तपोनिधी..

12 Mar 2026 14:08:34

ज्यांनी ‌‘शांतिब्रह्म‌’ ही पदवी आचरणाने योग्य ठरवली, समजाकार्याची मोठी परंपरा उभी केली आणि ज्यांच्या भक्तीच्या ऋणाची उतराई करण्यासाठी साक्षात पांडुरंगच त्यांच्या सेवेसाठी राहिला असा अधिकार असलेले संत म्हणजे शांतिब्रह्म एकनाथ महाराज. आपल्या लेखनशैलीतून समजातील सत्व जागे करणाऱ्या एकनाथ महाराजांचा समाधी दिवस अर्थात नाथषष्ठी सोमवार दि. 9 मार्च रोजी झाली. त्यानिमित्ताने नाथ महाराजांच्या जीवनचरित्राचा आणि त्यांच्या विशाल कार्याचा घेतलेला मागोवा...

संत एकनाथ महाराजांचा जन्म साधारण इ.स. 1533 मध्ये, पैठणातील एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी. दुर्दैवाने एकनाथ बालपणीच पोरके झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनीच केले. नाथांचे पूर्वज संत भानुदास हे मोठे सूर्यभक्त आणि विठ्ठलभक्त होते. त्यांनीच विजयनगरहून विठ्ठलाची मूत परत पंढरपूरला आणली होती. वयाच्या अवघ्या 12व्या वष एका आकाशवाणीतून त्यांना समजले की, त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्यावर (दौलताबाद) वास्तव्य करत आहेत. त्यानंतर कोणालाही न सांगता, हा 12 वर्षांचा मुलगा पायपीट करत देवगिरीला पोहोचला.

जनार्दन स्वामी हे केवळ एक आध्यात्मिक पुरुषच नव्हते, तर ते देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार आणि प्रशासकीय अधिकारीदेखील होते. त्यांनी एकनाथांचे कौतुक केले आणि आपल्या सेवेत रुजू करून घेतले. एकनाथांनी जनार्दन स्वामींच्या हाताखाली लेखनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ते दिवसभर किल्ल्याचे हिशोब तपासण्याचे आणि प्रशासकीय कामे करण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असत. एकदा हिशोबात एका अदेल्याची चूक झाली, तेव्हा नाथांनी रात्रभर जागून ती चूक शोधून काढली. जेव्हा त्यांना ती चूक सापडली, तेव्हा त्यांना जो आनंद झाला, तो पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यास आरंभ केला.

जनार्दन स्वामींनी त्यांची निष्ठा पाहून त्यांना गुरूदीक्षा दिली. त्यांनी नाथांना केवळ ध्यानधारणाच शिकवली नाही, तर प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. जनार्दन स्वामी हे स्वतः दत्तभक्त होते. त्यामुळे नाथांना त्यांच्याकडूनच, दत्त संप्रदायाची आणि भागवत धर्माची दीक्षा मिळाली. देवगिरीच्या डोंगरावर एका गुहेत नाथांनी कठोर तपश्चर्या केली, जिथे त्यांना प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे दर्शन झाले.

एकनाथ महाराज आपल्या सहकाऱ्यांसोबत काशीहून पायी रामेश्वरला जात असताना, कावडीमध्ये त्यांनी अत्यंत श्रद्धेने गंगाजल भरले होते. हे पवित्र जल तामिळनाडूतील रामेश्वरम्‌‍ येेथील भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेकासाठी नेले जात होते. शेकडो मैलांचा हा प्रवास त्याकाळी अत्यंत कठीण आणि तितकाच पवित्र मानला जात असे. प्रवास करत असताना कडक उन्हाचे दिवस होते. वाळवंटी भागात चालताना, नाथांना वाटेत एक गाढव मरणासन्न अवस्थेत पडलेले दिसले. कडाक्याच्या उन्हामुळे ते गाढव तहानेने व्याकुळ झाले होते आणि पाण्यासाठी तडफडत होते. आजूबाजूला पाण्याचा थेंबही नव्हता. नाथांचे अंतःकरण दयेने भरून आले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, आपल्या खांद्यावरील कावडीतील ते पवित्र गंगाजल त्या तहानलेल्या गाढवाच्या मुखात ओतले. गाढवाची तहान भागली आणि त्याचे प्राण वाचले. हे पाहून सोबतचे लोक रागावले आणि म्हणाले, “नाथ, तुम्ही हे काय केले? देवासाठी आणलेले पवित्र पाणी एका अपवित्र प्राण्याला पाजले? आता तुमचा अभिषेक कसा पूर्ण होणार?” त्यावर नाथांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, “ज्या देवाला मी रामेश्वरला भेटायला जात होतो, तो देव मला याच गाढवाच्या रूपात इथे भेटला आहे. तडफडणाऱ्या जिवाला पाणी पाजणे, हीच खरी ईश्वराची पूजा आहे.”

एकदा एकनाथ महाराज गोदावरी नदीवर स्नान करून काठावर येत होते. तिथे एक यवन (मुस्लीम धमय व्यक्ती) उभा होता. नाथांना पाहताच त्याने द्वेषापोटी त्यांच्या अंगावर थुंकले. नाथांनी कोणताही राग न मानता, पुन्हा नदीत जाऊन स्नान केले आणि बाहेर आले. तो व्यक्ती पुन्हा त्यांच्यावर थुंकला. नाथांनी शांतपणे पुन्हा स्नान केले. हा प्रकार एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल 108 वेळा घडला. तो माणूस नाथांना चिडवण्यासाठी वारंवार थुंकत होता आणि नाथ महाराज दरवेळी तितक्याच शांतचित्ताने ‌‘गंगेने मला पुन्हा स्नानाची संधी दिली,‌’ असे म्हणून नदीत जात होते. त्यांच्या चेहऱ्यावर क्रोधाची एकही लकीरही नव्हती, की मनात त्या व्यक्तीबद्दल कोणताही द्वेष नव्हता. शेवटी, तो माणूस नाथांच्या या अलोट शांतीमुळे पूर्णपणे खचला. त्याच्यातील अहंकार गळाला आणि त्याने नाथांच्या चरणी लोळण घेत रडत माफी मागितली, “महाराज, मला क्षमा करा. मी तुमचा इतका अपमान केला, तरी तुम्ही माझ्यावर रागावला नाहीत.” तेव्हा नाथांनी अत्यंत प्रेमाने उत्तर दिले, “अरे बाबा, तू का माफी मागतोस? तुझ्यामुळेच तर आज मला 108 वेळा पवित्र गंगेत स्नान करण्याचे भाग्य लाभले. मी तुझा ऋणी आहे.”

एकदा एकनाथ महाराजांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. शास्त्रानुसार, श्राद्धसमयी ब्राह्मणभोजन देणे आवश्यक होते. मात्र, त्याच वेळी नाथांच्या घराबाहेरून काही तहानलेले आणि भुकेलेले अस्पृश्य समाजबांधव जात होते. अन्नाचा सुवास आल्याने ते आपापसात बोलू लागले, “किती छान वास येतोय; पण आपल्याला हे अन्न कुठून मिळणार?” नाथांच्या कानावर हे शब्द पडले. त्यांनी विचार केला की, ज्या पितरांसाठी हे अन्न बनवले आहे, ते पितर तर सर्व प्राणीमात्रांमध्येच वास करतात. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ब्राह्मणांची वाट न पाहता, ते सर्व पवित्र पक्वान्न त्या भुकेलेल्यांना आनंदाने वाढले.

हे पाहून गावातील कर्मठ ब्राह्मण संतापले. त्यांनी नाथांवर बहिष्कार टाकला आणि श्राद्धाचे जेवण जेवण्यास नकार दिला. “तुम्ही अस्पृश्यांना जेवू घालून धर्म भ्रष्ट केला आहे; आता तुमचे पितर उपाशी राहतील,” असे म्हणून त्यांनी, नाथांचा अपमानही केला. तेव्हा नाथांकडे सेवा करण्यासाठी राहिलेले श्रीखंड्या अर्थात साक्षात पांडुरंग तेथे होते. त्यांनीच नाथांना धीर दिला. नंतर नाथांनी मनोभावे पितरांना आवाहन केले. आश्चर्य म्हणजे, ब्राह्मणांनी नाकारलेल्या त्या अन्नाचा स्वीकार करण्यासाठी, नाथांचे पूर्वज प्रत्यक्ष मानवी रूपात प्रकट झाले. श्रीखंड्याने त्या सर्व पितरांना अत्यंत आदराने भोजन वाढले.

संत एकनाथ महाराजांनी आपल्या अमोघ साहित्यातून, महाराष्ट्राच्या मातीत भक्ती आणि समतेची बीजं पेरली. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे साहित्यिक योगदान म्हणजे ‌‘एकनाथी भागवत‌’ हा ग्रंथ होय. त्याकाळी संस्कृत भाषेलाच श्रेष्ठ मानले जात असे. मात्र, नाथांनी “संस्कृत वाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली?” असा परखड सवाल करत, मराठी भाषेला प्रतिष्ठेच्या शिखरावर नेऊन ठेवले. या ग्रंथातून त्यांनी गहन आध्यात्मिक तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनतेला समजेल, अशा सोप्या भाषेत मांडले. नाथांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात असलेला प्रासादिकपणा आणि सामान्यांप्रति असलेली अपार ओढ.

केवळ तत्त्वज्ञान सांगून न थांबता, समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नाथांनी ‌’भारुड‌’ हा काव्यप्रकारही अत्यंत प्रभावीपणे वापरला. वाघ्या-मुरळी, जोशी, गोंधळी अशा लोककलांच्या पात्रांद्वारे त्यांनी, मनोरंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांचे ‌‘विंचू चावला‌’ हे भारूड आजही मानवी षड्रिपुंवर (कामक्रोधादि) प्रहार करणारे उत्तम उदाहरण मानले जाते. यासोबतच त्यांनी ‌‘भावार्थ रामायण‌’ लिहून, त्यातूनही रामराज्याची संकल्पना मांडली आणि लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. ‌‘रुक्मिणी स्वयंवर‌’सारख्या काव्यातून त्यांनी भक्ती आणि शृंगाराचा सुंदर मेळ घातला. थोडक्यात सांगायचे तर, नाथांचे साहित्य हे केवळ शब्दांचे खेळ नसून, ती समाजाला जागृत करणारी आणि मराठी भाषेला समृद्ध करणारी एक ज्ञानगंगाच आहे.

संत एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यातील कर्तव्ये पूर्ण झाल्यावर, फाल्गुन वद्य षष्ठी (इ.स. 1599) हा दिवस निजधामास जाण्यासाठी निश्चित केला. वयाची 66 वर्षे पूर्ण झाल्यावर, त्यांनी आपल्या सर्व भक्तांना आणि कुटुंबीयांना अंतिम उपदेश केला. शुद्ध आचार आणि परोपकार हीच खरी भक्ती असल्याचे सांगत, नामस्मरण करत ते पैठणच्या गोदावरी तीराकडे निघाले. गोदावरीच्या पात्रात प्रवेश करून त्यांनी ‌‘जलसमाधी‌’ घेतली. त्यांनी पाण्यात प्रवेश करताच त्यांचे देहभान हरपले आणि ते विठ्ठलस्वरूपात विलीन झाले. ज्या दिवशी त्यांनी देह त्यागला, तोच दिवस ‌‘नाथ षष्ठी‌’ म्हणून, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाथांनी केवळ उपदेशच दिला नाही, तर समाधी घेतानाही अत्यंत शांत आणि तृप्त राहून ‌‘शांतिब्रह्म‌’ ही पदवी सार्थ ठरवली. त्यांचे विचार आजच्या काळातही समस्त मानवांना मार्ग दाखवत आहेत...

- आसावरी पाटणकर

Powered By Sangraha 9.0