वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध ‘फुला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
14-Mar-2026
Total Views |
मुंबई : वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी "फुला" या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम ऐकायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील तरुण , काही तरी नवीन करू पाहणाऱ्या नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे. नुकतंच ‘फुला’ या चित्रपटाचे पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच सॅक्सोफोन वादक राज सोडा हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, अतुल लोखंडे यांनी कला दिग्दर्शन, राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे यांनी काम पाहिले आहे.
‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग, डर्बीचा थरार ही सात गाणी या चित्रपटात आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यातून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचं चित्रण करत मुरळीच्या भावभावनाही मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अस्सल लोकसंस्कृती आणि आशयघन गाणी असलेला ‘फुला’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं हा एक अनुभव ठरणार आहे. येत्या १७ एप्रिलपासून "फुला" हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.