मुंबई : (Asiatic Society ) मुंबईचा सांस्कृतिक वारसा आणि ज्ञानकेंद्र अशी ओळख असलेल्या एशियाटिक सोसायटीची निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर काही सभासद सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मागच्या काही काळापासून मतदार यादीतील त्रुटींमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. मतदार याद्या अद्यायावत करण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक कालावधी घेतल्यानंतर देखील मतदारांची यादी सदोष असल्याचे आढळून आल्याचे मत काही सभासदांनी व्यक्त केले.
'या' कारणामुळे निवडणूक स्थगित!
मतदार यादीतील गोंधळामुळे शनिवार दि. १४ मार्च रोजी पार पडणाऱ्या या निवडणूकीला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या निरीक्षकांच्या मदतीने व्यवस्थापन मंडळातील पाच सदस्यांची उप समिती या पुढे संस्थेचा दैनंदिन कारभार पाहणार आहे. यामध्ये निरीक्षक के.डी. तलोकर आणि व्यवस्थापन समितीचे मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी, आणि सूरज पंडित यांच्या समितीद्वारे चालवला जाणार आहे.
कुमार केतकर आणि विवेक गणपुले हे उमेदवार असल्याने त्यांना मतदार यादी तयार करण्याचे काम करता येणार नाही. निरीक्षक के. डी. तलोकर व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच मंदार भारदे, सुरेंद्र कुलकर्णी आणि सूरज पंडित पांची उप-समिती मतदारांची यादी तयार करणार आहे. समिती दोन महिन्यात पात्र मतदारांची यादी तयार करेल. त्यावरील हरकतींची १५ दिवसांत सुनावणी घेईल आणि वैध मतदार याद्या तयार करण्यात येतील, असा कार्यक्रम धर्मदाय आयुक्त यांनी निकालपत्रामध्ये दिला आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना एशियाटिक टुमारो या गटाचे उमेदवार विवेक गणपुले म्हणाले की धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयासंदर्भात कायदेशीर सल्ला घेणे महत्वाचे आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक विविध पैलूंचा अभ्यास करुनच पुढे जाणे योग्य ठरणार आहे.