दिवास्वप्नांची तिरडी काढा!

12 Mar 2026 12:40:46

गॅसचे भाव वाढले म्हणून सोलापुरात काँग्रेसने ‌‘तिरडी‌’ आंदोलन काढले. गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक यात्रा यावेळी त्यांनी काढली. काय म्हणावे, या तिरडीबहाद्दुरांचा नेताच देशाची परिस्थिती समजू शकत नाही; तर त्याचे कार्यकर्ते काय समजणार? गॅस सिलिंडरचे भाव वाढले ते का वाढले? ते काय मोदी सरकारने किंवा देवेंद्र फडणवीसांनी गंमत म्हणून मुद्दाम वाढवलेत का? पण, हे समजण्याची अक्कल या तिरडीबहाद्दुरांना नसणारच! कारण, ‌‘यथा राजा तथा प्रजा!’

सोलापुरातले काँग्रेसी गॅस सिलिंडरच्या भोवती धाय मोकलून रडण्याचा आविर्भाव करत होते. भाजप सरकार, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीका करत होते. अमेरिकेने इराणशी युद्ध करावे आणि त्यात गॅस सिलिंडरची कमतरता उत्पन्न होऊन स्वदेशातील लोकांना झळ बसावी, असे कोणत्या तरी देशातील सत्ताधाऱ्यांना वाटेल का? उलट, सत्ताधारी पक्षांचे वर्तन असेच असते की, त्यांच्या कारकिदत लोकांचे जीवन सुरळीत असावे, जेणेकरून त्यांची लोकप्रियता कायम राहील. पण, हे कळेल तर ते काँग्रेसी कसले? तसेही काँग्रेस सत्तेत असताना काय करते, हा इतिहास आठवण्यापेक्षा ‌‘कोरोना‌’ काळातला महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा कार्यकाल आठवून पाहावा. पण, 1975 साली इंदिरा गांधींनी ‌‘आणीबाणी‌’ लादत संविधानाचा अपमान केला, तेव्हा जसे काँग्रेसी गप्प होते; तसेच ते ‌‘कोरोना‌’ काळातल्या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेवरही गप्प होते. कसेही का होईना, सत्ता मिळवायचीच आणि जेव्हा सत्तेत नसू, तेव्हा देशात असे वातावरण करायचे की, लोकांमध्ये काँग्रेसेतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असंतोष माजला पाहिजे. हे बाळकडू काँग्रेसींमध्ये जन्मतःच असते का? आता तर उबाठा आणि मनसेची साथसंगत असल्याने त्यांच्या वागण्याला ‌‘चार चाँद‌’ लागलेत (महाविकास आघाडीचे हक्काचे मुस्लीम मतदार खूश होतील म्हणून ‌‘चार चाँद‌’ म्हटले); पण ते विसरले की, परिस्थिती कितीही गंभीर झाली, तरी भारतीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी देशात मोदी आणि राज्यात फडणवीस खंबीर आहेत. त्यामुळे सिलिंडरची ‌‘तिरडी यात्रा‌’ काढण्याऐवजी काँग्रेसींनी लोक सरकारविरोधात रस्त्यावर येतील, मग भाजपची सत्ता जाईल आणि महाविकास आघाडी सत्तेत येईल, या दिवास्वप्नांची तिरडी काढावी. तेवढीच तिरडी काढण्याची हौस भागेल.

अशक्य काँग्रेसी...

मागे दिल्लीला ‌‘एआय समिट‌’ हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होता. तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते कपडे काढून आंदोलन करण्याचा घाट घालत होते. मात्र, लोकांनी हा घाट फोडला. बुक्की म्हणू नका, लाथा म्हणू नका, अगदी चपलेने तोंडही फोडले या अर्धनग्न लोकांचे! त्यामुळेच की काय, आता राहुल गांधींनी फर्मान काढले, आता ते काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना ‌‘मार्शल आर्ट‌’ शिकवतील. मग भाजपला भारी पडू, असेही राहुल गांधी म्हणाले. ते स्वतः ‌‘मार्शल आर्ट‌’मध्ये निपुण असून, त्यामुळेच त्यांचा मनावर आणि वागण्यावर संयम आहे, त्यामुळेच ते कोणत्याही चक्रव्यूहामध्ये न अडकता सगळ्यावर मात करतात, असेही त्यांचे म्हणणे. अरे बापरे, राहुल गांधींचे वागणे-बोलणे संयमी आहे? आणि हे असे वागणे आहे, त्याला ‌‘मार्शल आर्ट‌’ म्हणणे म्हणजे ‌‘मार्शल आर्ट‌’चा अपमानच म्हणावा लागेल.

असो. 2020 साली ‌‘कोरोना‌’ महामारीचे संकट आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळा देश ‌‘कोरोना‌’विरोधात एकजुटीने लढण्यास सिद्ध झाला. मात्र, त्यावेळी राहुल गांधी अर्धस्मित करत म्हणत होते की, “मी नानीकडे इटलीला गेलो होतो, पाश्चात्त्य देशात ‌‘कोरोना‌’ने हाहाकार माजवला आहे. भारतात तर त्सुनामी येईल त्सुनामी!” त्सुनामी कसली, तर भारतीयांच्या मृत्यूची? राहुल गांधी लोकांच्या मृत्यूच्या त्सुनामीचे भाकीत करत होते. आताही “इराण व इस्रायल-अमेरिका युद्धामुळे भारताचे नुकसान होणार, भारतीयांचे हाल होणार,” या परिस्थितीमध्ये इराणच्या समर्थनार्थ मोदींनी भूमिका मांडावी, अशी हट्टाची भूमिका राहुल गांधी घेत आहेत. खरेतर जगभरात युद्धाचे वादळ घोंगावत असताना भारत निवांत आहे, हे खरेतर देशाच्या केंद्र सरकारचे यश आहे. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी त्यांच्या कार्यकर्त्यांना आता ‌‘मार्शल आर्ट‌’ शिकण्याचे सल्ले देत आहेत. खरेतर राहुल आणि त्यांचे समर्थक मार्शल आर्टसह 64 कला शिकले; तरीही त्यांना जनाधार मिळेल का? त्यासाठी देशाशी-समाजाशी निःस्वाथपणे एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. आता हे सगळे राहुल कुठून आणतील? अर्थात, याबाबत काँग्रेसींचे काही म्हणणे नसेल. कारण सत्तेतून पायउतार होऊनही आपणच सर्वेसर्वा आहोत, अशा बेहोशीत राहायची अभूतपूर्व मानसिकता त्यांनी मिळवले आहे. अशक्य काँग्रेसी!

9594969638


Powered By Sangraha 9.0