नवी दिल्ली : (VO Chidambaranar Port) तामिळनाडूतील व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरणाने बंदर व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण तांत्रिक टप्पा गाठत ‘डिजिटल ट्विन’ उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर बनण्याचा मान मिळवला आहे. या उपक्रमामुळे बंदर व्यवस्थापन अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.
केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते २३ फेब्रुवारी २०२६ रोजी या डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे बंदरातील पायाभूत सुविधा, कार्यरत यंत्रणा आणि सागरी परिसंस्थेची रिअल-टाइम आभासी प्रतिकृती तयार होणार आहे. त्यामुळे बंदरातील कामकाजाचे अधिक स्पष्ट निरीक्षण, पूर्वानुमानात्मक विश्लेषण आणि डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया शक्य होणार आहे.
या प्लॅटफॉर्ममध्ये IoT सेन्सर्स, जीपीएस ट्रॅकिंग, लीडर मॅपिंग, ड्रोन इमेजिंग आणि सीसीटीव्ही नेटवर्क यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बंदरातील विविध विभागांमध्ये समन्वय अधिक प्रभावी होऊन संपूर्ण प्रणालीचे रिअल-टाइम प्रतिबिंब उपलब्ध होणार आहे. डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्ममुळे बर्थ ऑक्युपन्सी, जहाजांची हालचाल, क्रेनचा वापर आणि यार्ड क्षमतेचे थेट निरीक्षण करता येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणा वापरून माल हाताळणी उपकरणांचे पूर्वानुमानात्मक देखभाल शक्य होणार असून त्यामुळे यंत्रसामग्रीची बंद पडण्याची वेळ कमी होईल आणि कामकाजाची विश्वासार्हता वाढेल.
हेही वाचा : PM Narendra Modi: एलपीजीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार पंतप्रधान मोदींचा इशारा
तसेच, जहाजांचे वेळापत्रक आणि मालवाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी बर्थ व वाहतूक नियोजनाचे अनुकूलन करण्यात मदत होईल. यामुळे बंदरातील गर्दी आणि प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ऊर्जा वापर आणि उत्सर्जनाचे निरीक्षण, तसेच संभाव्य परिस्थितींचे ‘व्हॉट-इफ’ सिम्युलेशन मॉडेलिंग करून व्यस्त कालावधी किंवा अडचणींचा पूर्वतयारीने सामना करणेही शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे जहाजांच्या बंदरातील टर्नअराउंड वेळेत सुमारे २५ टक्क्यांपर्यंत घट, उपकरणांची उपलब्धता वाढ, कामकाजातील सुरक्षितता बळकट होणे आणि ऊर्जा वापराचे अधिक कार्यक्षम व्यवस्थापन होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत असून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर बंदराच्या कामकाजात अधिक लवचिकता, शाश्वतता आणि डेटा-आधारित व्यवस्थापन शक्य होणार आहे.
‘मॅरिटाईम इंडिया व्हिजन २०३०’ आणि ‘अमृत काल व्हिजन २०४७’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी क्षेत्रात डिजिटलायझेशन आणि तांत्रिक प्रगतीद्वारे कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने व्ही.ओ. चिदंबरनार बंदराने जागतिक दर्जाच्या स्मार्ट पोर्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
हे वाचलत का? - भारतात इंधन व एलपीजी पुरवठा सुरक्षित; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी
"डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी ही बंदराच्या आधुनिकीकरणातील महत्त्वाची पायरी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी आणि रिअल-टाइम डेटा विश्लेषणाचा वापर करून या उपक्रमामुळे कार्यक्षमता वाढेल, जहाजांच्या टर्नअराउंड वेळेत सुधारणा होईल आणि सुरक्षितता व शाश्वततेला बळकटी मिळेल".
- सुशांत कुमार पुरोहित, अध्यक्ष, व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण