वनवासी वीरयोद्धा बाबुराव शेडमाके : एक धगधगता इतिहास

    12-Mar-2026
Total Views |

महाराष्ट्राच्या क्रांतिगाथेत चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी येथील वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव सुवर्णाक्षणांनी कोरले गेले आहे. इंग्रजी सत्तेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध ‌‘एल्गार‌’ पुकारणाऱ्या वनवासी समाजातील या महान जननायकाचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या अपरिचित योद्ध्याचे हे शौर्यस्मरण...

वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म दि. 12 मार्च 1833 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील घोटगाव येथील जमीनदार कुटुंबात झाला. आईचे नाव जुरजायाल आणि वडिलांचे नाव पुल्लेसूर बापू. त्यांचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक पद्धतीच्या ‌‘गोटूल‌’मध्ये झाले; तर उच्चशिक्षणासाठी त्यांनी रायपूर गाठले, जिथे त्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात केले. 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक वनवासी वीरांनी बलिदान केले, त्यांच्या कथा भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील वनवासी आजही सांगतात. 1857 नंतर स्वातंत्र्यसंग्रामाच्या ज्वाला पूर्णपणे विझल्या नाहीत. बिरसा मुंडा यांसारखे अनेक क्रांतिवीर ठिकठिकाणी उठाव करीतच होते. त्यापैकीच एक म्हणजे बाबुराव शेडमाके.

बालपणातच बाबुराव शेडमाके यांनी तलवार, भाला चालविण्याचे शिक्षण घेतले. गोंडवनाचे राजे शंकर शहा, रघुनाथ शहा इत्यादी क्रांतिकारकांना इंग्रजांनी तोफेच्या तोंडी दिल्याचे त्यांनी ऐकले. त्याचप्रमाणे वनवासी क्रांतिवीर नारायण सोनाखाम यांनाही इंग्रजांनी तोफेच्या तोंडी दिले होते. इंग्रजांच्या या कृत्याची बाबुराव शेडमाके यांना मनस्वी चीड आली. क्रांतिकारकांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा त्यांनी विडा उचलला.

बाबुराव शेडमाके यांनी आपल्या घोटगावच्या गढीत वनवासींचे सैन्य स्थापन केले. त्यांना देशभक्तीचे धडे दिले. मातृभूमीच्या मुक्तीसाठी त्यांना प्रेरित केले. मातृभूमीचे रक्षण करणे, त्यासाठी प्राणार्पण करणे, यातच खरी मोक्षप्राप्ती आहे; या भावनेने सैन्यात भरती झालेले वनवासी कोणत्याही प्रकारचे साहस करण्यास सिद्ध झाले. राजगडच्या नांदगाव घासरी या परगण्यात इंग्रज सेनापती क्रिप्टन याची छावणी होती. शेडमाके यांनी दि. 22 मार्च रोजी सैनिकांना इंग्रजांवर हल्ला करण्याची योजना सांगितली. दि. 23 मार्च 1858 रोजी स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या छावणीवर हल्ला करण्यात आला. कित्येक इंग्रज मारले गेले. पराभूत होऊन जीव वाचवण्यासाठी चंद्रपूरला पळून गेले. बाबुराव शेडमाके यांना विजयामुळे खूप धन मिळाले. त्यांनी ते गरिबांना वाटून दिले. इंग्रजांनी शेडमाके यांचा हा उठाव मोडून काढण्यासाठी नागपूरहून अधिक सेना बोलावली. शेडमाके यांनी आपले सामर्थ्य वाढविले. आडपल्लीचे जमीनदार व्यंकटेश शेडमाके आपले सैन्य घेऊन बाबुरावांना मिळाले. इंग्रज सेना आणि वनवासी सेना यांची भयंकर धुमश्चक्री झाली. वनवासींच्या अंगात जणू रणचंडी संचारली होती. त्यांनी खूप शौर्य दाखविले. इंग्रज सेनापती शेक्सपिअर पराभूत झाला, त्याने कसाबसा आपला जीव वाचवला. पुन्हा अधिक सैन्यानिशी आणि प्रचंड दारुगोळा आणि तोफा जमविल्या. या आधुनिक शस्त्रसाठ्याने बाबुराव शेडमाके यांच्यावर हल्ला केला. गोंडवनाच्या वनवासी सैनिकांनी आपल्या पारंपरिक शस्त्रांच्या बळावर त्यांच्याशी मुकाबला केला. तोफांच्या माऱ्यासमोर वनवासींचा ठाव लागेना. तरीही, बाबुराव शेडमाके यांनी त्यांना युद्धास प्रवृत्त केले. वनवासी सैन्याचे साहस आणि निश्चय पाहून इंग्रजी सैन्याने पुन्हा एकदा माघार घेतली. या लढाईत बाबुराव शेडमाके यांच्या सैन्याचीही खूप हानी झाली होती. सतत तीन दिवस चाललेल्या युद्धात अनेक वनवासी वीरांना वीरमरण आले होते. तरीही, वनवासींचे मनोबल खचले नव्हते. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याच्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीने त्यांचे मनोधैर्य खचू दिले नाही.

गोंडवनातील वनवासी सैन्यापुढे इंग्रजांना सतत माघार घ्यावी लागत होती. अखेर त्यांनी कपटाचा आश्रय घेतला. प्रत्यक्ष युद्ध न करता, आदिवासी जनतेचा छळ करून शेडमाके यांना मानसिक पातळीवर दुःख देण्यासाठी सुरुवात केली. इंग्रजांच्या सैनिकांनी गावोगावी लुटालूट सुरू केली. स्त्रियांवर बलात्कार सुरू केले. त्यात अनेक गावे उद्ध्वस्त झाली. लोक भयग्रस्त झाले. घोटच्या किल्ल्यात इंग्रजांनी बाबुराव शेडमाके यांना घेरले, बाबुराव शेडमाके यांनी जिद्दीने प्रतिकार केला. येथे इंग्रजांना हार खावी लागली. शेवटी देशद्रोह्यांना आमिष दाखवून फितुरी घडवली. ब्रिटिशसेनेने कपटाने बाबुराव शेडमाके यांना अटक केली. अहेरीची राणी लक्ष्मीबाई ही बाबुराव शेडमाके यांची बहीण होती. तिने भावाला जेवायला बोलावले आणि कपटाने कैद करून इंग्रजांच्या स्वाधीन केले.

अखेर दि. 21 ऑक्टोबर 1858 रोजी गोंडवनाच्या या शूर वनवासी स्वातंत्र्यवीराला चंद्रपूरच्या कारागृहात पिंपळाच्या झाडाला टांगून फाशी देण्यात आली. व्यंकटेश शेडमाके यांनाही पकडण्यासाठी अशाच प्रकारे देशद्रोह्यांच्या मदतीने छलकपटाने पकडण्यात यश मिळविले. 1860 मध्ये त्यांनादेखील फाशी देण्यात आली. बाबुराव शेडमाके आणि व्यंकटेश शेडमाके या वनवासी शूरवीरांच्या कथा आजही गोंडवनामध्ये सांगितल्या जातात, गायल्या जातात. आतापर्यंत आपण 1857 आणि त्यानंतरच्या काळात आदिवासी युवकांनी स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला आणि बलिदान केले पाहिले; परंतु त्यापूवही वनवासी वीरांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध आणि अन्यायी धोरणाविरुद्ध संघर्ष केला होता. इतिहास लेखकांनी वनवासींच्या या उठावाकडे फारसे लक्ष दिले नाही. दुर्दैवाने त्याची दखल घेतली नाही. साधारणपणे 1857 पासून स्वातंत्र्यसमराचा प्रारंभ मानला जातो; परंतु वनवासींनी 1832 मध्ये ‌‘लरका विद्रोह‌’ किंवा ‌‘कोल विद्रोह‌’ या नावाने ओळखला जाणारा इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला होता.

अटकेच्या वेळचा ऐतिहासिक प्रसंग

असे म्हटले जाते की, बाबुरावांना पकडण्यासाठी इंग्रजांना थेट युद्धात यश आले नाही. अखेर त्यांनी बाबुरावांच्या जवळच्याच काही फितूर लोकांचा वापर केला. बाबुराव जेव्हा अहेरीला आपल्या कुटुंबाला भेटायला आले होते, तेव्हा त्यांना घेराव घालण्यात आला. त्यांना बेड्यांत जखडलेले असतानाही त्यांचा रुबाब कमी झाला नव्हता. फाशीच्या आदल्या रात्रीपर्यंत त्यांनी कोणतीही माफी मागितली नाही, हे त्यांच्या करारी बाण्याचे लक्षण!

वारसा आणि सन्मान

पुतळा आणि स्मारक : चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहाच्या ज्या भागात त्यांना फाशी देण्यात आली, तिथे आज त्यांचे भव्य स्मारक आहे. दरवष दि. 18 सप्टेंबरला (त्यांच्या अटकेचा दिवस) आणि दि. 21 ऑक्टोबरला (त्यांच्या बलिदानाचा दिवस) तिथे मोठा मेळावा भरतो.

शेडमाके यांचा इतिहास हा केवळ एका जिल्ह्याचा इतिहास नाही, तर तो भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका दुर्लक्षित; पण अत्यंत तेजस्वी अध्याय आहे. देश, देव आणि धर्मासाठी बलिदान करण्याचे सामर्थ्य आपल्या सर्वांना या प्रेरणादायी सत्यकथेतून मिळते आहे, हे आपले भाग्य.

क्रांतीचा सूर्य, बाबुराव शेडमाके...
चंद्रपूरच्या मातीचा तो, धगधगता अंगार होता,
इंग्रजी त्या सत्तेचा, तो कर्दनकाळ काळ होता...॥1॥
अहेरीच्या भूमीवरती, जन्म घेतला वाघाने,
शत्रूलाही धडकी भरली, बाबुरावांच्या नावाने...॥ 2॥
तलवार, भाला, पिरकमान अन्‌‍ गनिमी कावा जाणला,
जंगल सेना उभी करोनी, लढा क्रांतीचा मांडला...॥3॥
नांदगाव भोसरी साक्ष देई, त्या अजिंक्य लढ्याची,
जमीनदारांच्या अत्याचाराला, ओढ लागली अंताची...॥4॥
राणी व्हिक्टोरियाच्या दरबारी, चर्चा झाली नावाची,
धडकी भरली गोऱ्या फौजेला,
भीती बाबुरावांच्या बाणाची...॥5॥
फितुरीने मग घात केला, पूजेच्या त्या प्रहराला,
वीरपुत्राने कवटाळले, हसत हसत फाशीला...॥ 6 ॥
21 ऑक्टोबरच्या त्या दिनी, पिंपळ झाला पावन,
रक्ताने सिंचली ही धरा, केले शत्रूचे दहन...॥ 7 ॥
आजही त्या पिंपळ छायेखाली, क्रांतीचा मंत्र घुमतो,
बाबुरावांच्या बलिदानाने, प्रत्येक श्वास गर्जतो...॥ 8 ॥
आज, दि. 12 मार्च बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीदिनी त्यांना त्रिवार वंदन.

- सुहास पाठक
(लेखक पश्चिम क्षेत्र शिक्षण आयाम प्रमुख (पुणे) आहेत.)
9421259386