‘द केरळ स्टोरी ३’? ‘…हा तर लव्ह जिहाद’, मोनालिसाने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यानंतर दिग्दर्शकाने केली सनसनाटी टिका

12 Mar 2026 14:26:12

मुंबई : महाकुंभ मेळ्यात माळा विकताना अचानक सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही चित्रपटामुळे किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे, तर तिच्या लग्नामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. मोनालिसाने आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत (फरमान खान) लग्न केलं आहे. या बातम्या समोर आल्यानंतर तिला चित्रपटात लॉन्च करणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहून या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टला ‘ही बंडखोरी नाही, तर लव्ह जिहाद आहे’ असे शीर्षक दिले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मोनालिसाच्या निर्णयावर गंभीर आरोप करत आपल्यासोबत घडलेल्या घटनांचाही उल्लेख केला आहे.







View this post on Instagram
















A post shared by Mona lisa ❤️❤️❤️ (@mona_lisa_0007)


सनोज मिश्रा यांनी लिहिले की, महाकुंभ मेळ्यात माळा विकताना व्हायरल झाल्यानंतर मोनालिसा अचानक चर्चेत आली होती. त्यावेळी तिची साधेपणा आणि व्यक्तिमत्त्व पाहून ते प्रभावित झाले होते. त्यांनी सांगितले की मोनालिसाच्या निरागस स्वभावामुळे तिला प्रशिक्षण देऊन चित्रपटसृष्टीत लॉन्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयाचे देश-विदेशात स्वागतही झाले होते. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे काही लोक नाराज झाले होते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी आरोप केला की विरोधकांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये पाठवले. मिश्रा यांच्या मते, या संपूर्ण वादाचा उद्देश योगी आदित्यनाथ यांच्या महाकुंभ आयोजनाला बदनाम करणे हा होता.







View this post on Instagram
















A post shared by Sanoj Mishra (@sanojmishra)


आपल्या पोस्टमध्ये त्यांनी मोनालिसाच्या कौटुंबिक परिस्थितीचाही उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, मोनालिसाचे आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेले होते आणि कुटुंबामध्येही अनेक अडचणी होत्या. ती अनेकदा आपल्या खऱ्या आईची आठवण काढून भावुक व्हायची आणि परिस्थितीविरुद्ध बंड करण्याची इच्छा व्यक्त करायची, असेही त्यांनी म्हटले आहे.

सनोज मिश्रा यांनी आरोप केला की काही लोकांनी मोनालिसाला पैशांचे आमिष दाखवून चुकीच्या मार्गावर नेले. त्यांनी दावा केला की ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, तेच नंतर त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि मोनालिसाला त्यांच्यापासून दूर केले. त्यांनी या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ असे संबोधत म्हटले की मोनालिसा कदाचित याला बंडखोरी समजत असेल, परंतु प्रत्यक्षात ती एका कटाची शिकार झाली आहे.

पोस्टच्या शेवटी त्यांनी आपली निराशाही व्यक्त केली. त्यांनी लिहिले की ज्या मुलीला त्यांनी मुलीसारखे समजून चित्रपटात संधी देण्याचा निर्णय घेतला होता, त्याच कारणामुळे आज त्यांचे सर्व काही धोक्यात आले आहे. चित्रपटासाठी त्यांनी सुमारे १० कोटी रुपयांचे कर्जही घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाकुंभदरम्यान व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाला सनोज मिश्रा यांनी आपल्या द डायरी ऑफ मनीपूर (The Diary of Manipur) या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. चित्रपटाची तयारीही सुरू झाली होती. तर काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला होता. मात्र नंतर वाद वाढल्यामुळे हा संपूर्ण मुद्दा चर्चेत आला. आता मोनालिसाच्या लग्नाची बातमी आणि दिग्दर्शकांचे आरोप यामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दरम्यान मोनालिसाचा बॉयफ्रेंड फरमान हा मुळचा केरळचा आहे. तर मागच्या एक ते दीड वर्षांपासून दोघांचीही सोशल मीडियावरुन ओळख निर्माण झाली होती. 


Powered By Sangraha 9.0