनिमेटेड सिनेमे प्रेक्षकांसाठी आणले आहेत. चित्रपट थ्रीडीमध्ये पाहताना अर्थातच वेगळा आणि जिवंत अनुभव देऊन जातो. विशेषतः अ‍ॅनिमेटेड चित्रपट पाहताना नेहमी त्यामध्ये काय वेगळे इफेक्टस आहे किंवा कोणतं पात्र किती प्रभावी ठरणार, याची उत्सुकता असते. त्यादृष्टीने ‘हॉप्पर्स’ नक्कीच प्रभावी ठरतो. चित्रपटातील अ‍ॅनिमेटेड प्राणीही खूप आकर्षकपणे साकारले आहेत, उदाहरणार्थ, थोडा गमतीशीर बीव्हर किंवा चिडखोर अस्वल, अ‍ॅनिमेशनही सुंदर असून प्रत्येक पात्राचे वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येते.
 
‘पॉन्ड रूल्स’ या संकल्पनेमुळे प्राण्यांना पूर्णपणे मानवी रूप दिलेले नाही, जे अ‍ॅनिमेशन चित्रपटांमधील एक संवेदनशील मुद्दा मानला जातो; कारण अनेकदा भक्षक आणि शाकाहारी प्राणी एकत्र असताना वास्तवाची जाणीव हरवते. हुशार, मजेशीर, रोमांचक आणि भावनिक असा हा चित्रपट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजक ठरतो. विशेष म्हणजे, लाल ओठ आणि चमकदार फिरणारे दात असलेली शार्क डायन इतक्या बारकाईने केलेले अ‍ॅनिमेशनही या चित्रपटाची खासियत आहे. तसेच सुरवंटाचे होणारे फुलपाखरू, बीव्हरचीच निरनिराळी रूपे असे अगदी नयनरम्य अनुभव चित्रपटात पाहायला मिळतात. या चित्रपटाची ‘व्हॉईस कास्ट’ही तितकीच दमदार आहे. बीव्हर राजा जॉर्जसाठी बॉबी मोयनिहॅन यांचा आवाज आहे, तर टिटस या थोड्या चिडखोर फुलपाखरासाठी डेव्ह फ्रॅन्को यांचा आवाज ऐकायला मिळतो. टिटसची आई कीटक राणी या भूमिकेत मेरील स्ट्रीप यांनी प्रभावी आवाज दिला आहे.
 
चित्रपटात विनोद, पाठलाग, भावना आणि विज्ञान यांचा छान संगम आहे. विशेष म्हणजे, बीव्हर हे निसर्गातील खरे ‘पर्यावरण अभियंते’ किंवा पर्यावरणाचा समतोल राखणारे वन्यजीव मानले जातात, हा वैज्ञानिक मुद्दाही चित्रपटात प्रभावीपणे मांडला आहे. मानवी प्रगती आणि पर्यावरचा र्‍हास हा मुद्दा अगठी ठळकपणे मांडला आहे. चित्रपटाचा मुख्य संदेश स्पष्ट आहे, माणूस आणि निसर्ग यांच्यात सहअस्तित्व शक्य आहे. मात्र, या सगळ्या गडबडीत कधीकधी चित्रपट थोडा भरकटल्यासारखा वाटतो. उदा. जर मानवी वस्ती वाढत आहे, तर जंगले तोडून त्यावर मानवाने अतिक्रमण करणे, हा जागतिक विषय आहे. प्रश्न असा उरतो की, जर सहअस्तित्व मान्य असेल, तर विकासासाठी आपण किती जंगलं आणि किती रस्ते सोडायला तयार आहोत? असे असले, तरीही चित्रपट पुरेपूर मनोरंजन करतो. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येईल. विशेषतः बच्चेकंपनीसाठी ही नक्कीच पर्वणी ठरेल.
 
दिग्दर्शक : डॅनियल चोंग
 
कथा : डॅनियल चोंग, जेसी अ‍ॅण्ड्—यूज
 
निर्मिती : पिसार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज, डिझन
  
पार्श्वध्वनी : पायपर कर्दा, बॉबी मोयनिहॅन, जॉन हॅम, कॅथी नजिमी, डेव्ह फ्रॅन्को
 
रेटिंग : ४ स्टार
 
 
- अपर्णा कड
 
 
 
Powered By Sangraha 9.0