मुंबई : (Bomb Threat Email) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच विधानभवन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आला आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या या धमकीने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी विधिमंडळ सचिवालयाच्या ईमेलवर धमकी आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे विधानभवन बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या अनुषंगाने अत्यावश्यक तपास आणि चौकशी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाकडून विधानभवनाची सखोल तपासणी सुरु आहे.”
हेही वाचा : प्रश्नोत्तराचा तास भाषण करण्यासाठी नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानभवनासह आणखी चार ठिकाणांना धमकी
दरम्यान, विधानभवनासह आणखी चार महत्वाच्या ठिकाणी ही धमकी देण्यात आली आहे. स्टॉक एक्सचेंज, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक ही चार महत्वाची ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली असून या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने आवश्यक ती दखल घेतली आहे. संपूर्ण तपास सुरु असून राज्य सरकारच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
धमकीच्या ईमेलच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सुरुवातील विधानभवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आले. त्यानंतर थोड्यावेळाने तपासणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना विधानभवनात सोडण्यात आले. हा धमकीचा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला, याबाबत तपास सुरु आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच ही धमकी आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.