अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका अष्टपैलू अमृता...

14 Mar 2026 12:13:34
Amruta Khanvilkar
 
मराठी सिनेविश्वातील देखणी, उत्कृष्ट अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून अमृता खानविलकर ही सुपरिचित. ‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ ते आता बॉलीवूडमध्येही अमृताने आपल्या अभिनयाची छाप उमटविली. याशिवाय, नुकतीच अमृताने ‘लग्नपंचमी’ या नाटकाची निर्मिती केली आहे, तर अभिनेता स्वप्नील जोशीसह ती स्वतः या नाटकात झळकणार आहे. अभिनयाबरोबरच अमृताने तिचा उद्योजिका म्हणूनही प्रवास सुरु केला. तेव्हा, नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक महिना दिना’च्या पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’शी अमृताने साधलेला हा खास संवाद...
 
अमृता, २०२६ या वर्षाची एकूणच सुरुवात तुझ्यासाठी सकारात्मक आणि नवोन्मेषाची ठरली आहे. त्याविषयी सर्वप्रथम तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल...
 
हो, २०२६ हे वर्ष माझ्यासाठी खूपच वेगळं आणि उत्साहाने सुरू झालं आहे. माझी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि ती ‘नेटफ्लिस’वर जागतिक स्तरावर ‘ट्रेंडिंग’ होती. त्यानंतर मी नाटकाची निर्मिती केली आणि पहिल्यांदाच रंगमंचावर कामदेखील करीत आहे. अभिनयापलीकडे ‘अमूल्या बाय अमृता’ हा माझा ब्रॅण्ड सुरू केला आहे. माझ्या स्त्रीचाहत्यांसाठी काहीतरी करायचं होतं, हा विचार खूप वर्षांपासून मनात होता. पण, त्याचवेळी करिअरकडेही मला लक्ष द्यायचं होतं. त्याचदरम्यान आता ‘तू गं मोहिनी’ हे गाणंही मी केलं. ते हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि अभय जोधपूरकर यांनी गायलं आहे. म्हणजे, एकंदरीतच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. आजवर प्रेक्षकांनी मला नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून खूप प्रेम दिले आणि आता त्याच प्रेमाची परतफेड म्हणून मी त्यांच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे.
 
सिनेक्षेत्रात इतकी वर्षे अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर, मागच्या वर्षी प्रॉडशन हाऊसमधून नाटकाचाही श्रीगणेशा केलास आणि आता उद्योजिका म्हणून तुझ्या नव्या प्रवासाची देखील सुरुवात झाली आहे. त्याविषयी काय सांगशील?
 
मला असं वाटतं की, मी आयुष्यातले बहुतेक निर्णय भावनिक होऊन घेते. माझा साडीचा ब्रॅण्ड सुरू करण्यामागेही तशीच एक भावना होती. आजपर्यंत करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य, मी निर्णय घेताना नेहमी भावना पुढे ठेवली आहे. व्यवसाय म्हटला की नफा-तोटा हा तर होतच राहणार. सिनेसृष्टीतही कधी चित्रपट चालतो, कधी नाही; पण त्यामुळे आपण काम करणं थांबवत नाही. मला असं वाटलं की, ज्या स्त्रियांकडून मला इतकं प्रेम मिळालं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. मी जेव्हा मंगळागौर, हळदीकुंकू किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाते, तेव्हा त्या महिला इतक्या आपुलकीने भेटतात, माझी विचारपूस करतात. नाटकानंतरही मी जेव्हा प्रेक्षकांना भेटते, तेव्हा आजी, काकू, ताई इतक्या मायेने माझ्याशी संवाद साधतात. तिथूनच मला साडीच्या व्यवसायाची कल्पना सूचली. कारण, माझ्यासाठी त्या भावना महिलावर्गांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे.
 
करिअर असो अथवा आता नवीन व्यवसाय, कुटुंबाचा पाठिंबा हा सगळ्यासाठी तितकाच महत्त्वाचा. तेव्हा, तुला कुटुंबाची साथ याकामी कशी मिळाली?
 
अर्थातच, कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय विशेषतः माझ्या आईच्या पाठिंब्याशिवाय तर मी उभीच राहू शकत नाही. आजही माझं घर तीच सांभाळते. खरं सांगायचं तर, घरात तिखटाचा डबा कुठे आहे, मिठाचा डबा कुठे आहे, हेही मला अनेकदा माहीत नसतं आणि हो, मला माहीत आहे की, ते थोडंसं वाईट आहे. पण, काय करू? मी इतकी सतत बाहेर असते की घरी आल्यावर मला घर नीटनेटकं, स्वच्छ दिसतं आणि किचनही व्यवस्थित असतं, ते सगळं माझी आईच सांभाळते. ती इथे बसून माझ्या घराचंच नाही, तर दुबईमध्ये असलेल्या माझ्या बहिणीच्या घराचं मॅनेजमेंटही तितक्याच व्यवस्थितपणे सांभाळते. त्यामुळे मला असं वाटतं की, या इंडस्ट्रीमध्ये ज्या मुली घडल्या आहेत, त्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या आईमुळेच घडल्या आहेत.
 
अमृता, सध्या तू वेबसीरिज, चित्रपटांच्या चित्रीकरणाबरोबरच इव्हेंट्स आणि नाटकांसाठीही वेळ देतेस. तेव्हा, हे सगळं एकत्र सांभाळणं किती अवघड वाटतं? तुझी तारेवरची कसरत होते का?
 
मला असं वाटतं की, जिथे इच्छाशक्ती असते ना, तिथे सगळं काही सांभाळलं जातं. फक्त ती इच्छा असायला हवी आणि अर्थातच माझ्याबरोबर माझी माणसं आहेत. जे लोक मला सांभाळतात, माझे वाहनचालक आहेत, माझ्यासोबत केशरचना आणि मेकअपची पूर्ण टीम आहे. ही सगळी माणसं इतकी छान साथ देतात आणि खरं सांगायचं तर, अशी चांगली माणसं मिळायलाही नशीब लागतं.कारण, तुमच्या आजूबाजूची ही माणसं चांगली असली की तुमचा खूपसा प्रवास आपोआपच सुरळीत होऊन जातो.
 
साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वी ‘तस्करी’ ही तुझी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. त्याविषयी काय सांगशील?
 
‘तस्करी’ला इतका प्रतिसाद मिळेल आणि इतके लोक ती सीरिज पाहतील, याची मी कल्पनाही केली नव्हती. विशेषतः शेवटच्या अ‍ॅक्शन सीनमध्ये मी खलनायकाला मारते, त्या दृश्याला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना माझी एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली. बिनधास्त, बेधडक आणि गरज पडली, तर लढायला तयार असलेली अमृता. नीरज पांडे सरांसोबत काम करताना खूप मजा आली. त्यांच्या टीमसोबत काम करणं हा वेगळाच अनुभव होता. आम्ही अशा ठिकाणी चित्रीकरण केलं, जिथे साधारणपणे पोहोचणंही कठीण असतं. भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी आणि परदेशातही चित्रीकरण झालं. तसंच इमरान हाश्मी यांच्यासोबत काम करतानाही खूप छान अनुभव आला. एकूणच ‘तस्करी’चा प्रवास माझ्यासाठी खूपच शानदार होता.
 
वीस वर्षांपूर्वी करिअरला सुरुवात केलीस, तेव्हाची अमृता आणि आज एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तुझ्यात तुला काय फरक जाणवतो?
 
मला असं वाटतं की, प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक प्रकल्प तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी वेगळं शिकवून जातो. कधीकधी तुम्ही त्या प्रकल्पात इतके तल्लीन होता की, स्वतःकडेही नव्याने पाहायला लागता. मला असं वाटतं, पुण्यातल्या श्री गोपाळ विहारमध्ये गणेशोत्सवात सतरंजीवर उभं राहून नृत्य करणारी ती छोटी अमृता आज कुठेतरी खूप अभिमानाने पाहात असेल की, एवढ्या सगळ्या चढ-उतारांमधूनही तू स्वतःला उभं केलंस. स्वतःचं घर उभारू शकलीस. आपल्या आई-वडिलांना आज एक मानाचं स्थान मिळवून दिलंस आणि स्वतःसाठीही काहीतरी घडवू शकलीस. म्हणून ती छोटी अमृता आज खूप अभिमानाने आणि आनंदाने भरलेली आहे.
 
 
- अपर्णा कड
Powered By Sangraha 9.0