धम्मविचारांनी घडलेल्या अनिता

13 Mar 2026 12:17:23
Anita Maske
 
समाजकार्य, शिक्षणसेवा आणि धम्मप्रचारातून अनिता रविकिरण मस्के यांनी सामाजिक बांधिलकी जपत महिलांमध्ये जागृती निर्माण करत, वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याविषयी...
 
समाजातील बदल हा केवळ विचारांनी होत नाही, तर सातत्यपूर्ण कृती आणि जनसंपर्कातून घडत असतो. शिक्षण, सामाजिक कार्य आणि धम्मप्रचार या त्रिसूत्रीचा संगम साधत समाजात अविरतपणे झटणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे अनिता मस्के. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मागासवर्गीय शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या महिला मुख्य संघटक म्हणून त्या कार्यरत असून, समाजातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि धम्मविचारांचा प्रसार करणे, हे त्यांचे प्रमुख ध्येय.
 
अनिता मस्के शिक्षणात प्रावीण्यप्राप्त असून, त्यांनी ‌‘एमए‌’ व ‌‘बीएड‌’ पदवी संपादन केली आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित काम करत असतानाच, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. शिक्षण क्षेत्रातील अनुभवामुळे समाजातील वंचित घटकांच्या अडचणी आणि गरजा यांची त्यांना जाणीव झाली. विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात राहिल्यामुळे शिक्षण ही समाजपरिवर्तनाची प्रभावी शक्ती असल्याची जाणीव त्यांच्या मनात अधिक ठसली आणि त्यातून समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढला. त्यांना कलेची आवड असल्याने त्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून शास्त्रीय गायन शिकत आहेत. आतापर्यंत त्या गायनाच्या पाच परीक्षा उत्तीर्ण करून ‌‘गायन विशारद‌’ पदवीची तयारी करत आहेत.
 
लहानपणापासूनच त्यांच्या आई-वडिलांकडून सामाजिक, धम्म आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची जाणीव देण्यात आली. पुढे लग्नानंतर त्यांचे पती रविकिरण मस्के यांच्या प्रेरणेने त्या सामाजिक कार्यात अधिक सक्रिय झाल्या.
‌‘भारतरत्न‌’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, वंदनीय जिजाऊ, भीमाई, रमाई आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार त्यांच्या कार्याचे प्रेरणास्थान. विशेषतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचे विचार त्यांच्या कार्याला दिशा देतात. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या बाबासाहेबांच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी कार्याचा मार्ग निश्चित केला.
 
डोंबिवली, तसेच टिळक नगर-चेंबूर परिसरात अनिता मस्के बौद्ध धम्मप्रचार व प्रसाराचे कार्य सातत्याने करीत आहेत. डोंबिवली बौद्ध सामाजिक संस्थेमार्फत धम्मप्रचारक म्हणून त्या विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात. तसेच ‌‘सामाजिक प्रज्ञादीप प्रतिष्ठान, टिळकनगर, चेंबूर‌’ येथे महिला संघटक आणि धम्मप्रचारक म्हणूनही सक्रिय आहेत. धम्मविचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावेत आणि समाजात समता, बंधुता व मानवतेचे मूल्य दृढ व्हावे, यासाठी त्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. धम्मप्रचाराबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांवर त्यांचा विशेष भर राहिला आहे. बौद्ध भिक्खू संघाला नियमित धम्मदान आणि भोजनदान, याशिवाय रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, तसेच पूरग्रस्तांना मदत अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजातील संकटग्रस्त घटकांना मदतीचा हात देणे, हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याची भावना त्यांच्या कार्यात प्रकर्षाने दिसते.
 
महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. समाजातील महिलांना शासनाच्या विविध योजना, आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग आणि कौशल्य विकासाच्या संधी यांची माहिती देणे, मार्गदर्शन करणे आणि संबंधित कार्यालयांमध्ये पाठपुरावा करणे, हे त्यांच्यासाठी नित्याचेच. त्यामुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे आणि समाजनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावावी, यासाठी त्या प्रयत्नशील असतात. बृहन्मुंबई मनपा शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्याही त्यांनी प्रशासनापुढे मांडल्या. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा केला. त्यामुळे संघटनेच्या कामातही त्यांची सक्रिय भूमिका राहिली आहे. शिक्षक आणि कर्मचारी यांचे प्रश्न प्रशासनापुढे मांडून त्यावर उपाययोजना व्हाव्यात, यासाठी त्या प्रयत्न करतात. अनिता मस्के यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध स्तरांवर गौरविण्यात देखील आले आहे. शिक्षणाधिकारी कीर्तिवर्धन किरतकुडवे यांच्या हस्ते त्यांना ‌‘उत्कृष्ट प्रशासक 2024-25‌’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या ‌‘एल‌’ विभागामधील हा सन्मान त्यांच्या समाजकार्याची पोचपावतीच मानला जातो. तसेच विनोबा भावे नगर येथील मनपा इंग्रजी शाळेच्या उभारणीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
 
अनिता मस्के यांच्या सामाजिक कार्यामध्ये धम्मविचारांचा प्रभाव दिसतो. समाजामध्ये समता, बंधुता आणि जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी त्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात. बौद्ध धम्माचा प्रसार करताना त्यांनी तरुणपिढीपर्यंत समतावादी विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही समाजकार्याची ही वाटचाल अधिक व्यापक करण्याचा त्यांचा संकल्प आहे. स्त्री म्हणून देशातील प्रत्येक समाजातील महिलांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव पोहोचविणे आणि संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, हे प्रमुख ध्येय असल्याचे ते सांगतात. समाजकार्य, धम्मप्रचार आणि संघटनात्मक काम यांचा समन्वय साधत, अनिता रविकिरण मस्के यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर त्यांनी अनेक उपक्रम राबविले असून, समाजाशी जोडलेली ही त्यांची वाटचाल पुढेही अशीच सुरू राहावी, याकरिता दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
- सागर देवरे
 
 
 
Powered By Sangraha 9.0