गीतासार भाग- ७

    12-Mar-2026
Total Views |

कुंतीला दुर्वासांच्या आशीर्वादामुळे झालेल्या पहिल्या मुलाचे नाव ‌‘कर्ण‌’ असे ठेवणे, हे व्यासांच्या उच्च बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. कर्णाचा जन्म केवळ देवतेच्या स्मरणाने व मंत्रांच्या उच्चारणाने झाला. व्यासरचित कथांचा सत्याशय लक्षात येणे सोपे नाही. केवळ देवतेच्या स्मरणाने कुमारिकांना अथवा विवाहित स्त्रियांना पुत्रप्राप्ती होत असेल, तर त्याच परमेश्वराने अथवा प्रकृतीत नरनारींच्या समागमाद्वारे जो संततोत्पत्तीचा क्रमविकास दाखविला गेला आहे, तो तसा संभव झाला नसता. इथे अभिप्रेत सूर्य म्हणजे ज्ञानसूर्य. प्रकाशाला ज्ञानाची उपमा दिली जाते. संस्कृतमध्ये कर्ण शब्दाचा अर्थ ‌‘कान‌’ असा होतो. श्रवण हे कानांद्वारे केले जाते. श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीमध्ये सर्वांत प्रथम सांगितली आहे. म्हणूनच कुंतीच्या प्रथम पुत्राचे नाव ‌‘कर्ण‌’ म्हणजे, कान ठेवले आहे. परंतु, ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे. त्याही अवस्थेचा त्याग करून पलीकडे जाणे आवश्यक आहे, म्हणून कुंती कर्णाला पुन्हा ज्ञानगंगेत सोडते.

ज्ञान हे फक्त ऐकून प्राप्त होत नसून, ते आत्मसात करण्यासाठी स्वभावात आवश्यक बदल होणे अनिवार्य आहे. त्यासाठी नित्य साधना आवश्यक. श्रोत्यांपैकी सामान्य बुद्धीचे बरेच श्रोते आपण केवळ श्रवण केले, म्हणजे आपणास ग्रंथातील सर्व ज्ञान प्राप्त झाले असे मानतात. परंतु, अशांना उपनिषदे स्पष्ट सांगतात,

नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया बहुना श्रुतेन|
यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनूऽस्वाम्‌‍॥


म्हणजे आत्मज्ञान केवळ प्रवचने देऊन किंवा ऐकून अथवा केवळ बुद्धीचा तर्कविलास दाखवून मिळत नसते; तर त्याकरिता साधकाला कठोर आत्मसाधना व चिंतन करावे लागते. मगच आत्मज्ञान प्राप्त होत असते. व्यासांनी आपल्या असामान्य दिव्य बुद्धीचा कुशलतेने उपयोग करून जे ‌‘महाभारत‌’ आणि ‌‘भागवत‌’ लिहिले, त्याचा आध्यात्मिक आशय लक्षात न घेणे, म्हणजेच आपल्या सामान्य बुद्धीचा आढ्यतेने उपयोग करून व्यासांवर अन्याय करण्यासारखेच आहे. महष व्यास व वाल्मिकींवर असाच अन्याय होत आलेला आहे आणि म्हणूनच, कथित विद्वानांना उद्देशून व्यास आपल्या महाभारताच्या शेवटी आवर्जून सांगत आहेत. ‌‘ऊर्ध्वबाहुः विरोमैष न च कश्चित्‌‍ श्रृणोति मे|‌’ अर्थात ‌‘मी हात उंच करून सांगत आहे, पण माझे कोणीच ऐकत नाही.‌’

कुंती

‌‘कुंत‌’ म्हणजे भाल्यासारखे तीक्ष्ण शस्त्र, ज्याद्वारे आपण समोरील वस्तूचे विदारण करून किंवा चिरून, पलीकडील सत्य पाहू शकतो. असल्या वृत्तीला व्यास ‌‘कुंती‌’ असे म्हणतात. वृत्ती शब्द स्त्रीलिंगी असल्याने, व्यासांनी कुंतीला एक स्त्री दाखवून तिला पांडवांचे मातृत्व दिले आहे. ज्या पंचेंद्रियांचा जन्मदाता दुनियादारीच्या वृत्तीसाठी नपुंसक असतो; परंतु ज्याची पत्नी म्हणजे कुशाग्र बुद्धी पलीकडील सत्य जाणण्याची क्षमता ठेवते, अशीच कुंती पांडवांची माता दाखविली आहे. आता या कुंतीला स्त्रीधर्मानुसार संतती असणे आवश्यकच आहे. म्हणून ज्यांचा वास अथवा सहवास ‌‘दुः‌’ म्हणजे दुर्धर आहे, अशा कठीण साधना म्हणजे दुःवास अथवा दुर्वास ऋषींच्या वरदानाने कुंतीला पुत्रप्राप्ती झालेली दाखवली आहे. कठीण साधना केल्यानंतर कुंतीरूप साधकाला जी अवस्थारूप पुत्रप्राप्ती होत असते, अशा पंचप्राणरूप संतानोत्पत्तीला व्यास पंडुचे पाच पांडव असे संबोधतात. त्यांपैकी कुंतीला चतुर्विध पुरुषार्थाचे कर्ण, धर्म, भीम व अर्जुन असे चार, तर अन्य पत्नी माद्रीला नकुल आणि सहदेव असे दोन पुत्र दाखविले आहेत. पंडुची एकूण अवैध पुत्रमर्यादा षट्दर्शनाची सहाच दाखविली आहे. अवैध का? तर दुनियादारीच्या मर्यादांना सोडून पंडुपत्नी कुंती आणि माद्रीने त्यांची संतती उत्पन्न केली होती; परंतु ती पुरुषाथ संतती त्यांनी आपल्या पंडुच्या संमतीने आणि देववृत्तीद्वारे म्हणजेच देवतांद्वारे मंत्रसामर्थ्याने केली असल्याने, जनता जनार्दनाला त्यावर लौकिक आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. म्हणून व्यासबुद्धीप्राप्त पांडव संतती, त्यावेळच्या वैदिक म्हणजे ज्ञानमय समाजाला मान्य झाली.

दुर्वासांचे आणि कुंतीचे मंत्रसामर्थ्य

मंत्र म्हणजे सामर्थ्यशील शब्दरचना, ज्याचा उच्चार केल्याबरोबर इच्छित फलप्राप्ती होते, असा आमचा समज दिसतो. परंतु, शास्त्र मंत्राची व्याख्या सांगतात, ‌‘मननात्‌‍ त्रायते इति मंत्रः|‌’ म्हणजे मननाने अथवा सतत चिंतनाने साधकाचे वृत्तीरक्षण होते, त्याला मंत्र असे म्हणतात. म्हणून मंत्राची शक्ती केवळ शब्दांत नसून, त्या शब्दांचा उच्चार करणाऱ्या मननशील साधकाच्या मनसामर्थ्यात आहे, हे ओघानेच आले. असला सामर्थ्यशील मनाचा साधक केवळ मनाने इच्छा करेल, तर त्या सामर्थ्यवान मनाद्वारे इच्छित फलप्राप्ती अवश्य मिळेल. म्हणून योग्याला कालांतराने कोणत्याच शब्दरचनायुक्त मंत्राची आवश्यकता नसते. तो केवळ आपल्या मनसामर्थ्याने फलप्राप्ती करू शकतो. कठीण साधनारूप दुर्वासांनी असलाच पुत्रप्राप्तीचा मंत्र कुंतीरूप सत्य जाणणाऱ्या साधकवृत्तीला दिला होता.

कुंतीच्या कौमार्य मातृत्वाची कल्पना जशीच्या तशीच ख्रिस्तमाता मेरी अथवा मारिया आणि झरतुष्ट्र माता दुग्धोवा यांच्या चरित्रात उसनी घेतलेली दिसते. मारिया कुमारी असतानाच तिला दिव्य अवस्थेद्वारे जिझसची प्राप्ती झाली असा विश्वास ठेवणारे ख्रिश्चन, मोठ्या भक्तियुक्त अंतःकरणाने मानतात; परंतु संतती प्राप्त करू न शकणारे कुमारी शरीर जीझसला कसा जन्म देऊ शकते? याचा शास्त्रीय विचार ख्रिश्चन लोक करीत नाहीत. कुमारी माता त्यांच्या अपरिपक्व कुमारी शरीराद्वारे अपत्यप्राप्ती करू शकत नाहीत; परंतु ज्या अथ वेदव्यासांनी कुंतीला कुमारी असून तिला दिव्य अवस्थेद्वारे माता दाखविली आहे, त्या अथ त्या कथेत अन्य आध्यात्मिक अवस्था असली पाहिजे, हे उघड आहे. पण, मारियाचे असले आध्यात्मिक रहस्य असलेले कुमारी मातृत्व ख्रिश्चन लोक मानायला तयार होतील काय?

जीझसची माता मारियाचे नाव ‌‘कुमारी‌’ या संस्कृत शब्दापासून अपभ्रंश होऊन आले आहे. कुमारी शब्दातील ‌‘कु‌’ म्हणजे वाईट हे विशेषण गाळल्यास ‌‘मारी‌’ शब्द शिल्लक राहतो. ‌‘मार‌’ म्हणजे प्रगती न करणारी अवस्था, त्यापासूनच स्त्रीलिंगी वृत्ती शब्द ‌‘मारी‌’ बनतो. जसे गंगापासून ‌‘गांगेय‌’ म्हणजे गंगापुत्र व राधापासून ‌‘राधेय‌’ म्हणजे राधेचा पुत्र शब्द बनला आहे. तद्वत्‌‍ ‌‘मारी‌’पासून मारिय वा मारिया शब्द बनवून, त्या मारियाचा पुत्र ‌‘जीझस‌’ दाखविला आहे. ‌‘जीझस‌’शब्दसुद्धा ‌‘यशस्‌‍‌’ संस्कृत शब्दाचे इस्रायली अपभ्रंश ‌‘जीझस‌’ स्वरूप आहे. कुंतीच्या कुमारी मातृत्वाचा वारसा ख्रिश्चन पंथीयांनी असा बेमालूम आत्मसात केला आहे.

मंत्रसामर्थ्याने कुंतीने स्वतःकरिता चार, तर माद्रीकरिता दोन पुत्रांची प्राप्ती करून घेतली, अशी कथा मोठ्या कौशल्याने रचली आहे. आता कुंती आणि माद्रीच्या पुत्रांची नावे तशीच का ठेवली गेली, याचे व्यासरहस्य पुढील भागात पाहू. (क्रमशः)

- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357