एक राजकीय पैलवान

13 Mar 2026 11:34:06
Devendra Fadnavis
‘महाराष्ट्र केसरी 2025-26‌’ या 68व्या कुस्ती स्पर्धेच्या मानाच्या गदेचे पूजन आणि अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‌‘वर्षा‌’ या निवासस्थानी नुकतेच पार पडले. योगायोग म्हणजे, मागेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‌‘तेल लावलेले पैलवान‌’ असा उल्लेख एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला होता. महाराष्ट्र आणि कुस्ती ही खूप जुनी आणि मानाची परंपरा. यात राजकीय कुस्तीचाही आवर्जून उल्लेख करावाच लागेल. या राजकीय कुस्तीचा संदर्भ घेऊनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय यशाचा उल्लेख करताना, “ते तेल लावलेले पैलवान आहेत, कुणाच्या पकडीत येत नाहीत,” असे सांगितले. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय यशाचा आलेख पाहता, शिंदेंनी केलेले वर्णन हे योग्यच! कारण, अतिशय संयमी खेळी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधकांना चितपट केले आहे.
 
राज्यसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात भाजपने दिलेले उमेदवार पाहता, राजकीय समतोल साधण्यात मुख्यमंत्री महोदय यशस्वी ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतसुद्धा भाजपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्विवाद यश मिळालेले साऱ्या राज्याने पाहिले. अगदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि अस्थिरतासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी संयमाने हाताळली. विधानभवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तिथे विरोधकांना अतिशय अभ्यासपूर्ण उत्तर देऊन समाधानी आणि निरुत्तर करणारे देवेंद्र फडणवीस यंदाही दिसून आले. राज्याचा अर्थसंकल्प सादर करीत असताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतानाच, अन्य सर्व समाजघटकांनाही योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केले. यावरून ‌‘राजकीय पैलवान‌’ कसा असावा आणि विरोधकांच्या हातात न येता, कुस्ती कशी जिंकावी, याचा वस्तुपाठच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिला आहे.
‌‘ब्रेन ड्रेन‌’ थांबणार
दि. 10 मार्च रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‌‘बिमस्टेक यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्राम‌’च्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन पार पडले. यानिमित्ताने भारतासह ‌‘बिमस्टेक‌’च्या सदस्य देशांमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले युवा शिष्टमंडळ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात दाखल झाले होते. एकीकडे विरोधक राज्य सरकारवर टीका करताना बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करताना दिसत आहेत. पण, दुसरीकडे त्याच वेळी ही घटना घडली आणि विरोधकांच्या आरोपातील फोलपणा सिद्ध झाला. राज्य सरकार आपल्या विविध योजनांच्या माध्यमातून युवकांसाठी नवीन संधींची कवाडे खुली करीत असताना ‌‘एड्युसिटी‌’, ‌‘इनोव्हेशन सिटी‌’, ‌‘स्पोर्ट्स सिटी‌’ या संकल्पना घेऊन संपूर्ण नवीन शहरे वसवण्याचे काम करीत आहेत.
कारण, यापूर्वी देशातील उच्च गुणवत्ताधारक तरुणपिढी परदेशात आपल्या संधीचा विस्तार करताना दिसत होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध संकल्पनांद्वारे हे ‌‘ब्रेन ड्रेन‌’ थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज राज्यात तरुणांना अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
 
भविष्यात जागतिक दर्जाच्या विद्यापीठ कॅम्पसद्वारे शिक्षणाच्या अनेक संधी राज्यात निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाखोंचा खर्च करून उच्चशिक्षणासाठी परदेशवारी करावी लागणार नाही आणि आपल्याच देशात राहून त्याच दर्जाचे शिक्षणही सहज उपलब्ध होईल. तसेच ‌‘स्टार्टअप‌’च्या माध्यमातून युवक फक्त नोकरीत न अडकता, आता व्यवसाय करून हजारो हातांना रोजगार देणारे उद्योगधंदेही उभे करीत आहेत. यातून राज्यांतील युवा आपल्या राज्याला आर्थिक सक्षम तर बनवतीलच; पण त्यासोबतच स्थानिक रोजगार आणि संधी निर्माण करतील, यात शंका नाही. हे नव्या, बदलत्या आणि एकूणच विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत आश्वासक पाऊल म्हणावे लागेल, ज्याचे सकारात्मक परिणाम येत्या काळात निश्चितच दिसून येतील.
- अभिनंदन परूळेकर
Powered By Sangraha 9.0