India-Iran relations: इराणने मागितली भारताकडे मदत; एस. जयशंकर आणि सैय्यद अराघचींमध्ये फोनवरून चर्चा

13 Mar 2026 16:34:42
India-Iran Relations
 
नवी दिल्ली: (India-Iran relations) इराण आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युद्धाचा आज १४ वा दिवस असून अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने भारताकडे मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे.
 
भारत-इराण परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चा
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात १३ मार्च रोजी फोनवरून सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांबाबत माहिती देवाणघेवाण केली.
 
अराघची यांनी इराणला स्वतःच्या सुरक्षेसाठी बदला घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना इराणवरील लष्करी हल्ल्यांचा निषेध करण्याचे आवाहन केले.

ब्रिक्स आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची भूमिका
अराघची यांनी ब्रिक्ससारख्या व्यासपीठांचा महत्त्वाचा उल्लेख केला आणि स्थिरता व सुरक्षा राखण्यात रचनात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
 
एस. जयशंकर यांनी यावर प्रतिक्रिया देत भारत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यास तयार असल्याचे सांगितले. इराणमधील शाश्वत शांतता आणि स्थिरता ही सर्व देशांची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न
भारत सरकार आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांत एस. जयशंकर यांनी अराघची यांच्याशी तब्बल तीन वेळा चर्चा केली आहे. युद्धाच्या परिस्थितीत भारतीयांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्राथमिकता आहे.
 
सरकार केवळ राजनैतिक पातळीवरच नव्हे, तर जमिनीवरही मदत कार्य राबवत आहे. इराणमधून परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना अझरबैजान आणि आर्मेनिया मार्गे व्हिसा मिळवून देण्यात येत आहे. भारतीय दूतावास सीमा ओलांडून सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी सक्रिय मदत करत आहे.
 

इराणमध्ये किती भारतीय आहेत?
सध्या अंदाजे ९,००० भारतीय नागरिक इराणमध्ये आहेत. यात विद्यार्थी, खलाशी, व्यापारी, व्यावसायिक आणि प्रवासी नागरिकांचा समावेश आहे. सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना मदत करत आहे.
Powered By Sangraha 9.0