महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी परिणामकारक ठरलेल्या ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्यानिमित्ताने ‘एचपीव्ही’ लसीकरणाच्या संशोधनात बहुमूल्य योगदान दिलेल्या डॉ. रंगास्वामी शंकरनारायणन यांच्या कार्याचे स्मरण करणे उचित ठरावे.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्भाशय मुखाचा कर्करोग अर्थात, ‘सर्व्हिकल कॅन्सर’ हा अत्यंत गंभीर; तरीही दुर्लक्षित असा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न. भारतात दरवष सुमारे एक लाखांच्या आसपास महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान होते, तर सुमारे 75 हजार महिलांचा यामुळे मृत्यू ओढवतो. याचाच अर्थ, जगातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू हे एकट्या भारतात होतात. भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा दुसऱ्या क्रमाकांचा कर्करोग. हा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ या विषाणूमुळे होतो. मात्र, लसीकरणामुळे हा कर्करोग टाळता येऊ शकतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी ‘एचपीव्ही’ लस ही वयाची 14 वर्षे पूर्ण झालेल्या आणि 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना दिली जाते. या लसीच्या भारतातील चाचण्या, त्यासंबंधीचे संशोधन यामध्ये सर्वस्व समर्पित केलेले एक ज्येष्ठ संशोधक, ‘रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट’ म्हणजे डॉ. रंगास्वामी शंकरनारायणन. या रोगाच्या प्रतिबंधासाठी वैज्ञानिक संशोधन, जनजागृती आणि प्रभावी आरोग्य धोरणांची सांगड घालणाऱ्या जागतिक स्तरावरील काही मोजक्या संशोधकांमध्ये डॉ. रंगास्वामी शंकरनारायणन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
1952 साली तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या डॉ. रंगास्वामी शंकरनारायणन यांनी ‘रेडिएशन ऑन्कोलॉजी’मध्ये ‘एमडी’ पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठ आणि ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठ येथे वैद्यकीय प्रशिक्षण घेतले. 1993 साली फ्रान्समधील ‘आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC)’ येथे दीर्घकाळ कर्करोग तपासणी आणि प्रतिबंध या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘अल डिटेक्शन ॲण्ड प्रिव्हेन्शन’ या विभागाने विकसनशील देशांमध्ये कर्करोग नियंत्रणासाठी व्यावहारिक आणि कमी खर्चिक उपाययोजना विकसित केल्या, हे विशेष. त्यांच्या संशोधनाचा मुख्य केंद्रबिंदू होता- संसाधनांची कमतरता असलेल्या देशांमध्येही कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध कशाप्रकारे शक्य होईल, त्याची चाचपणी करणे आणि त्यानुसार धोरणनिश्चिती करणे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी त्यांनी ‘व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसिटिक ॲसिड’ (VIA) या कमी खर्चिक तपासणी पद्धतीची परिणामकारकता सिद्ध केली. या पद्धतीमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील महिलांपर्यंत तपासणी-सेवा पोहोचविणे शक्य झाले आणि भारतासह अनेक देशांमध्ये या पद्धतीवर आधारित तपासणी कार्यक्रम सुरू करण्यात आले. ‘एचपीव्ही’ लसीचा एक डोसदेखील दोन अथवा तीन डोसइतकाच परिणामकारक ठरतो, या डॉ. शंकरनारायणन यांच्या निष्कर्षावर ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही मोहोर उमटवली. तसेच ‘एचपीव्ही’ लसीकरण न झालेल्या महिलांमध्ये या संसर्गाचे प्रमाण 24 पट अधिक असल्याचेदेखील डॉ. शंकरनारायणन यांनी त्यांच्या वैद्यकीय संशोधनातून सिद्ध करून दाखविले. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने 2030 पर्यंत सर्व सदस्य देशांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी लक्ष्यदेखील निर्धारित केले. त्यानुसार, 2030 पर्यंत 90 टक्के मुलींचे लसीकरण, 70 टक्के 35 आणि 45 वयोगटातील महिलांची तपासणी (स्क्रिनिंग) आणि या प्रकारच्या कर्करोगामुळे 30 टक्के मृत्यूमध्ये घट, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण, केवळ प्रतिबंधच नव्हे; तर या कर्करोगाचे ‘पोलिओ’सारखेच समूळ उच्चाटन, हेच खरं तर या धोरणाचे प्रमुख दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.
पण, म्हणतात ना, शुभकार्यात शंभर विघ्ने, तसेच काहीसे ‘एचपीव्ही’ लसीकरणाच्या प्रारंभी चाचण्यांच्या काळातही झाले. चाचण्या राबविताना काही स्वयंसेवी संस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या चाचण्यांवर टीका केली. लसीकरणामध्ये सहभागी असलेल्या काही मुलींच्या मृत्यूचा संबंध थेट या चाचण्यांशी जोडला गेला. मात्र, पुढील तपासणीत त्या मृत्यूंचा लसीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. पण, तरीही या घटनेमुळे लसीकरणातील संशोधन प्रक्रियेतील पारदर्शकता, संमती प्रक्रिया आणि नैतिक निकषांबाबत मोठ्या सार्वजनिक चर्चेला तोंड फुटले. काही राज्य सरकारांनी दबावापोटी लसीकरण चाचण्यांना परवानगीही नाकारली. शिवाय काहींनी हा आजार कमी झाला आहे, आता फक्त तपासणी करा, असाही सूर आळवल्याची खंत डॉ. शंकरनारायणन यांनी त्यांच्या एका व्याख्यानात बोलताना व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या मुलींनी, त्यांच्या पालकांनी या प्रक्रियेला विरोध दर्शविला नाही किंवा यातून माघारही घेतली नाही. परंतु, या विरोधामुळे डॉ. शंकरनारायणन आणि त्यांच्या चमूने अजिबात हार न मानता, उपलब्ध ‘डेटा’च्या आधारे जबाबदारीपूर्वक निरीक्षणे नोंदवली आणि हा प्रकल्प पुढे नेला. त्यामुळे ‘एचपीव्ही’ लसीबाबतचा वैज्ञानिक विश्वास बळकट झाला आणि भविष्यातील कार्यक्रमांसाठी अधिक पारदर्शक आराखडा तयार झाला.
डॉ. शंकरनारायणन यांनी केवळ भारतातच नव्हे, तर आशिया, आफ्रिका, द. अमेरिका खंडातील 75हून अधिक देशांतील सरकारांना कर्करोग प्रतिबंध आणि तपासणी कार्यक्रमांसाठी मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या नावावर शेकडो संशोधन लेख प्रकाशित झाले असून, त्यांनी अनेक तरुण संशोधकांनाही प्रशिक्षण देऊन जागतिक आरोग्य क्षेत्रात एक नवी पिढी घडवली आहे.
‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’मधील संशोधक डॉ. सायला मालवी यांना डॉ. शंकरनारायणन यांच्या योगदानाविषयी विचारले असता, त्या म्हणतात की, “ डॉ. शंकरनारायणन यांच्याकडे संकल्पनांचे भांडार होते. ‘एचपीव्ही’ लसीकरणाच्या यशस्वी चाचण्या हे त्यांनी मानवजातीला दिलेली सर्वोत्तम भेट आहे. ते स्वभावाने अतिशय दयाळू असून, सगळ्यांना समान वागणूक देत. त्यांनी केलेल्या या अभूतपूर्व कार्यामुळे ते सदैव स्मरणात राहतील.”
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा मोठ्या प्रमाणात टाळता येण्यासारखा आजार आहे, हा विश्वास डॉ. शंकरनारायणन यांनी आपल्या आयुष्यभराच्या संशोधनकार्यातून जगाला पटवून दिला. ‘प्रतिबंध, लवकर निदान आणि लसीकरण’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लाखो महिलांचे प्राण वाचवता येऊ शकतात, हा त्यांचा संदेश आजही सार्वजनिक आरोग्य धोरणांना दिशादर्शक ठरणाराच म्हणावा लागेल. डॉ. रंगास्वामी शंकरनारायणन यांचे 2025 साली वयाच्या 72व्या वष निधन झाले. ‘मरावे परी कीर्ति रूपी उरावे’ या बोधवचनानुसार, डॉ. रंगास्वामी शंकरनारायणन आज देहरुपी या जगात नसले, तरी त्यांचे आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदान पुढील कित्येक पिढ्यांतील महिलांना असेच जीवनदान देत राहील!