
चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिपि
प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः|
चतुश्चत्वारिंशद्-वसुदल-कलाश्र्-त्रिवलय-
त्रिरेखभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः॥12॥सहाव्या आवरणात पुन्हा दहा त्रिकोण आहेत आणि ते सर्व-रक्षाकर चक्र म्हणून ओळखले जाते, जे उपासकाचे संसाराच्या प्रकोपांपासून संरक्षण करते. हे आच्छादन अंतर्दर्शार त्रिकोण म्हणून ओळखले जाते. या आवरणाची आराध्य देवता त्रिपुरामालिनी आहे आणि योगिनी निर्गर्भ योगिनी आहे. प्रत्येक त्रिकोणाची एक प्रमुख देवी असते. त्यांची नावे सर्वज्ञे, सर्वशक्ते, सर्वैश्वर्यप्रदायिनी, सर्वज्ञानमयी, सर्वव्याधिविनाशिनी, सर्वाधारस्वरूपे, सर्वपापहरे, सर्वानंदमयी, सर्वरक्षास्वरूपिणी, सर्वेप्सितफलप्रदे असे असून, तिचे पूजन केल्यानंतर आणि तिच्या परवानगीनंतरच साधकाला पुढील आवरणात जाता येते. त्यात चक्राची स्वामिनी म्हणजे, सर्वरक्षाकरचक्रस्वामिनी देवी आणि या चक्राची योगिनी म्हणजे निगर्भयोगिनी देवी.
सातवे आवरण म्हणजे सर्व-रोग-हर चक्र हे आहे. हे आवरण सर्व मानसिक क्लेश दूर करणारे आहे. यात आठ त्रिकोण असून, त्यांना ‘वसु कोण’ असेही म्हणतात. हे त्रिकोण अष्टवसुंचे प्रतिनिधित्व करतात. अष्टवसु म्हणजे धर, ध्रुव, सोम, आप, अनल, अनिल, प्रत्युष आणि प्रभास. या आवरणाची प्रमुख देवता त्रिपुरसिद्धा आहे आणि योगिनी रहस्य योगिनी आहे. या आवरणातील प्रत्येक त्रिकोणाची स्वामिनी वाग्देवी आहे. वशिनी, कामेश्वरी, मोदिनी, विमले, अरुणे, जयिनी, सर्वेश्वरी, कौलिनि या वाग्देवींनीच हे सहस्रनाम रचले आहे. संपूर्ण संस्कृत वर्णमालेवर या आठ वाग्देवींचेच राज्य आहे. वरील विवेचनात जे सांगितले आहे, त्याशिवाय सर्व त्रिकोण आणि कमळाच्या पाकळ्यांवर संस्कृत अक्षरे कोरलेली आहेत. हा त्रिकोण सर्वांत आतील त्रिकोणाच्या अगदी बाहेर आहे (ललिता सहस्रनाम 986). या आठ देवींची पूजा केल्यानंतर, ललितांबिकेच्या शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. त्यात चक्राची स्वामिनी म्हणजे, सर्वरोगहरचक्रस्वामिनी देवी आणि या चक्राची योगिनी म्हणजे रहस्ययोगिनी देवी.
आठवे आवरण हे मध्य बिंदूच्या अगदी बाहेर आहे, जो सर्वांत आतील त्रिकोण आहे. येथूनच आध्यात्मिक प्राप्ती सुरू होतात आणि आतील बिंदूवर समाप्त होतात. या त्रिकोणाच्या बाहेर ललितांबिकेची शस्त्रे ठेवली आहेत. ललिता सहस्रनाम नामक्रमांक 8, 9, 10 आणि 11 मध्ये, देवीच्या शस्त्रास्त्रांचे वर्णन केले आहे. या शस्त्रांना देवी समजून त्यांचे पूजन होते; त्यामुळे या चार देवता म्हणजे बाणिनी, चापिनी, पाशिनी, अंकुशिनी. श्री ललिता देवीच्या या शस्त्रस्वरूप देवतांची पूजा केल्यावर, साधक आठव्या आवरणात प्रवेश करतो, ज्याला सर्वसिद्धिप्रद म्हणून ओळखले जाते. या आवरणाची त्रिपुरांबिका ही स्वामिनी आहे आणि या चक्राशी संबंधित योगिनी अतिरहस्य योगिनी आहे. या आवरणाच्या, अर्थात त्रिकोणाच्या तिन्ही कोपऱ्यांवर महाकामेश्वरी, महावज्रेश्वरी, महाभगमालिनी या तीन देवींची पूजा केली जाते. पुढे ललितांबिका मध्यबिंदूवर पूजली जाते. त्यात चक्राची स्वामिनी म्हणजे सर्वसिद्धिप्रदचक्रस्वामिनी देवी आणि या चक्राची योगिनी म्हणजे अतिरहस्ययोगिनी देवी.
या सर्वांत आतील त्रिकोणाच्या बाहेर 15 तिथी नित्य देवीची पूजा केली जाते. प्रत्येक नित्या तिथी एक चंद्र दिवस दर्शवते. या नित्या देवी पुढीलप्रमाणे कामेश्वरी, भगमालिनी, नित्यक्लिन्ना, भेरुण्डा, वन्हिवासिनी, महावज्रेश्वरी, शिवादुती, त्वरिता, कुलसुंदरी, नित्या, नीलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वालामालिनी, चित्रा आणि षोडश नित्या स्वतः श्रीललिता त्रिपुरसुंदरी आहे. गुरुपरंपरेतील साधक आतील सर्वांत त्रिकोणाच्या वरच्या भागाच्या बाहेर काढलेल्या तीन समांतर रेषांमध्ये गुरू, गुरूचे गुरू आणि गुरूचे गुरू यांची पूजा करतात. गुरूची उपासना करणे, हा श्री विद्या पंथाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
बिंदू हेच नववे आवरण आहे. याला ‘सर्वानंद-माया चक्र’ म्हणतात; हे चक्र परम आनंदमय म्हणून ओळखले जाते. या चक्रात साधक स्वतः येथे सदैव विद्यमान आणि सर्वव्यापी अशा ब्रह्माशी एकरूप होतो. या आवरणाची स्वामिनी श्री महा त्रिपुरसुंदरी आहे, जिला ललितांबिका, राजराजेश्वरी, महाकामेश्वरी इत्यादी इतर विविध नावांनीदेखील ओळखले जाते, जी या विश्वाची परम देवी, सर्वोच्च माता आहे. या आवरणाशी संबंधित योगिनी म्हणजे, परापरति रहस्य योगिनी (परापारति रहस्य म्हणजे परमरहस्य.) या बिंदूच्या पलीकडे ज्यांना षोडशीची दीक्षा मिळाली नाही, ते पुढे जाऊ शकत नाहीत. ज्यांना षोडशीची दीक्षा घेतली जाते, ते पुन्हा बिंदूमध्ये तिचा अंतिम मंत्र आणि त्रिखंड मुद्रा घेऊन, पूजा करण्यात धन्यता मानतात. हे चक्र किंवा आच्छादन किंवा आवरण हे निसर्गातील अत्यंत गुप्त आहे, जिथे प्रकाश आणि विमर्श (शिव आणि शक्ती) सृष्टीचे संयोग घडतात. येथे शक्ती शिवाच्या डाव्या मांडीवर बसली आहे आणि ते मिळून, त्यांचा शोध घेणाऱ्यांवर कृपा करतात.
श्रीचक्रामध्ये एकूण 113 देवींची पूजा केली जाते. श्रीचक्र हे श्री नगराने वेढलेले आहे, जेथे 25 किल्ले अस्तित्वात आहेत. किल्ल्यांच्या मध्यभागी इतर सर्व देवी-देवतांचे वास्तव्य असलेल्या मोठ्या जागा आहेत. श्रीचक्राच्या नऊ आवरणांची तुलना मूलाधारापासून सुरू होऊन आज्ञा, सहस्रार, कुल सहस्रार आणि अकुला सहस्रारपर्यंतच्या सहा मानसिक चक्रांशी केली जाते. श्रीचक्र हे उत्पत्ती, स्थिती, लय, तीरोधान आणि अनुग्रह या ब्रह्मतत्त्वाच्या पंच क्रियांचे केवळ भौमितीय प्रतिनिधित्व नसून, विराट स्वरूपात सृष्टीची उत्पत्ती जशी झाली, त्याच क्रमाने मानवी जीवसुद्धा निर्माण होतो अशा ब्रह्मांडी ते पिंडी सिद्धांताची पुष्टी करणारे यंत्र आहे. धर्मग्रंथ सूचित करतात की, मानवी शरीर हे फक्त श्रीचक्राची प्रतिकृती आहे.
श्रीचक्राची तुलना चंद्राशी केली जाते, ज्यात 27 नक्षत्रांसह कला म्हणून ओळखले जाणारे 16 टप्पे आहेत. 27 बरोबर 16 जोडल्यास परिणाम 43 होईल, जी श्रीचक्रातील त्रिकोणांची संख्या आहे. बिंदूचा येथे समावेश नाही. बिंदू हा मध्यवत बिंदू आहे, जिथे पराशक्ती तिच्या पती शिवासोबत आनंदाने एकत्र उभी आहे. बिंदू हा मानवी शरीरातील सहस्रार आहे, जिथे शिव आणि शक्ती यांचे मिलन होते. श्रीचक्रामध्ये, श्री ललिता देवी जेव्हा कुंडलिनीच्या रूपात शिवाशी एकरूप होते, ते मिलन निसर्गात सूक्ष्म स्वरूपात असून मानवी शरीरात स्थूलरूपाने आहे.
काश्मिरी शैव मतानुसार मानवी देह हा 36 तत्त्वांचा बनला आहे. श्रीचक्रातील त्रिकोणांची संख्या 36 ही जणू, त्या तत्त्वांचे प्रतीक आहे आणि सप्त धातू त्वचा, रक्त, मांस, मेद, हाडे, मज्जा आणि प्रजननशील द्रव असतात. जर आपण 36 तत्त्वे आणि सात धातू जोडले, तर परिणामी घटक 43 होतो आणि हा श्रीचक्राच्या 43 त्रिकोणांचे प्रतिनिधित्व करतो.
जेव्हा एखादा साधक सांसारिक ताणतणावांनी ग्रस्त असतो, तो श्रीचक्रात प्रवेश करतो. त्याला हळूहळू ज्ञान प्राप्त होते आणि तो परम बिंदूपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याचे संपूर्ण रूपांतर होते आणि त्याला आत्मज्ञान प्राप्ती होते. नववे आवरण अर्थात बिंदू म्हणजे सृजन आणि संहार दोन्ही आहे. जेव्हा अभ्यासक पहिल्या आवरणातून बिंदूमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो अंतर्बाह्य बदलतो.
श्रीचक्र पूजन करण्याची पद्धती
श्रीचक्र हे सृष्टीक्रमाने विचार केला, तर मानवाच्या जन्माचा नऊ टप्प्यांचा तो प्रवास आहे. अर्थात, या नऊ टप्प्यांत मानवी देह आकाराला येऊन जीव जन्माला येतो. आत्मोन्नती साधणे आणि देहभाव गळून पडणे हे उद्दिष्ट ठेवून ज्यावेळी साधक श्रीयंत्राचे पूजन करण्यास प्रारंभ करतो, त्यावेळी तो संहार पद्धतीने पूजन करणार आहे, अर्थात सर्वांत बाहेरील आवरणापासून प्रारंभ करून तो केंद्रातील बिंदूपर्यंत पोहोचणार आहे. हे करताना तो ज्या क्रमाने देह धारण केला आहे, त्याच्या उलट क्रमाने देहभावाचा त्याग करणार आहे.
श्रीचक्र साधना करताना श्री देवी खड्गमाला स्तोत्राचा पाठ अनिवार्य आहे. श्री देवी खड्गमाला स्तोत्रात श्रीचक्रातील सर्व देवींचा आवरणक्रमाने उल्लेख आहे. एकेका आवरणातील देवतांची उपासना, ज्ञानप्राप्ती हा पहिला हेतू आहे. त्यानंतर या ज्ञानाच्या आधारावर आवरण देवता आणि आवरण योगिनीला प्रसन्न करणे, हे दुसरे कार्य. त्यानंतर तुम्ही त्या आवरणाच्या बाहेर पडून, त्या आतील आवरणात प्रवेश करू शकता.
या पद्धतीने एकेका आवरणातील देवतांना प्रसन्न करत साधक ज्यावेळी केंद्र बिंदूपर्यंत पोहोचतो, त्याची कुंडलिनी जागृती झालेली असते. त्याचा देहभाव गळून गेलेला असतो आणि तो आत्मज्ञानी झालेला असतो. श्रीचक्र उपासना ही एकाच वेळेस कुंडलिनी जागृती, मंत्रोपासना आणि तंत्रउपासना असा तिन्हींचा समसमा संयोग आहे.
‘श्रीचक्र उपासना’ म्हणजे शिवशक्ती ऐक्याची स्वदेहात अनुभूती घेण्याचा उपासना मार्ग आहे आणि हा मार्गच या चक्राची स्वामिनी श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या साधनेतून पूर्णत्वाला जाणार आहे. हे लक्षातच घेऊन साधकाने श्रीचक्राच्या मध्यवत बिंदूवर तिचे ध्यान करणे आवश्यक आहे.
(क्रमश:)
- सुजीत भोगले
9370043901