मुंबई : (The Hundred Auction 2026) इंग्लंड येथे होणाऱ्या 'द हंड्रेड २०२६' क्रिकेट लीगच्या लिलावामध्ये लिलावात पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्सने खरेदी वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली.(The Hundred Auction 2026)
इंग्लंडमध्ये दरवर्षी आयोजित होणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेसाठी गुरुवारी १२ मार्च रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या संघमालकांचा सनरायझर्स लीड्स हा संघ आहे. या लिलावात मालक काव्या मारन यांच्यासह सनरायझर्स हैदराबादची कोअर टीम उपस्थित होती. लिलावात पाकिस्तानचा खेळाडू अबरार अहमदचं नाव पुकारल्यावर हैदराबाद संघाने त्याला ताफ्यात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. ट्रेंट रॉकेट्स संघही अबरारसाठी उत्सुक होता. सनरायझर्स लीड्सच्या मालकीण काव्या मारन आणि प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी अबरार अहमदसाठी बोली लावली. जवळपास २.३४ कोटी रुपये मोजून सनरायझर्स हैदराबाद संघाने अबरारला संघात समाविष्ट केले.(The Hundred Auction 2026)
द हंड्रेड २०२६ ही स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित केली जाते आणि त्यात चार भारतीय मालकीच्या संघांचाही समावेश आहे. या स्पर्धेमध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चा होती. परंतु, प्रत्यक्षात तसं घडलेले नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच दुरावले. दोन्ही देशांमधील तणावामुळे २००९ पासून पाकिस्तानी खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळलेले नाहीत.या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद संघाने पाकिस्तानच्या खेळाडूला संघात घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे.(The Hundred Auction 2026)