VVMC Cluster Scheme : वसई-विरारकरांच्या हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा, राहुल नार्वेकरांकडून क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश

    12-Mar-2026   
Total Views |
VVMC Cluster Scheme
 
विरार : (VVMC Cluster Scheme) वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना प्रभावी आणि तात्काळ अंमलात आणण्यासाठी महापालिकेसोबत समन्वय साधून आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले. या योजनेअंतर्गत क्षेत्र ठरवण्याची मागणी भाजपचे आमदार राजन नाईक दीर्घकाळ करत होते, ज्याला आता यश मिळाले आहे.
 
अनधिकृत मालमत्ता आणि पुनर्विकासाचा मुद्दा
राजन नाईक यांनी सांगितले की, वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रातील १०,१६,००० मालमत्तांपैकी सुमारे ४,९९,००० मालमत्ता अनधिकृत आहेत. तसेच, ८७२ आरक्षित भूखंडांपैकी ३२९ भूखंडांवर अनधिकृत बांधकामे उभारली गेली आहेत, ज्यामुळे पुनर्विकास प्रक्रिया अडथळ्यांत अडकली आहे.
 
८ सप्टेंबर २०२० पासून लागू असलेली एसआरए अधिसूचना असूनही वसई–विरारमध्ये अजूनही एकही झोपडपट्टी क्षेत्र अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. ही समस्या हजारो कुटुंबांच्या कायदेशीर हक्कांसाठी गंभीर आव्हान ठरली आहे.
 
भविष्यातील ग्रोथ हब
सदर क्षेत्र प्रस्तावित बुलेट ट्रेन स्थानकाच्या पाच किलोमीटरच्या त्रिज्येत येते आणि भविष्यात येथे महत्वाचा “ग्रोथ हब” विकसित होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्याच्या एसआरए नियमांऐवजी क्लस्टर योजना अधिक योग्य पर्याय ठरत आहे, ज्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेस गती मिळेल.

महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित अधिकारी
बैठकीस वसई–विरार महापालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील, नगरसेवक निलेश चौधरी, झोपडपट्टी पुनर्विकसन प्राधिकरण ठाणे विभागाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, सक्षम प्राधिकारी मीनल पालांडे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी या विषयाची गंभीर दखल घेत सकारात्मक चर्चा केली.
 
आमदार राजन नाईक यांचे मत
राजन नाईक म्हणाले की, आज मिळालेले निर्देश वसई–विरारकरांच्या संयम, विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश आहेत. ही लढाई केवळ इमारतींसाठी नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या कायदेशीर हक्क आणि सन्मानासाठी आहे.
 
सुरक्षित आणि कायदेशीर घर
आजचा दिवस वसई–विरारकरांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशांमुळे हजारो कुटुंबांना स्थैर्य आणि सुरक्षित भविष्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसई–विरारकरांना सुरक्षित, कायदेशीर आणि सुसज्ज घर मिळवून देण्यासाठी संघर्ष अविरत सुरू राहणार आहे, असे राजन नाईक यांनी स्पष्ट केले.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.