Mojtaba Khamenei In Coma: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात? हवाई हल्ल्यात पाय गमावल्याचा दावा; प्रकृतीबाबत गूढ

13 Mar 2026 12:05:46
Mojtaba Khamenei In Coma
 
तेहरान : (Mojtaba Khamenei In Coma) मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक दावे समोर आले आहेत. ब्रिटनमधील वृत्तपत्र The Sun च्या अहवालानुसार, मोजतबा खामेनेई गंभीर जखमी असून ते सध्या कोमामध्ये असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हवाई हल्ल्यात त्यांचा किमान एक पाय गमावल्याचाही दावा करण्यात आला आहे.
 
हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचा दावा
अहवालानुसार, ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई हे इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे पुत्र आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्याच हल्ल्यात मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
वृत्तानुसार, या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा एक पाय कापावा लागला आहे. याशिवाय त्यांच्या पोटाला किंवा यकृतालाही गंभीर इजा झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून ते कोमामध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

तेहरानमधील रुग्णालयात उपचार
अहवालानुसार, खामेनेई यांच्यावर तेहरानमधील सिना विद्यापीठ रुग्णालय येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील एका सूत्राने सांगितले की, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्या सूत्राच्या मते, “त्यांचे एक पाय कापावा लागला आहे. त्यांच्या यकृताला किंवा पोटालाही गंभीर इजा झाली आहे. ते सध्या कोमामध्ये आहेत.”
 
या वृत्तानुसार, उपचार सुरू असलेला रुग्णालयातील विभाग पूर्णपणे सील करण्यात आला असून परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
 
आरोग्यमंत्री उपचारांवर देखरेख करत असल्याचा दावा
या उपचारांवर देखरेख करण्याची जबाबदारी इराणचे आरोग्यमंत्री आणि अनुभवी शल्यचिकित्सक मोहम्मद रझा जफरघांदी यांच्याकडे असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. युद्धातील जखमींवर उपचार करण्याचा त्यांना मोठा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
 
सरकारी दूरदर्शनवरून संदेश, पण नेते दिसले नाहीत
दरम्यान, इराणच्या सरकारी दूरदर्शनवर खामेनेई यांच्या नावाने एक संदेश प्रसारित करण्यात आला. मात्र हा संदेश त्यांनी स्वतः न वाचता एका वृत्तनिवेदकाने वाचून दाखवला.
 
या संदेशात इराण आपल्या नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेईल आणि प्रादेशिक समुद्री मार्गांवर हल्ले सुरू ठेवेल, असा इशारा देण्यात आला. तसेच जगातील महत्त्वाच्या तेलवाहतुकीच्या मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचाही इशारा देण्यात आला.
 
अधिकृत पुष्टी नाही
मात्र या सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. इंटरनेटवरील निर्बंध आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे या वृत्ताची खातरजमा करणे कठीण असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
दरम्यान, इराणी सरकारने मोजतबा खामेनेई सुरक्षित असून ते सर्वोच्च नेत्याची जबाबदारी पार पाडत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.
Powered By Sangraha 9.0