मुंबई : (Kavya Maran) इंग्लंडमध्ये पार पडणाऱ्या 'द हंड्रेड २०२६' क्रिकेट लिलावात लोकप्रिय संघ असलेला सनरायझर्स हैदराबाद सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. संघाच्या मालकीण काव्या मारन यांनी चक्क पाकिस्तान खेळाडुला संघात स्थान दिल्याने हा वाद उद्भवला आहे. भारतीय चाहत्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असुन सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून बाहेर काढण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
द हंड्रेड २०२६ लीगचा लिलाव गुरुवारी १२ मार्च ला पार पडला. या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मालकीण काव्या मारन यांनी पाकिस्तान फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला २.३८ कोटी रुपये मोजून सनरायझर्स हैदराबाद संघात सहभागी केले. यामुळे भारतीय मालकीच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतल्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आता रंगली आहे.
अबरार अहमदने अनेकदा उडवली भारतीय सैन्यावर खिल्ली
अबरार अहमदने आतापर्यंत बऱ्याचदा भारतीय सैन्यावर खिल्ली उडवली आहे. २०१९ मध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडल्याची बातमी अबरारने सोशल मिडियावर शेअर केली होती. यानंतर पुन्हा त्याने गेल्या वर्षी आँपरेशन सिंदुर दरम्यान भारतीय सैन्यावर खिल्ली उडवली होती. आता याच पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असुन काहींनी तर थेट सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून काढुन टाकण्याची मागणी केली आहे.
बीसीसीआय उपाध्यक्ष नेमके काय म्हणाले?
बीसीसीआय उपाध्यक्ष असलेले राजीव शुक्ला यांनी या वादग्रस्त मुद्दयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा विषय आयपीएलच्या किंवा आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तो त्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णय आहे. यात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही.
या नव्या वादामुळे सनरायझर्स हैदराबाद संघावर कोणती कारवाई होणार का, किंवा हा वाद शांत होणार का, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, भारत-पाकिस्तान संबंध आणि क्रिकेटमधील संवेदनशीलता लक्षात घेता या निर्णयावरून आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे