कोण आहे मोनालिसाचा पती फरमान खान? अभिनेता म्हणूनही आहे ओळख
12-Mar-2026
Total Views |
मुंबई : महाकुंभ मेळ्यादरम्यान अचानक चर्चेत आलेली मोनालिसा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अलीकडेच तिने केरळमधील एका मंदिरात अभिनेता आणि मॉडेल फरमान खान याच्यासोबत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांचा या नात्याला विरोध असल्याच्या चर्चा असल्यामुळे या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लग्नानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांनी केरळ पोलिस यांच्याशीही संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मोनालिसा लाल साडी आणि कपाळावर सिंदूर लावलेल्या वधूच्या रूपात दिसत आहे, तर फरमान खान पांढऱ्या धोतर आणि कुर्त्यात पारंपरिक वेशात दिसत आहे. लग्नानंतर फरमान खानने आपल्या नात्याबद्दल बोलताना सांगितले की, “आमची भेट जरी सहा महिन्यांपूर्वी झाली असली तरी हे प्रेम आम्हाला जणू ६० वर्षांपासूनचे असल्यासारखे वाटते.”
कोण आहे मोनालिसाचा पती फरमान खान?
फरमान खान हा महाराष्ट्रातील अभिनेता आणि मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्समध्ये काम केले असून प्रादेशिक चित्रपटसृष्टीशीही त्यांचा संबंध राहिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची आणि मोनालिसाची ओळख सुमारे दीड वर्षांपूर्वी फेसबुकवरून झाली होती. साध्या ऑनलाइन संभाषणातून सुरू झालेली ही ओळख पुढे मैत्रीत बदलली आणि नंतर ती प्रेमसंबंधात परिवर्तित झाली.
कुटुंबीयांचा विरोध
मात्र त्यांच्या या नात्याला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध झाला असल्याचे सांगितले जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे दोघे वेगवेगळ्या धर्मांचे असल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांनुसार, मोनालिसाच्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते आणि त्यांनी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र या सर्व दबावानंतरही मोनालिसा आणि फरमान यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. घरातील परिस्थिती बिघडल्यानंतर मोनालिसा आणि फरमान कथितरित्या तिरुवनंतपुरम येथे गेले. तेथे त्यांनी सुरक्षेसाठी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अरुमानूर नैनार मंदिर येथे साध्या समारंभात दोघांचा विवाह झाला. काही स्थानिक नेते आणि सार्वजनिक व्यक्ती देखील या समारंभाला उपस्थित होते आणि त्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिल्याचे सांगितले जाते.
मोनालिसानेच केलं प्रपोज
लग्नानंतर फरमान खानने एका मुलाखतीत सांगितले की, मोनालिसानेच सर्वप्रथम त्याला प्रपोज केले होते. सुरुवातीला त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता आणि तो नाकारला होता. मात्र कालांतराने त्यांनी मोनालिसाच्या भावना समजून घेतल्या आणि दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मोनालिसा भोसले ही प्रथम चर्चेत आली ती प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेला दरम्यान. मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकताना तिच्याकडे अनेकांचे लक्ष गेले. विशेषतः तिच्या तपकिरी डोळ्यांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. काही वेळातच तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि ती रातोरात इंटरनेटवर प्रसिद्ध झाली. दरम्यान, लग्नाआधी ती एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये गेल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्या घटनेनंतर मोनालिसा सतत चर्चेत राहिली असून आता तिच्या लग्नामुळे पुन्हा एकदा ती बातम्यांमध्ये झळकत आहे.