कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई होणार; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

    13-Mar-2026   
Total Views |
Ganesh Naik
 
मुंबई : (Ganesh Naik) मुंबईच्या किनारपट्टीवरील कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले.
 
आ. संजय उपाध्याय यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला. यावर उत्तर देताना मंत्री गणेश नाईक म्हणाले की, "मुंबई परिसरात समुद्रकिनाऱ्यावर कांदळवन हे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून सुनामी किंवा मोठ्या भरतीच्या वेळी ते संरक्षणात्मक भूमिका बजावतात. बोरीवली विधानसभा क्षेत्रातील कांदळवनावरील अतिक्रमणाबाबत ७ डिसेंबर २०२५ रोजी वन, महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पाहणी केली.
 
या तपासणीत कांदळवन विभागातील तीन, खासगी मालकीच्या क्षेत्रातील चार, कांदळवनापासून ५० मीटर बफर झोनमधील तीन आणि बफर झोनबाहेरील दोन प्रकरणे आढळून आली. वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रात काही क्षेत्रावर अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही अतिक्रमणे कांदळवनापासून ५० मीटर बफर झोनमध्ये असल्याचेही स्पष्ट झाले. यावर वन विभागाने कारवाई केली असून, ज्या जागा पूर्वी वन विभागाकडे हस्तांतरित झालेल्या नव्हत्या त्या प्रकरणांमध्ये नोटिसा देण्यात आल्या आहेत."
 
हेही वाचा : विधानभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ
 
कुणालाही गैरप्रकार करू देणार नाही
 
"वन विभागाच्या अखत्यारीतील सर्व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाईल. नियमबाह्य काम करणाऱ्या कोणत्याही कंपन्यांना किंवा व्यक्तींना कांदळवन क्षेत्रात गैरप्रकार करू दिले जाणार नाहीत. या प्रकरणात वन, महसूल, महानगरपालिका आणि पोलीस विभागाची सामूहिक जबाबदारी असून, अधिवेशनानंतर सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सखोल तपास केला जाईल. ज्या ठिकाणी कांदळवनाचे नुकसान झाले आहे तेथे परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. तसेच, मागील काही वर्षांमधील उपग्रह चित्रे आणि नकाशांच्या आधारे कांदळवन क्षेत्रातील बदलांचा अभ्यास करून, अनियमित परवानग्या दिल्या असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल," असेही त्यांनी सांगितले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....