युद्धाची ‌‘ब्रॅण्ड दुबई‌’लाही झळ!

12 Mar 2026 13:20:58

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा केवळ कच्चे तेल, गॅसच्या किमतींपुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्याचा परिणाम ‌‘ब्रॅण्ड दुबई‌’वरसुद्धा झाला. इराणकडून कतार, सौदी अरब आणि यूएईच्या शहरांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्याचा आणि युद्धजन्य स्थितीचा फटका वसवलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या दुबईला विनाकारण कसा बसला, त्याचे हे आकलन...

काही दिवसांपूर्वी ‌‘बुर्ज खलिफा‌’वर घोंगावणारे इराणी ‌‘ड्रोन‌’ यूएईच्या हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच उडवले. त्यात फारसे नुकसान झाले नाही. मात्र, त्याचा मानसिक आघात आता दुबईच्या पर्यटन, गुंतवणूक आणि अन्य व्यवसायावर दिसू लागला आहे. दुबई सध्या इराण व इस्रायल-अमेरिका युद्धाच्या तीव्र झळा सोसताना दिसते. आपल्या ‌‘गोल्डन व्हिसा‌’ आणि सुरक्षित जागेमुळे जगभरातील लोकांचे आकर्षणाचे केंद्र बनले होते, तिथे आता जागतिक अनिश्चिततेचे ढग पसरले आहेत. काही विलेषकांच्या मते, ही परिस्थितीसुद्धा सुधारू शकते. मात्र, सध्या गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर या युद्धाचा परिणाम जाणवत आहे. त्यातच युद्धाच्या झळा जितक्या तीव्र, तितका हा परिणाम जास्त. पुढील काही वर्षांत स्थिरता, शांतता नांदली, तर लोकांना पुन्हा एकदा आकर्षित करण्यास दुबई यशस्वी ठरेल. पण, सध्या तरी तिथल्या नागरिकांच्या मनावर या युद्धाचे सावट आहे. त्यामुळे या युद्धाचे भौगोलिक परिणाम जाणवत नसले, तरीही मानसिक परिणाम दीर्घकाळ राहतील, ही शक्यता नाकारता येत नाही.

संयुक्त अरब अमिरातीमधील अन्य भागांपेक्षा दुबईमध्ये जागेचे भाडे सहा ते नऊ टक्क्यांपर्यंत जास्त. तसेच इथे सर्वाधिक संख्या ही भारतीयांचीच. भारतीयच इथे सर्वात जास्त विदेशी गुंतवणूकदार म्हणून दृष्टिपथास पडतात. या भागात एकूण गुंतवणुकीच्या 20 ते 22 टक्के गुंतवणूक भारतीयांची असल्याचे म्हटले जाते. दुबईतील ‌‘रिअल इस्टेट गुंतवणूक बाजारपेठ‌’ ही कायमच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या क्षेत्रात 2025 मध्ये एकूण 250 अब्ज डॉलर्सचे व्यवहार झाले. हा ओघ अजूनही कायम आहे. दुबई शहर हे गुंतवणूकदारांसाठी एक ‌‘ब्रॅण्ड‌’ बनत चालला आहे. पण, आता युद्धाचे सावट असतानाही आपली पत हे शहर टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसते.

तूर्त ही वेळ दुबईतील छोट्या गुंतवणूकदारांना समजून घेण्याची आहे. बड्या गुंतवणूकदारांशी त्यांची तुलना करून चालणारी नाही. एकेकाळी दुबई हे शहर प्रत्येकाला सुरक्षित वाटू लागले होते. आज लंडन शहराची जशी स्थिती आहे, त्या तुलनेत दुबई कित्येक पटींनी अनेकांना सुरक्षित वाटू शकते. आजही दुबईतील जनता सुरक्षित आहे. कारण, यूएईकडे असलेल्या हवाई क्षेपणास्त्ररोधक यंत्रणेमुळे. मात्र, हे हल्ले रोखतानाही काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोठे नुकसान टळले असले, तरीही हे हल्ले रोखताना काहीसे वित्तीय नुकसान झाले. याच कारणास्तव अनेक छोटे आणि किरकोळ गुंतवणूकदार प्रभावित झालेले दिसतात. जरी दुबईचे खूप मोठ्या प्रमाणात या युद्धामुळे नुकसान झाले नाही, तरी गुंतवणूकदारांना बसलेला मानसिक आघात हा निश्चितच मोठा होता.

एका अहवालानुसार, दुबईत आतापर्यंत एकूण दोन लाख, 70 हजार इतक्या गुंतवणुकीचे व्यवहार झाले. ज्यामुळे बाजारातील तरलता आणि गुंतवणूकदारांचे प्रमाण लक्षात येते. वर्षभरात एकूण 538 अब्ज दिरम मूल्याच्या एकूण दोन लाख घरांची खरेदी-विक्री झाली. 2021 पासून दुबईत गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक 60 ते 75 टक्क्यांनी वाढली आहे. ‌‘कोविड‌’ काळानंतर अशाप्रकारची गुंतवणूक होणारे दुबई हे मुख्य शहर आहे, हेही इथे अधोरेखित करावेसे वाटते.

येत्या काळात युद्धाच्या झळा जर थांबल्या नाहीत, तर दुबई शहरातील ‌‘रिअल इस्टेट‌’ क्षेत्राला याचा फटका बसू शकतो. मात्र, जर हीच परिस्थिती निवळली, तर गुंतवणूकदार पुन्हा दुबईचा विचार करू शकतात. एका अहवालानुसार, मुंबई आणि ‌‘एमएमआर‌’ क्षेत्रात ‌‘कोविड‌’ काळातील संकटानंतरही सर्वाधिक घरांच्या विक्रीची नोंद करण्यात आली होती. दुबईवरील हे संकटाचे ढगही असेच निघून गुंतवणूकदारांसाठी निरभ्र आकाश दिसेल, असा विश्वास स्थानिक ‌‘रिअल इस्टेट‌’मधील गुंतवणूकदारांना वाटतो. दुबई गुंतवणूकदारांसाठी एक वित्तीय केंद्र बनले आहे, त्यामुळे येत्या काळात हा प्रभाव फारसा राहील, असे दिसत नाही.

दुबईत प्रॉपट, गुंतवणुकीत वाढ, भाडे-उत्पन्नवाढ आदी गोष्टींवर कर नाही. मात्र, एजंटचे कमिशन, दुबई लॅण्ड डिपार्टमेंट फी, सेवाशुल्क, देखभाल खर्च हे आलेच. गुंतवणूकदारांना या गोष्टी सुरुवातीला जाणीव करून दिल्या जात नाहीत, त्यामुळे फसगत होते. बडे गुंतवणूकदार हे सातत्याने मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे किरकोळ गुंतवणुकीला त्याचा फटका बसतो. सातत्याने नव्या घरांची, कार्यालयांची निर्मिती होत असेल; तर लोकांचा कल हा नव्या प्रकल्पांकडे असतो. त्यामुळे पुनर्विक्रीसाठी आलेल्या सदनिकांतून नफा मिळवण्याचा विचार करणाऱ्यांचे नुकसान होते.

दुबईतील हॉटेल उद्योगालाही आखाती युद्धाचा फटका बसलेला दिसतो. दुबईतील सदैव गजबजलेली पंचतारांकित हॉटेल्स काहीशी ओस पडली आहेत. येथील सर्वात जास्त आकर्षक ठिकाण असलेल्या ‌‘पाम जुमेराह‌’ या भागातील हॉटेल्सवर भरघोस सवलत दिली जात आहे. पूव लाखभर भाडे असणारी हॉटेल्स आता केवळ 60-65 हजारांमध्ये सवलत देत आहेत. दुबईच्या शेख जायद रोड या भागातील हॉटेल्सचे भाडे केवळ 20-22 हजारांवर पोहोचले आहे.

अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाल्या कारणास्तव पर्यटनावरही प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी ‌‘सुरक्षित हब‌’ म्हणून वाटणाऱ्या या शहरालाच इराणने आव्हान दिल्याने नागरिक, पर्यटकांमध्ये चिंता आहे. मोठ्या हॉटेल्सची ग्राहक क्षमता 20 टक्क्यांनी घसरली आहे. जवळपास 80 हजारांहून अधिक हॉटेल्स बुकिंग रद्द झाली आहेत. काहींनी प्रवासाचे नियोजन पुढे ढकलले आहे. सुमारे 40 लाख प्रवासी विमानतळावर अडकलेले होते. मध्य-पूर्वेतील या युद्धामुळे दररोज पर्यटन उद्योगाला पाच हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. युद्ध थांबल्यानंतरच भविष्यात ‌‘ब्रॅण्ड दुबई‌’कडे लोक पुन्हा वळतील, अशी अपेक्षा!
Powered By Sangraha 9.0