नवी दिल्ली : (Iran US war) भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर इराणने भारताचा ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिका, युरोप आणि इस्त्रायलच्या जहाजांच्या प्रवासावर निर्बंध असले तरी 'पुष्पक' आणि 'परिमल' या भारतीय टँकर्सना होर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवासाची मुभा मिळाली आहे.(Iran US war)
जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'!
ही दोन जहाजे या मार्गावरून जात असतानाच, भारत आणि इराणमध्ये उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली. त्यापाठोपाठ इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खातीबजादेह यांनी दिल्लीत येऊन जयशंकर यांची भेट घेतली. या भेटींमुळेच भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या राजनैतिक संबंधांचा हा परिणाम मानला जात आहे.(Iran US war)
दरम्यान, पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराक आणि युएई जवळ समुद्री हल्ले झाल्याची माहिती समोर आल्याने पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पाणसुरुंग पेरणारी इराणची ५८ जहाजं अमेरिकेच्या सैन्याने दोन दिवसांत नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध अमेरिकेने केव्हाच जिंकले आहे, असेही ते म्हणाले. पण, लक्ष्य पूर्ण होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य तैनात असेल, असे सूतोवाच त्यांनी केले.(Iran US war)